Rice Benefit For Health: भात हा आपल्या भारतीय आहाराचा एक अविभाज्य भाग आहे. भाताशिवाय भारतीय व्यक्तीचे जेवण कधीच पूर्ण होत नाही. काही लोकांना भाताशिवाय दुसरे काहीही खायला आवडत नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का की, वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी भाताच्या विविध प्रकारांचा वापर केला जातो? मधुमेहापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी कोणता भात सर्वोत्तम आहे हे त्यातील घटक स्पष्ट करतात.
कोणत्या आजारावर कोणता भात खावा?
बासमती
मधुमेही अनेकदा विचारतात की, ते कोणता तांदूळ खाऊ शकतात. जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुम्ही प्री-डायबेटिक असाल आणि पांढऱ्या तांदळाऐवजी बासमती तांदूळ खाण्याचा विचार करीत असाल, तर बासमती तांदूळ एक उत्तम पर्याय असू शकतो. बासमती तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५० ते ५८ च्या दरम्यान असतो, जो कमी ते मध्यम मानला जातो. ग्लायसेमिक इंडेक्स तांदळाचा प्रकार, प्रक्रिया आणि शिजवण्याच्या पद्धतीनुसार बदलतो. त्यामुळे ही अभ्यासांवर आधारित अंदाजित मूल्ये आहेत. तर, सामान्य पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७० ते ९० च्या दरम्यान असतो. त्यामुळे मधुमेहींसाठी बासमती हा एक उत्तम पर्याय आहे.
सेला किंवा अर्ध-उकडलेला तांदूळ
अर्ध-उकडलेला तांदूळ मधुमेही रुग्णांसाठी सर्वोत्तम मानला जातो. कारण- त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे ३९-४६ असतो, जो ‘कमी ग्लायसेमिक इंडेक्स’ या श्रेणीत येतो.
सोना मसुरी
सोना मसुरी तांदूळ पचनासाठी उत्तम मानला जातो. कारण- त्यात स्टार्चचे प्रमाण कमी असते. तथापि, जर तुम्हाला मधुमेह, पीसीओडी किंवा उच्च इन्सुलिन प्रतिरोधकता असेल, तर हा तांदूळ खाणे टाळा. सोना मसुरी तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स अंदाजे ७२ आहे, जो जास्त आहे.
तपकिरी तांदूळ
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर पांढऱ्या तांदळाऐवजी तपकिरी तांदूळ खाण्याचा विचार करा. त्यात पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त प्रमाणात तंतू हा घटक असतो, ज्यामुळे शौचास नरम होण्यास मदत होते. तपकिरी तांदळात मॅग्नेशियमदेखील असते, जे शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्त्व आहे. तथापि, त्याचा सर्वांत मोठा तोटा म्हणजे त्यातील आर्सेनिकचे प्रमाण. त्यामुळे हा तांदूळ खाण्यापूर्वी २-३ वेळा धुऊन घ्यावा.
लाल तांदूळ
जर तुम्हाला तांदूळ खाऊन शरीरातील सूज कमी करायची असेल किंवा हृदयाचे आरोग्य सुधारायचे असेल, तर तुमच्या आहारात या तांदळाचा समावेश करा. कारण- त्यात मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
