How To Improve Memory: आजच्या धावपळीच्या आयुष्यात ऑफिसच्या कामापासून ते घरातील जबाबदाऱ्यांपर्यंत हे सर्व काही सांभाळताना, लोक अनेकदा स्वतःची काळजी घेणं विसरून जातात. त्यामुळे स्मरणशक्ती कमी व्हायला सुरुवात होते. हल्ली तर लहान वयापासूनच स्मरणशक्ती कमी होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. अशा परिस्थितीत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश करायला हवा.
हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार म्हणाले की, जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करायची असेल, तर मेंदूसाठी निरोगी पदार्थ खा. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता होऊ देऊ नका. रात्री ७-८ तासांची झोप घ्या आणि नियमित शारीरिक हालचाल करा.
‘हे’ सात सुपरफूड्स तुमची स्मरणशक्ती वाढवतील

अॅव्होकॅडो
जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या आहारात अॅव्होकॅडोचा समावेश करावा. हे खाल्ल्याने रक्तप्रवाह सामान्य राहतो. व्हिटॅमिन-ई आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असलेले हे फळ मेंदूच्या पेशींचे संरक्षण करते.
अंडी
अंड्यांमध्ये आढळणारे पोषक घटक एसिटाइलकोलीन तयार करण्याचे काम करतात. हे स्मृती आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या न्यूरोट्रान्समीटरशी संबंधित आहे.
सॅल्मन मासा
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही सॅल्मन माशाचे सेवन सुरू करू शकता. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात. हे खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते. त्यासोबतच स्रायूंना काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.
बदाम
बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, असं म्हणताना तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जर तुम्हालाही तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर दररोज बदाम खाण्यास सुरुवात करा.
पालक
पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये अ, क व के ही जीवनसत्त्वे असतात. त्यांचे सेवन केल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते. पालकामध्ये भरपूर पोषक घटक असतात, जे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.
ब्लूबेरी
ताण कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी तुम्ही ब्लूबेरीचे सेवन करू शकता. त्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी होते.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया तुमच्या आहारात समाविष्ट करा. त्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे, जस्त आणि मॅग्नेशियम असते. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते.