Mercury In Fairness Creams : तुम्हीदेखील बाजारात सहज उपलब्ध असलेल्या किंवा ऑनलाइन खरेदी करता येणाऱ्या स्किन लाइटनिंग (त्वचा उजळ करणाऱ्या) किंवा फेअरनेस क्रीम्स वापरता का? तुमचे उत्तर होय असेल तर वेळीच सावध व्हा, कारण एका संशोधनानुसार या स्किन लाइटनिंग किंवा फेअरनेस क्रीम्समध्ये पाऱ्याचे प्रमाण कायद्याने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा हजारपट अधिक असल्याचं समोर आलं आहे. या क्रीम्सचा वापर केल्याने मूत्रपिंड निकामी (किडनी फेल्युअर) होत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक अहवालात उघडकीस आला धोकादायक ट्रेंड

मीनामाता कन्व्हेन्शन हा एक जागतिक करार आहे. हा करार पाऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करतो. याआधी या कराराच्या बैठकीपूर्वी, Zero Mercury Working Group (ZMWG) ने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात जगभरातील मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मवर धोकादायक आणि अनेकदा बेकायदा पारा-युक्त त्वचा उजळ करणारी उत्पादने उपलब्ध असल्याचे दस्तऐवजीकरण केले आहे. त्यात ३१ क्रीम्सपैकी तब्बल २५ क्रीम्समध्ये पाऱ्याचं प्रमाण कायद्याने परवानगी असलेल्या १ ppm मर्यादेपेक्षा हजारो पट अधिक असल्याचं आढळलं.

Toxics Link (India) ने भारत, पाकिस्तान आणि थायलंडमध्ये बनलेल्या ८ वेगवेगळ्या ब्रँडच्या स्किन लाइटनिंग क्रीम्सची तपासणी केली. त्यात ७ क्रीम्समध्ये पाऱ्याचे प्रमाण ७,३३१ ppm ते २७,४३१ ppm इतके जास्त होते. तुलनेत, अमेरिकेत आणि युरोपियन युनियनमध्ये फक्त काहीच पारा-युक्त उत्पादने आढळली. यातून असे दिसते की, अनेक ग्राहक अनवधानाने आणि धोका न समजून घेता या धोकादायक क्रीम्सचा वापर करत आहेत, विशेषतः अनियंत्रित ऑनलाइन मार्केटप्लेसवर असे उत्पादन सर्रासपणे खरेदी केले जातात.

“भारतीय ब्रँड्स नियम पाळतात, पण…

जरी भारतातील नामांकित ब्रँड्स नियमांचं पालन करतात, तरी परदेशी आणि अनऑर्गनाइज्ड क्षेत्रातील अत्यंत विषारी आणि नियमभंग करणाऱ्या स्किन लाइटनिंग क्रीम्स ऑनलाइन सर्रासपणे विक्री करतात. हे राष्ट्रीय नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. २०२३ पासून आम्ही अशा क्रीम्समुळे मूत्रपिंडांच्या आजारांचे, अगदी मूत्रपिंड निकामी झाल्याची अनेक प्रकरणे पाहिली आहेत.. महाराष्ट्रातील अकोल्यात एका कुटुंबातील तीन महिलांना पाऱ्याचे प्रमाण जास्त असलेल्या क्रीम्समुळे किडनीचे नुकसान झाले,” असे Toxics Link असोसिएट डायरेक्टर सतीश सिन्हा यांनी सांगितले.

पारा असलेल्या क्रीम्सचा त्वचेवर काय परिणाम होतो?

बर्‍याच अनियंत्रित त्वचा उजळवणाऱ्या क्रीम्समध्ये पारा असतो. पारा एक जड धातू आहे, जो नर्व्हस सिस्टिम, लिव्हर आणि किडनीसाठी अत्यंत हानिकारक आहे. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. डी. एम. महाजन यांच्या मते, “पारा त्वचेतील मेलानिन हा नैसर्गिक पिगमेंट तयार होण्याची प्रक्रिया थांबवतो, त्यामुळे त्वचा उजळ दिसते; पण त्याचवेळी त्वचेचं संरक्षण करणारं नैसर्गिक कवच कमकुवत होतं.”

पारा फक्त त्वचेवरच नाही तर मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि यकृतावरही तीव्र विषारी परिणाम करतो. अनेक उत्पादक पाऱ्याचा वापर क्रीममध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही करतात.

त्वचेसाठी धोका आणि अवलंबित्व

त्वचा लगेच उजळ झाल्यामुळे वापरकर्त्यांना या क्रीम्सचं मानसिक व्यसन जडतं, असे डॉ. महाजन सांगतात. “जशी ही क्रीम वापरणे बंद केलं, तशी त्वचेवर उलट प्रतिक्रिया दिसून येते. जसे की, खाज, लालसरपणा, पॅचेस, दाह होणे, केस गळणे आणि त्वचा अधिक वाईट दिसणे यालाच ‘रिव्हर्स फिनॉमेनन’ म्हणतात.”

पारा-युक्त क्रीम्सचे दुष्परिणाम (What are side effects?)

त्वचेव्यतिरिक्त पारा-युक्त क्रीम्सचा शरीरावरही गंभीर परिणाम होतो.

सतत पारायुक्त क्रीम वापरल्यास मूत्रपिंडासाठी सर्वात मोठा धोका निर्माण होतो. दीर्घकाळ अशा क्रीम वापरल्याने नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा आजार होतो, ज्यात मूत्रपिंडातून प्रथिनांची गळती होते; यामुळे मूत्रपिंड निकामीदेखील होऊ शकतात, अशी अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

तोंडात जखमा, मज्जासंस्थेवर परिणाम, हात-पाय थरथरणे आणि खाज सुटणे हेही दिसू शकते. डॉ. महाजन यांच्या म्हणण्यानुसार, सतत पारा-युक्त क्रीम्सचा वापर फक्त त्वचेसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी धोकादायक आहे.

पारा शरीरात कसा प्रवेश करतो? ( How does mercury get into the body by topical application of creams )

त्वचेवर क्रीम वापरल्यास पारा शरीरात अनेक मार्गांनी जाऊ शकतो:

श्वसनमार्गाने (Inhalation):

क्रीममधून निघणारा पारा-वायू श्वासोच्छ्वासाद्वारे फुप्फुसात जातो आणि हळूहळू नुकसान करतो.

तोंडाद्वारे (Oral absorption):

क्रीम ओठावर लागल्यास किंवा चुकून तोंडात गेल्यास पारा आतड्यांमध्ये शोषला जातो.

डोळ्यांद्वारे (Mucosal absorption):

क्रीम किंवा लोशन डोळ्यांवर चुकून लागल्यासदेखील शोषले जाऊ शकते.

डॉ. महाजन म्हणतात, “पारा मोठ्या प्रमाणात मूत्रपिंडाकडे जातो, कारण त्वचेद्वारे थेट शोषण होते. सरासरी त्वचेचा पृष्ठभाग क्षेत्रफळ १.७३ चौ. मीटर आहे, त्यामुळे त्वचा उजळ करणारे लोशन वापरल्यास पारा मोठ्या प्रमाणात शोषला जातो.”

सुरक्षितता कशी राखाल? (How to prevent usage of mercury-laden products?)

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) खालील घटक दिसल्यास उत्पादनात पारा असल्याचं ओळखावं:

कॅलोमेल (Calomel), सिन्नाबारिस (Cinnabaris), हायड्रॅरगीरी ऑक्सिडम रुब्रम (Hydrargyri oxydum rubrum) किंवा क्विकसिल्व्हर (Quicksilver) ही नावे असतील तर उत्पादनात पारा आहे.

घटकसूचीत “मर्क्युर (Mercury)” किंवा “मर्क्युरिक (Mercuric)” असे शब्द दिसल्यास सावधान!

जर पॅकेजवर “चांदी, सोने, अॅल्युमिनियम, दागिन्यांपासून दूर राहा. (Keep away from silver, gold, aluminium, jewellery) अशी चेतावणी असेल — तेही पारा असल्याची चेतावणी आहे.

“त्वचा उजळवण्यासाठी नेहमी प्रमाणित त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. परदेशी क्रीम वापरत असल्यास US FDA-मान्यता आहे का हे तपासा,” असा सल्ला डॉ. महाजन देतात. “देशातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फक्त प्रमाणित आणि तपासलेली उत्पादनेच विकली जावीत,” अशी मागणी Toxics Link संस्थेची आहे.

त्वचा उजळवण्याच्या हव्यासात घेतलेला अविचारी निर्णय आयुष्यभराचं आरोग्य बिघडवू शकतो. पाऱ्याचा थोडाही संपर्क किडनी, त्वचा आणि स्नायू प्रणालीसाठी घातक आहे, त्यामुळे “स्वस्तात सौंदर्य” मिळवण्याच्या मोहात अडकू नका — डर्मेटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि केवळ मान्यताप्राप्त ब्रँड्सचाच वापर करा.