लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, माता त्यांच्या आहारात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करत असतात. ज्यामुळे मुलांना आवश्यक असलेली पोषक मिळतातच त्याचबरोबर त्यांना अनेक समस्यांपासून देखील दूर ठेवता येते. लहान मुलांना दूध हे आवर्जून दिले जाते. दूध लहान मुलाच्या आरोग्यासाठी तसंच त्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे माता लहान मुलाच्या आहारात दुधाचा समावेश करतात. मात्र , दूध नक्की कोणते वापरावे याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. अनेकजण शेळीचे दूध पितात. शेळीचे दूध आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. परंतु , मुलांना शेळीचे दूध द्यावे की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तर जाणून घेऊया लहान मुलांच्या शेळीच्या दुधाचा समावेश करावा की नाही.
बाळांना शेळीचे दूध द्यावे का?
खरं तर शेळीचे दूध मुलांसाठी सुरक्षित नाही. कारण त्यात उच्च प्रथिने असतात. त्यामुळे जर मुलांना शेळीचे दूध दिले , तर सहज पचत नाही. याशिवाय शेळीच्या दुधात फोलेटचे प्रमाणही खूप कमी असते. फोलेट एक महत्त्वाचा पोषक घटक आहे, ज्यामुळे मुलांचा विकास होतो. अशा परिस्थितीत जर लहान मुलांना शेळीचे दूध पाजल्यास त्यांना अशक्तपणा येऊ शकतो. तसंच उलट्या, जुलाब इत्यादी समस्या देखील उद्भवू शकतात. यामुळेच डॉक्टर बाळांना आईचे दूध पाजण्याचा सल्ला देतात. याशिवाय, जर काही कारणास्तव मुलांना आईचे दूध मिळू शकत नसेल, तर तुम्ही त्यांच्या आहारात फॉर्म्युला दूध किंवा गायीच्या दूधाचा देखील समावेश करू शकता. ही तिन्ही दूधे अतिशय हलकी असतात. लहान मुले ते अगदी सहज पचवू शकतात.
१ वर्षावरील मुलांना दूध देऊ शकता
१ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना शेळीचे दूध दिले जाऊ शकते. यासाठी त्यांना सॉलिड पदार्थांसोबत शेळीचे दूध देणे कधीही चांगले आहे. १ वर्षावरील मुलांना शेळीचे दूध दिल्यास , यामुळे मुलांच्या आरोग्याशी निगडित असलेली समस्या ,जसे की बद्धकोष्ठता तसंच हृदयाशी संबंधित समस्यांवरही मात करता येते. त्यामुळे १ वर्षावरील मुलांसाठी शेळीचे दूध खूप उपयुक्त आहे.
(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आवशक्यता असल्यास नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)