Sunscreen Uses Tips: हल्ली लोक स्वत:च्या शरीराच्या फिटनेसबाबत अधिकाधित जागरूक होत आहेत. वजन कमी करण्यापासून ते मजबूत केस आणि सुंदर त्वचेसाठी लोक पौष्टिक पदार्थांच्या सेवनापासून ते विविध महागडे प्रॉडक्ट वापरण्यापर्यंत सर्व गोष्टी वापरतात. अकाली वृद्धत्व, त्वचा काळवंडणे, आणि त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी दररोज सनस्क्रीन लावण्याची शिफारस केली जाते. त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप सामान्य झाले आहे. अनेक लोकांना अशीही चिंता आहे की सनस्क्रीनमुळे व्हिटॅमिन डीचा प्रभाव कमी होतो. परंतु त्वचा तज्ज्ञांच्या मते, हा समज मोठ्या प्रमाणात खोटा आहे.
दररोज सनस्क्रीन वापरणे फायदेशीर की धोक्याचे?
त्वचातज्ज्ञांच्या मते, सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यावर व्हिटॅमिन डी त्वचेत प्रवेश करते. दुसरीकडे सनस्क्रीन त्वचेवर अतिनील किरणांना रोखण्यासाठी आणि शोषण्यासाठी लावले जाते. म्हणूनच बऱ्याच लोकांचे असे मत आहे की, दररोज सनस्क्रीन लावल्याने त्वचेमधील व्हिटॅमिन डीचे उत्पादन कमी होते. त्वचातज्ज्ञ आणि त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, हा परिणाम बहुतेकदा मानला जातो तितका गंभीर नाही. खरं तर, अनेक लोकांना सनस्क्रीन योग्यरीत्या कसे वापरावे हे माहीत नाही आणि म्हणूनच ते त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची शिफारस करतात.
सनस्क्रीन न लावण्याचे तोटे
त्वचा तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, लोक सहसा उन्हात चालतात आणि प्रवास करतात. या काळात सनस्क्रीन न लावल्याने त्वचेचा कर्करोग, अकाली वृद्धत्व, सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळी पडू शकते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, व्हिटॅमिन डीची कमतरता केवळ सनस्क्रीनमुळेच नाही, तर लोकांच्या जीवनशैलीमुळेही निर्माण होते. व्हिटॅमिन डी कमी करणाऱ्या बाबींमध्ये वायुप्रदूषण, कपडे आणि अस्वास्थ्यकर आहार यांचा समावेश आहे. त्वचातज्ज्ञ व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांना उन्हात जास्त वेळ घालवण्याचा सल्ला देतात. त्याशिवाय त्यांना दुग्धजन्य पदार्थ, अंडी, चरबीयुक्त मासे आणि तोंडी पूरक आहार घेण्याचा सल्लादेखील देतात.
सनस्क्रीन किती लावायला हवे?
लोक योग्य प्रमाणात सनस्क्रीन लावत नाहीत. बरेच जण अगदी थोड्याच प्रमाणात सनस्क्रीन वापरतात आणि ते पुरेसं आहे, असं त्यांना वाटतं. तुम्ही कमीत कमी तीन बोटांना पुरेल इतकी सनस्क्रीन वापरावी आणि ती तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर व कानाला लावायला हवी.
SPF 30 की SPF 50 कोणते सनस्क्रीन अधिक फायदेशीर?
अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की SPF 30 भारतीय हवामानासाठी पुरेसं आहे. आपल्या देशात कडक उन्हाचा सामना करताना, SPF 50 पेक्षा कमी SPF चं सनस्क्रीन वापरणंदेखील धोकादायक ठरू शकतं. नेहमी ब्रॉड-स्पेक्ट्रम सनब्लॉक निवडा, जो UVA, UVB किरण आणि निळ्या प्रकाशापासून तुमचं संरक्षण करेल. तुम्ही घरात असलात तरीही इलेक्ट्रॉनिक स्क्रीनच्या दीर्घकाळ वापरामुळे नुकसान होऊ शकते. तसेच सनस्क्रीनची परिणामकारकता कालांतरानं कमी होत जाते. त्यामुळे एक्स्पायर्ड प्रॉडक्ट्स वापरल्याने त्वचेला हानी पोहोचू शकते. आपल्या त्वचेला संभाव्य हानीपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन ढगाळ वातावरण असताना देखील लावा.

