Dahi Benefits: उन्हाळा असो वा हिवाळा, लोकांना प्रत्येक ऋतूत दही खायला आवडते. ताटात दह्याचा समावेश असल्याशिवाय भारतीय जेवण पूर्ण मानले जात नाही. दह्याचे ताक असो वा कोशिंबीर, तरी ते जेवणाबरोबर स्वादिष्ट लागते; पण तुम्हाला माहीत आहे का की ते आरोग्यासाठी खूप फायदेशीरदेखील आहे. दही खाल्ल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. याच कारणामुळे प्रत्येक डॉक्टर आहारात दह्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हीही दही खात असाल तर आज आम्ही तुम्हाला त्याचे फायदे आणि ते कसे खावे हे सांगणार आहोत.

दह्यामुळे खरंच कर्करोगाचा धोका कमी होतो?

अमेरिकन कॅन्सर असोसिएशनच्या मते, दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे चांगल्या जीवाणूंप्रमाणे काम करतात. हे जीवाणू आपल्या आतड्यांमध्ये प्रवेश करतात आणि वाईट जीवाणूंना नष्ट करण्यास मदत करतात. निरोगी आतड्यांमुळे तुमची पचनसंस्था आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड जीवाणू, कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे बी१२ असतात. दह्यामधील घटक आतड्यांची सूज कमी करतात, या सूजमुळे अनेकदा स्तनाचा, पोटाचा आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

कर्करोग प्रतिबंधासाठी दही किती फायदेशीर आहे?

दह्यात प्रोबायोटिक्स असतात

दह्यामधील प्रोबायोटिक्स आणि लॅक्टिक अॅसिड आतड्यातील चांगल्या जीवाणूंना वाढण्यास मदत करतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि सूज कमी होते. हे तुम्हाला पोटाच्या कर्करोगापासून वाचवण्यास मदत करू शकते.

कॅल्शियमचा स्रोत

दही हा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत मानला जातो. त्याचे सेवन केल्याने सांधेदुखी कमी होते आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता टळते. या कमतरतेमुळे कर्करोगाच्या पेशी तयार होण्यासही हातभार लागू शकतो.

भरपूर अँटीऑक्सिडंट्सने युक्त

दह्यामध्ये विविध अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. फ्री रॅडिकल्समुळे कर्करोगाच्या पेशी तयार होतात. दह्यामधील गुणधर्म त्यांची निर्मिती रोखण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन डीची कमतरता

व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते दह्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन डीच्या तीव्र कमतरतेमुळे स्तनाचा कर्करोग आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

दही कसे खावे?

  • पोषणतज्ज्ञ शिखा कुमारी म्हणतात की, तुम्ही दही तसेच खाऊ शकता, पण त्यात काही विशिष्ट घटक मिसळल्यास ते दुप्पट फायदेशीर ठरू शकते.
  • तुम्ही सॅलेड किंवा फळांबरोबर दही खाऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही दह्यामध्ये काकडी, पपई, सफरचंद, केळे, बेरी किंवा ब्रोकोली मिसळू शकता. यामुळे दह्यामधील पोषक तत्त्वे आणि भाज्या व फळे या दोन्हींचे फायदे मिळतील.
  • भारतात पारंपरिकरित्या दह्याचे रायते बनवले जाते. बुंदी रायता असो वा दुधी रायता, प्रत्येक पदार्थात दह्याचा वापर केला पाहिजे. दह्याचे रायते खाणे फायद्याचेही ठरते.
  • मधाबरोबर दही खाणेदेखील फायदेशीर आहे. मधामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे दह्यामध्ये विरघळतात. तुम्ही दह्यामध्ये १ चमचा मध घालून नैसर्गिक गोडवा म्हणून त्याचे सेवन करू शकता.

उन्हाळ्यात दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

  • दही योग्यरित्या खाल्ल्यास ते शरीरासाठी हानिकारक नसते. यामुळे पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते; परंतु वेळ, संयोजन आणि प्रमाण महत्त्वाचे आहे.
  • जेवण्याची सर्वोत्तम वेळ : दुपारचे जेवण, जेव्हा तुमची पचनशक्ती चांगली असते त्यावेळी दही खाणे अधिक फायदेशीर असते.
  • रात्रीच्या वेळी दही खाणे टाळा : रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने सर्दी, जडपणा किंवा झोपेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
  • कधीही नुसते दही खाऊ नका : पचनक्रिया सुधारण्यासाठी दह्यात नेहमी चिमूटभर काळी मिरी पावडर आणि भाजलेले जिरे मिसळा किंवा मसाला ताक बनवून प्या.
  • ‘या’ पदार्थांसह दही खाणं टाळा : मासे, कांदे किंवा जड जेवण या गोष्टींमुळे पचनक्रिया मंदावते. तसेच, या पदार्थांसह दही खाल्ल्यास शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतो.