Bone Health Supplements Risks: आजकाल आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असली तरी अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता, स्वतःहून व्हिटॅमिन किंवा मिनरल सप्लिमेंट्स घेण्याची सवय लावून घेत आहेत. विशेषतः हाडं मजबूत राहावीत आणि केस निरोगी राहावेत या उद्देशानं अनेक जण कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागले आहेत. मात्र अशा सवयी कधी कधी उलट शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात.

असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३२ वर्षांच्या एका महिलेला जास्त प्रमाणात कॅल्शियम घेतल्यामुळे थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. सुरुवातीला तिला काय होत आहे हे समजत नव्हतं; पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं.

डॉक्टरांच्या माहितीनुसार ही महिला काही दिवसांपासून विचित्र लक्षणांनी त्रस्त होती. तिला सतत थकवा जाणवणे, बद्धकोष्ठता, मळमळ आणि वारंवार लघवी होणे अशा तक्रारी होत होत्या. या लक्षणांमुळे ती गोंधळलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पोहोचली. पुढे केलेल्या तपासणीत तिच्या रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण १२.५ mg/dL आढळले. साधारणपणे शरीरात कॅल्शियमची सामान्य पातळी ८.५ ते १०.५ mg/dL दरम्यान असणे अपेक्षित असते. त्यामुळे तिच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढल्याचे स्पष्ट झाले.

कॅल्शियम एवढं वाढलं कसं?

तपासणीदरम्यान डॉक्टरांना कळलं की, या महिलेने ऑनलाइन मिळालेल्या सल्ल्यावर विश्वास ठेवून कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्यास सुरुवात केली होती. हाडं आणि केस मजबूत व्हावेत म्हणून ती नियमितपणे कॅल्शियमच्या गोळ्या घेत होती.

मात्र, येथे मोठी चूक झाली. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती दररोज आवश्यक असलेल्या १,००० mg ऐवजी जवळपास २,००० mg कॅल्शियमच्या गोळ्या दिवसातून तीन वेळा घेत होती. एवढ्यावरच ती थांबली नाही. कॅल्शियम शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जावे म्हणून तिने स्वतःहून व्हिटॅमिन D चे कॅप्सूलही सुरू केले.

त्याचबरोबर तिच्या रोजच्या आहारात दही, बदामाचे दूध, पनीर यांसारखे कॅल्शियमने समृद्ध पदार्थही मोठ्या प्रमाणात होते. परिणामी सप्लिमेंट्स आणि आहार या दोन्हीमधून जास्त प्रमाणात कॅल्शियम शरीरात जमा होऊ लागले.

जास्त कॅल्शियमचे दुष्परिणाम

शरीरात गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम जमा झाल्यास त्या स्थितीला हायपरकॅल्सेमिया, असे म्हटले जाते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या महिलेच्या शरीरावर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले होते.

अतिरिक्त कॅल्शियममुळे तिच्या किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आणि थायरॉईडचे कार्यही बिघडले. परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे डॉक्टरांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि IV फ्लुइड्स देऊन रक्तातील अतिरिक्त कॅल्शियम कमी करण्याचा उपचार सुरू केला.

तज्ज्ञांच्या मते, वेळेवर उपचार न मिळाल्यास अशा स्थितीत किडनी स्टोन, किडनीचे कायमस्वरूपी नुकसान, हृदयाची धडधड अनियमित होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. इतकेच नव्हे, तर मेंदूवर परिणाम होऊन गोंधळ, चिडचिड, नैराश्य यांसारखी लक्षणेही दिसू शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये व्यक्ती बेशुद्ध पडणे किंवा कोमात जाण्याची शक्यतादेखील असते. आश्चर्याची बाब म्हणजे जास्त कॅल्शियम घेतल्यानं हाडं मजबूत होण्याऐवजी ती अधिक कमजोर आणि ठिसूळ होण्याची शक्यताही असते.

प्रत्येकाला कॅल्शियम सप्लिमेंट गरजेचं असतं का?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याची आवश्यकता नसते. संतुलित आणि पोषक आहारातून शरीराला आवश्यक तेवढे कॅल्शियम मिळू शकते. सामान्यतः प्रौढ व्यक्तीसाठी दररोज १,००० ते १,२०० mg कॅल्शियम पुरेसे मानले जाते.

दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, टोफू, बदाम यांसारखे पदार्थ कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. उदाहरणार्थ, एका वाटी दह्यात सुमारे ३००-४०० mg कॅल्शियम, तर एका ग्लास दुधात सुमारे ३०० mg कॅल्शियम मिळू शकते.

कोणाला लागतात कॅल्शियम सप्लिमेंट?

कॅल्शियम सप्लिमेंट्स साधारणपणे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांच्या आजारांनी ग्रस्त व्यक्ती, व्हेगन आहार घेणारे लोक, लॅक्टोज असहिष्णुता असलेले रुग्ण, तसेच गर्भवती किंवा रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिले जातात.

डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

तज्ज्ञांच्या मते, कॅल्शियम शरीरासाठी अत्यंत आवश्यक असले तरी त्याचे अति प्रमाण शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कोणतेही व्हिटॅमिन किंवा मिनरल सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

सूचना (डिस्क्लेमर):
ही माहिती केवळ सामान्य जागरूकतेसाठी आहे. कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी नेहमी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.