Nighttime urination warning signs : रात्री वारंवार जाग येण्यामुळे एक वेगळाच थकवा जाणवतो. अनेकांना हा त्रास होतो, मात्र त्याबद्दल फारसे बोलले जात नाही. लोक झोपेतून उठतात, बाथरूममध्ये जातात, पुन्हा झोपतात आणि हीच प्रक्रिया रात्रभर सुरू राहते.
कालांतराने ही किरकोळ वाटणारी समस्या एकाग्रता, मूड, ऊर्जा पातळी आणि एकूण आरोग्यावर परिणाम करू शकते. डॉक्टर या स्थितीला “नॉक्ट्युरिया” (Nocturia) म्हणतात. वयानुसार हा त्रास वाढत असला तरी, तज्ज्ञांच्या मते याकडे केवळ वाढत्या वयाचा भाग म्हणून पाहणे चुकीचे ठरू शकते.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, नॉक्ट्युरियाचा त्रास लाखो प्रौढांना होतो आणि ५० वर्षांनंतर त्याचे प्रमाण वाढते. संशोधनात असे आढळले आहे की, रात्री वारंवार लघवीसाठी उठल्याने झोपमोड होते, दिवसभर थकवा जाणवतो, वृद्धांमध्ये पडण्याचा धोका वाढतो आणि जीवनमान खालावते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगनेही यामागे केवळ वयांसबधित नव्हे तर तर आरोग्यविषयक समस्या असू शकतात, असे स्पष्ट केले आहे.
रात्री उठून लघवीला जाणे नेहमीच सामान्य नसते (When waking up at night is more than just a bathroom break)
अनेकांना वाटते की रात्री वारंवार लघवी होणे हे वाढत्या वयाचे लक्षण आहे. मात्र डॉक्टरांच्या मते त्याची वारंवारता महत्त्वाची असते.
हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सचे क्लिनिकल डायरेक्टर आणि वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. रतन झा म्हणाले, “वयाच्या चाळशीनंतर अनेक लोक रात्री अनेकदा लघवीसाठी उठणे सामान्य समजतात. मात्र ते नेहमीच दुर्लक्ष करण्यासारखे नसते. कधीतरी एकदा उठणे चिंताजनक नसू शकते. पण जर दररोज दोन, तीन किंवा चार वेळा उठावे लागत असेल आणि त्यामुळे झोप, थकवा किंवा दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असेल, तर त्यामागील कारण शोधणे आवश्यक आहे.”
मानवी शरीर परिस्थितीशी जुळवून घेण्यात कुशल असते. त्यामुळे अनेकांना झोपमोड होत असूनही त्याचा परिणाम किती गंभीर आहे, याची जाणीव होत नाही. ते त्यामागे कामाचा ताण, व्यस्त दिनक्रम किंवा वाढते वय कारणीभूत असल्याचे समजतात.
डॉक्टरांच्या मते, पूर्वी शांत झोप लागणाऱ्या व्यक्तीला अचानक रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणे हे गंभीर संकेत असू शकतात.
रात्री लघवीची तीव्र इच्छा का होते? (Why does the urge become stronger at night?)
याचे उत्तर नेहमीच सोपे नसते.
सामान्यतः झोपेदरम्यान शरीर कमी प्रमाणात लघवी तयार करते. काही हार्मोन्स रात्री लघवीचे प्रमाण कमी ठेवतात, ज्यामुळे झोपेत व्यत्यय येत नाही. मात्र काही आजार या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात.
अरेटे हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. हिमा दीप्ती अल्ला यांनी सांगितले की “अनेक रुग्ण सहजपणे रात्री वारंवार लघवी होण्याची तक्रार करतात. मात्र वैद्यकीय दृष्टिकोनातून ते अनेक गोष्टींचे संकेत देऊ शकते. लोकांना वाटते की वयानुसार मूत्राशय कमकुवत होत आहे, पण कारण नेहमीच मूत्राशयाशी संबंधित नसते.”
त्या पुढे म्हणाल्या, “विशेषतः मधुमेह नियंत्रणात नसलेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंड रात्री अधिक प्रमाणात लघवी तयार करू लागतात. स्लीप अॅपनिया हा आणखी एक दुर्लक्षित घटक आहे. झोपेत श्वासोच्छ्वासात वारंवार अडथळे आल्यानेही लघवीचे प्रमाण वाढू शकते. तसेच संध्याकाळी घेतली जाणारी काही औषधे, विशेषतः डाययुरेटिक्स, यामुळेही रात्री लघवी वाढू शकते. त्यामुळे या समस्येकडे केवळ एका बाजूने पाहता येत नाही.”
याचा अर्थ, दोष नेहमीच मूत्राशयाचा नसतो. कधी मूत्रपिंड, हार्मोन्स, हृदय किंवा झोपेतील श्वसनातील अडथळे यामागे कारणीभूत असू शकतात.
डॉक्टरांना आढळणारे लपलेले आजार (The hidden conditions doctors commonly find)
रात्री वारंवार लघवी होण्यामागे अनेक गंभीर आरोग्य समस्या असू शकतात. पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कारण म्हणजे वाढलेला प्रोस्टेट. प्रोस्टेट ग्रंथी मोठी झाल्यास मूत्रमार्गावर दबाव येतो आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही.
डॉ. झा म्हणाले, “पुरुषांमध्ये वाढलेला प्रोस्टेट हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे लघवीचा प्रवाह प्रभावित होतो आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही. अनेक रुग्ण सांगतात की लघवी केल्यानंतरही काही वेळात पुन्हा लघवीची भावना होते.”
ते पुढे म्हणाले, “मात्र नॉक्ट्युरिया केवळ प्रोस्टेटशी संबंधित नाही. नियंत्रणात नसलेला मधुमेह, संध्याकाळी जास्त प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन, ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडर, मूत्रमार्गातील संसर्ग आणि काही हृदयविकार देखील याला कारणीभूत असू शकतात.”
मधुमेहाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अमेरिकेच्या CDC नुसार, रात्री वारंवार लघवी होणे हे रक्तातील साखर वाढल्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यास मूत्रपिंड ते बाहेर टाकण्यासाठी अधिक मेहनत घेतात आणि त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते.
हृदयविकारांमुळेही ही समस्या उद्भवू शकते. दिवसभर पायांमध्ये साचलेले द्रव झोपल्यावर पुन्हा रक्तप्रवाहात मिसळते आणि त्यामुळे रात्री लघवीचे प्रमाण वाढते.
म्हणूनच डॉक्टर नॉक्ट्युरियाला स्वतंत्र आजार मानत नाहीत, तर ते एखाद्या अन्य समस्येचे लक्षण मानतात.
कोणती लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नयेत? (The symptoms that should never be ignored)
काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डॉ. अल्ला सांगतात की, “सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षणांमध्ये झालेला बदल. पूर्वी संपूर्ण रात्र शांत झोप लागणाऱ्या व्यक्तीला अचानक वारंवार लघवीसाठी उठावे लागणे ही बाब गंभीरपणे घ्यायला हवी. यासोबतच जास्त तहान लागणे, लघवीत रक्त येणे, लघवीवर नियंत्रण न राहणे, लघवीचा प्रवाह खंडित होणे, अचानक वजन कमी होणे किंवा ओटीपोटात वेदना होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.”
डॉ. झा यांनीही इशारा दिला, “अनेक रुग्ण ही समस्या हळूहळू वाढत असल्याने डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात. शरीर सुरुवातीलाच काही सूक्ष्म संकेत देत असते. जर रात्रीची लघवी कायमस्वरूपी वाढत असेल, लघवी करताना जळजळ होत असेल, लघवीचा प्रवाह कमकुवत झाला असेल, लघवीवर निंयत्रण ठेवता येणार नाही अशी भावना निर्माण होत असेल, पाय सुजत असतील किंवा झोपेत व्यत्यय येत असेल, तर योग्य वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.”
लघवीत रक्त येणे, कारण नसताना वजन कमी होणे, तीव्र जळजळ किंवा सतत वेदना होणे ही लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नयेत.
ही समस्या टाळण्यासाठी काय करावे? (What can be done to prevent it?)
नॉक्ट्युरियाची सर्व प्रकरणे टाळता येत नसली तरी काही सवयींमुळे त्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेणे टाळावे. संध्याकाळी कॅफीनयुक्त पेये आणि मद्यपान टाळल्यासही फायदा होऊ शकतो.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. लघवी वाढवणारी औषधे घेत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची वेळ बदलता येते का, याची माहिती घ्यावी.
चांगल्या झोपेच्या सवयी देखील महत्त्वाच्या आहेत. घोरणे, दिवसभर झोप येणे किंवा स्लीप अॅपनियासारख्या समस्यांवर उपचार केल्यास रात्रीची लघवी कमी होऊ शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही समस्या सतत होत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नये.
डॉ. अल्ला सांगतात, “अनेक वेळा मूळ कारण योग्य वेळी ओळखले तर त्यावर प्रभावी उपचार करता येतात. खरी समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा लोक वर्षानुवर्षे झोपमोड सहन करत राहतात आणि ते वाढत्या वयाचा सामान्य भाग आहे असे समजतात.”
कधीतरी एकदा रात्री लघवीसाठी उठणे सामान्य असू शकते. मात्र दररोज अनेक वेळा उठावे लागत असेल, तर आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
