Unhealthy Habits: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना एक मोठी समस्या त्रास देत आहे आणि ती म्हणजे रात्री नीट झोप न लागणे. दिवसभर कामाचा ताण, मोबाईल-लॅपटॉपचा वाढता वापर आणि अस्वास्थ्यकारक सवयी यांमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. निरोगी शरीरासाठी रात्रीची ८ तासांची झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु, अनेकजण दुपारी २-३ तास झोपतात, ज्यामुळे रात्री त्यांना लवकर झोप येत नाही.

सकाळपासून दुपारपर्यंत दिवसभर घरकाम केल्यावर लोकांना अनेकदा दुपारी थकवा जाणवतो, त्यामुळेच त्यांना जेवणानंतर सुस्ती येते, ज्यामुळे ते दुपारी २-३ तासांची झोप घेतात. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का, आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच झोपण्याची चूक कधीही करू नये, कारण त्याचे आरोग्यावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतात. जर तुम्हाला जेवणानंतर नेहमी झोप येत असेल आणि झोप रोखता येत नसेल, तर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच जाणून घेतल्या पाहिजेत.

दुपारी झोपणं गरजेचं?

झोप दुपारची असो किंवा रात्रीची, जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे, कारण त्यामुळे शरीरात चरबी आणि पाणी साठून राहू शकते, यामुळे तुमची पचनसंस्था बिघडू शकते आणि चयापचय क्रिया कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, वजन वाढणे आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदानुसार, वृद्ध आणि मुलांसारखे जे लोक जास्त शारीरिक श्रम कमी करतात. ते दुपारी एक तास झोपू शकतात. ज्यांनी दुपारचे जेवण केलेले नाही ते देखील झोपू शकतात.

वज्रासनात बसा

आयुर्वेदानुसार, जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी लोकांनी १५-२० मिनिटे वज्रासन करावे. यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते, चयापचय क्रिया निरोगी राहते आणि आम्लपित्त, अपचन, बद्धकोष्ठता व पोट फुगणे यांसारख्या समस्या टाळता येतात. तुम्ही जेवणानंतर १०० पावले चालण्याचा पर्यायही निवडू शकता. शिवाय दुपारच्या जेवणानंतर नेहमी डाव्या कुशीवर झोपावे.

अनेक आजार होऊ शकतात

जेव्हा तुम्ही दुपारचे किंवा रात्रीचे जेवण भरपूर खाता, तेव्हा त्यानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका. ही चूक वारंवार केल्यास अनेक शारीरिक समस्या आणि गंभीर आजारही उद्भवू शकतात.

रात्रीची झोप अपूर्ण झाल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो?

आपली झोप चांगली झाली तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ज्यांना दीर्घकाळासाठी शांत झोप येते, त्यांच्यात कोणत्याही प्रकारच्या भीतीचे प्रमाण जास्त असते, तसेच हे लोक लवकच चिडतात किंवा जास्त थकतात असेही काही अभ्यासांतून समोर आले आहे. या लोकांना कितीही जास्त झोप झाली तरी ती पुरेशी वाटत नाही आणि दिवसभर झोप येत राहते, त्यामुळे कमी वेळासाठी गाढ झोप लागणे हे जास्त वेळ झोपण्यापेक्षा जास्त आवश्यक असते. मात्र, दीर्घकाळ झोपणे हे आरोग्यासाठी चांगले नसते.

रात्री शांत झोप लागण्याचे उपाय

गरम पाण्याने अंघोळ करा

गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीरातील स्नायू शिथिल होतात, यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

झोपताना फोन दूर ठेवा

झोपताना मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ ठेवल्यास झोपेत अडथळा येतो, त्यामुळे ही उपकरणे दूर ठेवल्यास किंवा बंद केल्यास चांगली गाढ झोप लागण्यास मदत होते; त्यामुळे झोपताना मोबाईल, टॅबलेट आपल्या जवळ नसेल याची विशेष काळजी घ्या.

झोपताना कॉफी पिऊ नका

कॉफीमध्ये कॅफेन असते, ज्यामुळे झोप येत नाही, त्यामुळे झोपण्यापूर्वी काही काळ कॉफी घेणे टाळावे. त्यामुळे चहा, कॉफी घेण्यापेक्षा दूध घेतलेले केव्हाही चांगले.

झोपण्याच्या वेळा नक्की करा

ज्याप्रमाणे जेवणाच्या वेळा आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक असतात, त्याचप्रमाणे झोपण्याच्या वेळाही नियमित असणे आवश्यक आहे. रोज ठराविक वेळेला झोपल्यास आपल्या शरीराला त्या विशिष्ट वेळेची सवय लागते. रोज त्याच वेळी झोपल्यास शरीराला त्याचा निश्चितच फायदा होतो.