Natural Ways to Lower Blood Pressure: उच्च रक्तदाब म्हणजे आजच्या काळातील शांत पण घातक आजार. देशातील लाखो लोक या त्रासाने ग्रस्त आहेत आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे असंतुलित आहार, मिठाचं जास्त सेवन आणि निष्क्रिय जीवनशैली. पण, तुम्हाला माहीत आहे का? रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ औषधं नव्हे, तर दररोजच्या आहारातील काही सोप्या बदलांनीही तो नैसर्गिकरित्या कमी होऊ शकतो.

हेच स्पष्ट केलं आहे डॉ. कुनाल सूद (Anesthesiologist व Interventional Pain Physician) यांनी, ज्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी ६ प्रभावी आहार सवयी सांगितल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “या प्रत्येक सवयी शरीरातील रक्तवाहिन्यांचं आरोग्य वेगवेगळ्या प्रकारे सुधारतात आणि एकत्रितपणे औषधांशिवायही रक्तदाब नियंत्रित ठेवतात.”

१. ओमेगा-३ फॅटी ॲसिडयुक्त मासे

सॅल्मन, मॅकेरल आणि सार्डिनसारख्या फॅटी माशांमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स (EPA आणि DHA) रक्तवाहिन्यांमधील प्रतिकार कमी करतात. डॉ. सूद यांच्या मते, “दररोज २-३ ग्रॅम ओमेगा-३चं सेवन केल्याने सिस्टोलिक बीपी २ ते ३ मिमीएचजीने कमी होऊ शकतो.”

२. कडधान्ये आणि वनस्पती प्रोटीन

मूग, मसूर, हरभरा यांसारख्या कडधान्यांमधील वनस्पती प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर रक्तवाहिन्या शिथिल करतात आणि ACE एन्झाइमचं कार्य कमी करतात. “आठवड्यात ३ ते ५ वेळा अर्धा ते एक कप कडधान्यांचं सेवन केल्यास बीपीमध्ये हळूहळू घट होते,” असं त्यांनी नमूद केलं.

३. नायट्रेटयुक्त भाज्या

बीट, पालक, अर्गुला यांसारख्या भाज्यांमध्ये नैसर्गिक नायट्रिक ऑक्साइड असतो, जो रक्तवाहिन्यांना प्रसरण करतो.
दररोज फक्त ८० ग्रॅम पालक किंवा १०० ते २०० मि.ली. बीटाचा रस घेतल्यास सिस्टोलिक बीपी सुमारे ५ मिमीएचजीने घटू शकतो.

४. सुका मेवा

अक्रोड, पिस्ते आणि बदाम यांमधील मॅग्नेशियम, आर्जिनिन आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवतात.
“पिस्त्याचा सर्वाधिक फायदा होतो, तो सिस्टोलिक बीपी २ मिमीएचजीने कमी करतो,” असं डॉक्टर सांगतात. मात्र, बिनमिठाचे नट्स खाणं योग्य.

५. फर्मेंटेड डेअरी – दही आणि केफिर

डॉ. सूद यांच्या मते, दही आणि केफिरमध्ये असलेले ACE-इनहिबिटिंग पेप्टाइड्स रक्तवाहिन्या प्रसरणास मदत करतात.
आठवड्यात काही वेळा कमी साखरेचं, लाइव्ह कल्चर असलेलं दही घेतल्याने ८ आठवड्यांत बीपीमध्ये सरासरी ५ मिमीएचजी घट होऊ शकते.

६. मिठाचं सेवन कमी करा

डॉ. सूद सांगतात, जास्त मीठ घेतल्याने शरीरात पाणी जास्त साठतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो.
“दररोजच्या मिठाचं प्रमाण २,३०० मिग्रॅ (सुमारे एक चमचा) पेक्षा कमी ठेवा. जर रक्तदाब जास्त असेल तर १,५०० मिग्रॅपर्यंत मर्यादा ठेवा,” असा सल्ला त्यांनी दिला आहे. तयार मसाले आणि प्रोसेस्ड खाद्य टाळा; त्याऐवजी ताजे अन्न आणि नैसर्गिक औषधी वनस्पती वापरा

डॉ. सूद म्हणतात, “औषधं काही वेळा आवश्यक असतात, पण आहारातील हे छोटे बदल दीर्घकाळासाठी रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकतात.” म्हणजेच, थोडं कमी मीठ, थोडं जास्त प्रोटीन आणि निसर्गाशी जुळलेला आहार हाच आहे हाय ब्लड प्रेशरवर नैसर्गिक उपाय!