Best and Worst Foods with Morning Tea: भारतातील प्रत्येक घरातील लोकांच्या दिनचर्येची सुरुवात चहा प्यायल्याशिवाय होत नाही. काहींसाठी चहा झोप दूर करण्याचा एक मार्ग आहे; तर काहींसाठी, चहा आळस, थकवा दूर करण्याचा मार्ग आहे. अनेकदा नकळत आपण सकाळच्या चहाबरोबर विविध पदार्थांचे सेवनही करतो. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? तुमची हीच सवय तुमच्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. ही सवय हळूहळू आपले आरोग्य खराब करू शकते. बरेच लोक चहाबरोबर बिस्किटे, स्नॅक्स किंवा टोस्ट खाऊन आपल्या सकाळच्या दिनचर्येची सुरुवात करतात. काही जण ते हलके व सुरक्षित मानतात आणि वर्षानुवर्षे सकाळी हाच नाश्ता करतात.

तज्ज्ञांच्या मते, सकाळ ही शरीरासाठी सर्वांत संवेदनशील वेळ असते. या काळात घेतलेले अन्न आणि पाणी पचन, हार्मोन्स आणि ऊर्जेच्या पातळीवर थेट परिणाम करते. चहाबरोबर चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने हळूहळू आम्लता, थकवा, गॅस, पोषक तत्त्वांची कमतरता आणि वजन वाढणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात.

चहाबरोबर कधीही खाऊ नका ‘या’ गोष्टी

बिस्किटे आणि टोस्ट

Award Banner

चहाबरोबर खाल्लेल्या बिस्किटांमध्ये रिफाईंड पीठ, साखर आणि ट्रान्स फॅट्स असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते, ज्यामुळे नंतर अशक्तपणा येतो आणि भूक लागते. त्यामुळे वजनवाढीचा आणि मधुमेहाचाही धोका वाढतो. दररोज बिस्कीट आणि चहाची सवय पोट आणि चयापचय अशा दोन्हींवर परिणाम करते.

खारट किंवा तळलेले स्नॅक्स

चहाबरोबर समोसे, खारट पदार्थ खाण्याची सवयदेखील हानिकारक आहे. जास्त मीठ रक्तदाब वाढवू शकते; तर तेलामुळे पचनक्रिया मंदावते आणि सकाळी लवकर यकृतावर दबाव आणते.

गोड पदार्थ

चहाबरोबर केक, पेस्ट्री किंवा ब्रेड आणि जॅम खाल्ल्याने शरीराला फक्त रिकाम्या कॅलरीज मिळतात. ऊर्जा लवकर कमी होते आणि इन्सुलिन असंतुलन वाढते.

सकाळी कोणते पदार्थ खाणे सर्वांत फायदेशीर?

भाजलेले चणे किंवा मखाना

मखाना किंवा भाजलेले चणे प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात. ते पचन सुधारतात, वजन नियंत्रित करण्यास मदत करतात आणि ऊर्जेची पातळी राखतात.

अंडी किंवा मोड आलेले कडधान्य

जर तुम्ही चहानंतर नाश्ता करीत असाल, तर उकडलेले अंडे, मूग किंवा हरभरा हे चांगले पर्याय आहेत. ते प्रथिने प्रदान करतात आणि तुमचा दिवस मजबूत सुरू करण्यास मदत करतात.

ड्रायफ्रुट्स

चहाआधी तुम्ही भिजवलेले बदाम, अक्रोड किंवा काजू खाऊ शकता. ते मेंदू आणि हृदयाला फायदा करतात आणि जास्त काळ पोट भरलेले ठेवतात.

दुधाचा चहा किंवा ग्रीन-टी कोणता चांगला आहे?

पोषणतज्ज्ञांच्या मते, दुधाचा चहा कमी प्रमाणात घेणे चांगले आहे. जास्त चहा प्यायल्याने लोहाचे शोषण कमी होते. ग्रीन टी किंवा हर्बल टी सौम्य असते; परंतु रिकाम्या पोटी ती पिऊ नये.

योग्य मार्ग कोणता?

तज्ज्ञ सांगतात की, सकाळी उठल्यानंतर सर्वांत आधी कोमट पाणी प्या, १५-२० मिनिटांनी काहीतरी हलके पदार्थ आणि नंतर चहा घ्या. चहाबरोबर गोड पदार्थ किंवा मैद्याचे प्रमाण कमीत कमी ठेवा.