Stomach Gas Home Remedies: गॅस, पोट फुगणे, पोटात जळजळ किंवा दुखणे यामुळे अनेकांना रोजच्या कामात अडथळा येतो. काही जण या त्रासापासून आराम मिळावा म्हणून दररोज सकाळी रिकाम्या पोटी औषध घेतात. मात्र, गॅसचा त्रास वारंवार होत असेल तर केवळ औषधांवर अवलंबून न राहता आहार आणि जीवनशैलीकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये गॅस आणि पचनाशी संबंधित त्रासासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. यामध्ये मेथीचे पाणी, लसूण, आवळा, कोरफड, गिलोय तसेच काही योगासनांचा समावेश आहे.

गॅसचा त्रास नेमका का होतो?

पचनसंस्थेत जास्त प्रमाणात वायू तयार होणे किंवा तयार झालेला वायू सहज बाहेर न पडणे यामुळे गॅस, पोट फुगणे आणि जडपणा जाणवू शकतो. खूप घाईघाईने जेवणे, अन्न नीट न चावता गिळणे, सतत तळलेले किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाणे आणि बराच वेळ उपाशी राहणे यामुळेही काही लोकांना हा त्रास जाणवू शकतो. याशिवाय बद्धकोष्ठता, अपचन आणि पचनसंस्थेशी संबंधित काही आजारांमुळेही वारंवार गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.

सकाळी मेथीचे पाणी

रोज सकाळी मेथीचे पाणी घेतल्यास पोटफुगी, गॅसपासून आऱाम मिळू शकतो.. मेथीचा वापर पारंपरिक पद्धतीने पचनाशी संबंधित तक्रारींसाठी केला जातो.

अंकुरलेली मेथी खा

अंकुरलेली मेथी खाण्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती आणि प्रकृती वेगळी असल्याने कोणताही पदार्थ नियमितपणे सुरू करण्यापूर्वी तो आपल्याला मानवतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

लसूण

रिकाम्या पोटी लसूण खाण्याचा उपायही फायदेशीर आहे. मात्र, अॅसिडिटी किंवा जळजळ वाढत असेल तर रिकाम्या पोटी लसूण घेणे योग्य असेलच असे नाही.

आवळा आणि कोरफडीचा रस

आवळा आणि कोरफडीचा रस घेण्याचाही त्यांनी सल्ला दिला आहे. मात्र, कोरफडीचा रस प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे नियमित औषधे घेत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

गिलोयचा वापर

गिलोयचे सेवन करण्याचाही सल्लाही आयुर्वेदात आहे. कोणताही हर्बल किंवा आयुर्वेदिक पदार्थ ‘नैसर्गिक’ आहे म्हणून तो प्रत्येकासाठी सुरक्षित असेलच, असे नाही.

जिरे आणि धणे

जिरे आणि धणे आहारात समाविष्ट करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. भारतीय स्वयंपाकात या दोन्ही पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जिरे आणि धण्याचं पाणीदेखील फायदेशीर ठरू शकतं.

चालणे आणि अनुलोम-विलोम

फक्त आहारावर लक्ष न देता दररोज चालणे आणि अनुलोम-विलोम करण्याची सवय लावण्याचा सल्लाही रामदेव यांनी दिला आहे. नियमित शारीरिक हालचाल पचनासाठीही उपयुक्त ठरू शकते.

जेवल्यानंतर ताक घेण्याचा सल्ला

गॅसचा त्रास झाल्यास जेवल्यानंतर ताक घेण्याचा उपायही रामदेव यांनी सांगितला आहे. मात्र, दुग्धजन्य पदार्थ घेतल्यानंतरच पोट फुगत असेल किंवा गॅस वाढत असेल, तर हा उपाय टाळणे योग्य ठरू शकते.

वर्षानुवर्षे गॅसचा त्रास होत असेल तर सावध

गॅसचा त्रास अधूनमधून होणे सामान्य असू शकते. पण वारंवार पोट फुगणे, सतत पोटदुखी, उलट्या, वजन कमी होणे, शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल होणे, शौचातून रक्त जाणे किंवा सतत जळजळ होणे यांसारखी लक्षणे असल्यास केवळ घरगुती उपाय करत राहू नका. अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कारण काही वेळा सतत होणारा गॅस किंवा पोट फुगण्यामागे पचनसंस्थेशी संबंधित दुसरी समस्या असू शकते.