Constipation Remedies : आजकाल पोटाच्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत, ज्यामुळे अनेकदा बद्धकोष्ठता होते. ही समस्या कमी करण्यासाठी, बरेच लोक महागड्या रासायनिक औषधांचाही आधार घेतात; परंतु एवढा खर्च आणि वापर करूनही समस्या सुटत नाही. तथापि, जर तुम्हालाही औषधांशिवाय बद्धकोष्ठता दूर करायची असेल, तर बाबा रामदेव यांचा उपाय मदत करू शकतो. चला तर मग, पोटाची ही त्रासदायक समस्या कशी सोडवायची ते जाणून घेऊया.
बद्धकोष्ठता अचानक कशी उद्भवते?
अनेक अहवालानुसार, जेव्हा मोठे आतडे अन्नातून अतिरिक्त पाणी शोषून घेते, तेव्हा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यामुळे मल अत्यंत कठीण होतो आणि मग तो व्यवस्थितरीत्या बाहेर पडणे कठीण होते. या स्थितीला बद्धकोष्ठता, असे म्हटले जाते. त्याच्या कारणांबद्दल बोलायचे झाल्यास, खाण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित जीवनशैली किंवा एखादा अंतर्निहित वैद्यकीय आजार यांमुळेदेखील ही समस्या उद्भवू शकते. त्याव्यतिरिक्त जर एखादी व्यक्ती पुरेशा प्रमाणात पाणी पीत नसेल, तर त्यांनादेखील या समस्येचा त्रास होण्याची शक्यता असते.
बाबा रामदेव यांनी कोणता उपाय सुचवला पाहुयात
बाबा रामदेव यांनी या समस्येपासून आराम मिळविण्याचा सर्वांत सोपा मार्ग सांगितला आहे, ज्यासाठी जास्त पैसे किंवा जास्त प्रयत्नांची गरज नाही. बाबा रामदेव यांनी या समस्येचे वर्णन सर्वांत सामान्य आणि अनेकदा त्रासदायक ठरणाऱ्या समस्यांपैकी एक असे केले आहे. त्यांनी या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजनाही सांगितल्या आहेत. योगगुरू बाबा रामदेव यांनी बद्धकोष्ठतेपासून आराम मिळविण्यासाठी दोन महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत, ज्यांचे योग्य रीतीने पालन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
बाबा रामदेव यांचे आहाराबाबतचे २ नियम कोणते?
सावकाश खा आणि अन्न नीट चावून खा. बाबा रामदेव त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगतात की, खूप घाईने खाणे हे बद्धकोष्ठतेचे सर्वांत मोठे कारण आहे. लोकांना अनेकदा खूप घाईने खाण्याची सवय असते. पण, त्यांच्या मते, दोन जेवणांमध्ये किमान सहा तासांचे अंतर ठेवले पाहिजे. ते म्हणतात की, जे या नियमांचे पालन करतील, त्यांना बद्धकोष्ठतेचा कधीच त्रास होणार नाही.
पेरूचे सेवन – बाबा रामदेव यांच्या मते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळविण्यासाठी दररोज पेरूचे सेवन केले पाहिजे. पेरूमधील पोषक तत्त्वे पोटासाठी फायदेशीर असतात.
मात्र, हे लक्षात ठेवा की, बद्धकोष्ठतेवर प्राथमिक उपाय हे केवळ सुरुवातीच्या किंवा किरकोळ समस्येपुरतेच मर्यादित ठेवावेत; परंतु गंभीर लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन, योग्य ते उपचार घेणे अत्यावश्यक ठरते. कारण अनेकदा साध्या दिसणाऱ्या समस्येमागे गंभीर आजार असण्याची शक्यता असते.
