Early Thyroid Warning Signs: थायरॉईड ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाची अंतःस्रावी ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरातील चयापचय नियंत्रित करते. ती अन्नातून मिळणारी ऊर्जा शरीराने कशा पद्धतीने वापरायची ते ठरवते. मात्र, जेव्हा थायरॉईड ग्रंथी आवश्यक प्रमाणात हार्मोन्स तयार करू शकत नाही, तेव्हा त्या स्थितीला हायपोथायरॉईडिझम असे म्हणतात. हा आजार हळूहळू वाढतो आणि सुरुवातीला त्याची लक्षणे सहजपणे लक्षात येत नाहीत.
हायपोथायरॉईडिझमचा परिणाम केवळ वजनवाढ, थकवा किंवा मनःस्थितीतील बदलांपुरताच मर्यादित नसतो, तर त्याचे सूक्ष्म संकेत नखांमध्येही दिसू लागतात. अनेकदा शरीर आतून बिघडत असताना नखे त्याची शांत, पण ठळक सूचना देत असतात. त्यामुळे नखांमध्ये होणारे बदल दुर्लक्षित न करता, वेळीच ते लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
थायरॉईड आजार आधीच कळू शकतो? नखांमध्ये दिसणारे ‘हे’ ५ बदल पाहा
१) नखे सहज तुटणे व फाटणे
हायपोथायरॉईडिझममध्ये शरीराची चयापचय प्रक्रिया मंदावते. परिणामी आवश्यक पोषक तत्त्वांचे शोषण योग्य रीतीने होत नाही. त्याचा थेट परिणाम नखांवर दिसून येतो. नखे ठिसूळ होतात, लवकर तुटतात किंवा थरथरून फाटू लागतात. वारंवार नेलपॉलिश बदलणे किंवा नखांची निगा राखूनही ही समस्या कायम राहत असेल, तर ती हार्मोनल असंतुलनाची खूण असू शकते.
२) नखांची वाढ खूपच संथ होणे
सामान्यतः नखांची वाढ ठरावीक गतीने होत असते. मात्र, थायरॉईड हार्मोन्सची कमतरता असल्यास पेशींची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे नखांची वाढ लक्षणीयरीत्या मंदावते. दीर्घकाळ नखे पूर्वीसारखी वाढत नसल्याचे जाणवत असेल, तर तो इशारा दुर्लक्षित करू नये.
३) नखांवर उभ्या रेषा दिसणे
वय वाढल्यावर नखांवर उभ्या रेषा दिसणे सामान्य मानले जाते; पण कमी वयातच या रेषा अधिक ठळक, खोल आणि लवकर दिसू लागल्यास तो शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याचा संकेत असू शकतो. विशेषतः या रेषांसोबत नखे कोरडी व निस्तेज दिसत असतील, तर सावध होणे गरजेचे आहे.
४) नखे त्वचेपासून वेगळी होणे
काही वेळा नखांचा मूळ भाग कमकुवत होऊन, नखे हळूहळू त्वचेपासून वेगळी होऊ लागतात. ही स्थिती गंभीर मानली जाते. हायपोथायरॉईडिझममध्ये हार्मोन्सच्या कमतरतेमुळे नखांचा पाया कमजोर होतो आणि अशी समस्या निर्माण होऊ शकते.
५) नखांचा फिकट किंवा पिवळसर रंग
थायरॉईड हार्मोन्स कमी झाल्यास शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. त्यामुळे नखांचा नैसर्गिक गुलाबी रंग कमी होऊन, ती फिकट किंवा पिवळसर दिसू लागतात. हा बदल शरीरात सुरू असलेल्या अंतर्गत बदलांचा स्पष्ट संकेत असू शकतो.
महत्त्वाची सूचना
नखांमध्ये दिसणारे हे बदल थायरॉईड आजार निश्चित करतातच, असे नाही; मात्र ते शरीराकडून मिळणारे महत्त्वाचे संकेत नक्कीच आहेत. त्यामुळे वेळीच तपासणी करून, योग्य उपचार घेतल्यास हायपोथायरॉईडिझम नियंत्रणात ठेवता येतो. तेव्हा नखांकडे दुर्लक्ष न करता, वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
