Paneer and Bloating : पनीर हा प्रथिने आणि कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत मानला जातो. अनेक लोकांना पनीर प्रचंड आवडते पण काहींना ते खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवतो, गॅस आणि पोटफुगी होते. त्यामुळे ते पोटफुगी होण्याच्या भीतीने पनीर खाणेच बंद करतात. गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट आणि डायटिशियन कनिका मल्होत्रा यांच्या मते, पनीर हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. शाकाहारी लोक खास करून हे पदार्थ खाण्यास पसंती देतात. न्यूट्रिशन तज्ज्ञांच्यामते, पनीर खाल्ल्यास तुम्हाला पोटफुगी होत असेल तर समस्या पनीर नाही तर तुम्ही ते कशाबरोबर खाता आणि कधी खाता ही असू शकते.
सर्टिफाइड न्यूट्रिशनिस्ट आयना सिंघल यांच्यामते, पनीर जर जास्त कर्बोदके, गोड सॉस किंवा उशिरा पचण्यास जड जेवणाबरोबर खाल्ले तर त्यामुळे पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की, पोटफुगी, पोटात जडपणा जाणवणे तर काहींना त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की कोणत्या पदार्थांबरोबर पनीर एकत्र खाल्ल्यास पोटफुगी किंवा गॅसची समस्या होते. तज्ज्ञांच्या मते पोटफुगी आणि गॅसपासून वाचण्यासाठी पनीरचे सेवन कसे करावे हे समजून घ्या.
काही पदार्थांबरोबर पनीरचे सेवन केल्याने खरंच पोटफुगी होते का?
आयना सिंघल यांच्यामते, पनीरबरोबर काही पदार्थ खाल्ल्यास अन्न पचण्याचा वेग मंदावतो. म्हणून काही पदार्थांबरोबर पनीर खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, पनीरबरोबर एकावेळी चपाती किंवा भात दोन्हीपैकी एकच पर्याय निवडावा कारण एकाच वेळी भात-पोळीसह पनीर खाल्ले तर पोटफुगी होऊ शकते. पनीरबरोबर राजमा, छोले किंवा डाळींचे अधिक सेवन केल्यास पोटफुगी होते. पनीरसह गोड सॉस किंवा गोड पदार्थ खाल्ल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो. पनीर आणि दुग्धजन्य पदार्थ एकत्र खाल्ल्यास देखील गॅस आणि पोटफुगी होऊ शकते. अशा पदार्थांमुळे पोट फुगते, जडपणा जाणवतो.
पनीरबरोबर काही पदार्थ खाल्ल्याने खरंच आरोग्याचे नुकसान होते का?
कनिका मल्होत्रा यांच्यामते, फूड कॉम्बिनेशन थेअरी ज्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट किंवा दूध आणि फळांसह एकत्र खाऊ नये. याबाबत वैज्ञानिक पुरावा नाही. तज्ज्ञांच्या मते आपली पचनक्रिया एकाचवेळी प्रथिने, चरबी आणि कर्बोदके यांना पचवणारे एंझाइम्स तयार करते. त्यामुळे पनीर इतर पदार्थांसोबत खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे हे म्हणणे योग्य नाही, कारण याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
पनीर खाल्ल्यानंतर पोटफुगी का होते?
ही लोकांना पनीर खाल्ल्याने पोटफुगी होत असेल, तर त्याला पनीर कारणीभूत नसून त्यांची वैद्यकीय स्थिती जबाबदार असू शकते. कनिका मल्होत्रा यांच्या मते, पनीरमध्ये कॅसीन नावाचे प्रोटीन असते जे हळू हळू पचते. जर पनीर राजमा, छोले आणि उच्च फॉडमॅप [FODMAP म्हणजे काही विशिष्ट कर्बोदके (Carbohydrates) आणि साखरेचे प्रकार, जे पचनसंस्थेला सहज पचवता येत नाही] किंवा खूप जास्त रिफाइंड कार्बोहायड्रेटसह खाल्लास, ज्या लोकांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, SIBOची समस्या आहे [(Small Intestinal Bacterial Overgrowth) म्हणजे लहान आतड्यात बॅक्टेरियाची (जीवाणूंची) अवाजवी वाढ होणे] किंवा आधीपासून पचनासंबंधित समस्या आहे त्यांना गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या वाढू शकते. या शिवाय कित्येक भारतीयांना लॅक्टोज इंटॉलरन्स (Lactose Intolerance) देखील असतो, ज्यामुळे पनीर खाल्ल्यानंतर होणारा त्रासाला अनेकदा लोक चुकीचे पदार्थांबरोबर खाल्ल्याने होत आहे असे समजतात.
पनीर खाल्ल्याने वजन वाढते का?
डॉक्टर कनिका मल्होत्रा यांच्या मते पनीर खाल्ल्याने वजन वाढते हे चुकीचे आहे. वजन वाढण्याचे मुख्य कारण पनीर नसून त्यासोबत खाल्ले जाणारे इतर पदार्थ, एकूण कॅलरीज आणि ‘पोर्शन साईज’ (खाण्याचे प्रमाण) हे असते. जर पनीर बटर आणि क्रीम किंवा तुपातील पचण्यास जड ग्रेव्हीमध्ये बनवले किंवा जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे कॅलरी वाढते आणि वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो.
पनीर तयार करण्याच्या पद्धती देखील ठरू शकते गॅस आणि पोटफुगीचे कारण
कनिका मल्होत्रा यांच्यामते पनीर जर डीप फ्राय करण्यामुळे किंवा क्रीमवाली ग्रेव्ही शिजवल्यास ते पचण्यास वेळ लागतो आणि ॲसिडिटी, गॅस आणि पोटफुगीचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही पनीर खाण्यास इच्छुक आहात तर तुम्ही पनीरचे सेवन भाजून, वाफवून, किंवा सौम्यपणे परतून करू शकता. या पद्धतीने सेवन केल्याने पनीर सहज पचते आणि गॅस आणि पोटफुगीची समस्या होत नाही.
पनीर रात्री खाणे योग्य की अयोग्य?
तज्ज्ञांच्या मते, रात्री पनीर खाणे प्रत्येक व्यक्तीसाठी हानिकारक नसते. जर एखादी व्यक्ती चयापचयदृष्ट्या निरोगी असेल आणि झोपण्याच्या २-३ तास आधी हलके पनीर खात असेल, तर सहसा काही अडचण येत नाही. तथापि, ज्या लोकांना आम्लपित्ताचा त्रास आहे, इन्सुलिन प्रतिरोध आहे किंवा रात्री उशिरा जड जेवण करण्याची सवय आहे, त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
पनीर खाण्याची सर्वात आरोग्यदायी पद्धत
- नेहमी ताजे, कमी चरबीयुक्त (लो-फॅट) आणि घरी बनवलेले पनीर खावे
- दिवसाला सुमारे १५०-२०० ग्रॅम पनीर पुरेसे मानले जाते.
- पनीरसोबत तंतुमय पदार्थांनी (फायबर) समृद्ध असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा.
- एकाच वेळी जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले कर्बोदके (रिफाइंड कार्बोहायड्रेट्स) खाणे टाळा.
- पनीरसोबत गोड पदार्थ खाणे टाळा.
- रात्री पनीरसोबत गरजेपेक्षा जास्त मलई किंवा तूप खाऊ नका.
- नेहमी चांगल्या प्रतीचे आणि विश्वासार्ह ब्रँडचे पनीर खरेदी करा, कारण भेसळयुक्त पनीर पचनाच्या समस्यांचे प्रमुख कारण ठरू शकते.
