Health Benefits Of Eating Besan: प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात बेसनाच्या पदार्थांचे आवर्जून सेवन केले जाते. बेसनपासून अनेक चविष्ट पदार्थ तयार केले जातात. बेसनापासून तयार केलेला ढोकळा, भजी, झुणका यांसारख्या चविष्ट पदार्थांचा तुम्ही नक्कीच आस्वाद घेतला असेल. बेसनाची मिठाई समोर आली की, तर तोंडाला पाणी सुटते. पण, तुम्हाला माहितीये का? चव वाढवण्यासह बेसन आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बेसनातील आयर्न, फायबर, पोटॅशियम आणि इतर पोषक तत्त्वे ही शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. आज आम्ही तुम्हाला बेसन खाण्याचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.

बेसनाचे आरोग्यदायी फायदे

रक्ताची गरज पूर्ण करते

बेसनामध्ये शरीरासाठी उपयुक्त पौष्टिक तत्त्वे असतात. बेसनात पुरेशा प्रमाणात लोह असते. बेसनाच्या सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढवण्यात मदत होऊ शकते. जर तुम्ही अ‍ॅनिमियाग्रस्त असाल, तर बेसनाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. दैनंदिन आहारात बेसनाचा समावेश केल्यास शरीरातील लोहाची कमतरता भरून येण्यात मदत होऊ शकते.

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी बेसन खाणे फायदेशीर ठरू शकते. भाजलेल्या बेसनामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

वजन कमी होणे

बेसन वजन कमी करण्यात मदत करू शकते. बेसनात कॅलरीजचे प्रमाण फार कमी असते. वजन कमी करायचे असल्यास आहारात बेसनाचा समावेश केला पाहिजे. बेसन खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते आणि त्यामुळे बेसनाने वजन कमी होण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल

बेसनामध्ये विरघळणारे फायबर आणि असंतृप्त चरबी आढळते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

अशक्तपणा

बेसन हा लोहाचा चांगला स्रोत आहे आणि अशक्तपणा असलेल्या लोकांना बेसनाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. ते लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करते.

मजबूत हाडे

बेसनामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत करण्यास साह्य करू शकतात. त्याचे सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासही मदत मिळू शकते.

गरोदरपणात फायदेशीर

गर्भवती महिलांसाठी बेसन फायदेशीर आहे. बेसनात फोलेट आणि ‘जीवनसत्व-क’चे प्रमाण अधिक असते जे गरोदरपणात आवश्यक असते.

पचन

बेसन खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ते फायबरचा चांगला स्रोत आहे, म्हणून त्याचे सेवन केल्याने तुमची पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.

बेसन खाण्याचे दुष्परिणाम

कोणत्याही गोष्टीचे माफक प्रमाणात सेवन करणे फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारकदेखील असू शकते. बेसनाचे जास्त सेवन केल्याने पोटफुगी, पेटके आणि पचनाच्या समस्या उदभवू शकतात. म्हणून त्याचे माफक प्रमाणातच सेवन करावे.