how corn hair use for Kidney Cleansing : जुहू चौपाटीवर भाजलेला, लिंबू आणि मीठ लावलेलं कणीस खाणं म्हणजे वेगळंच सुख! मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाबरोबर गप्पागोष्टी करीत असा भाजलेला मका खाणं म्हणजे आगळा सुवर्णयोग! पण, अनेकदा मका खाताना त्याच्यावरचे केस कचऱ्यात फेकून दिले जातात. तुम्हीही असंच करीत असाल, तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
योग आणि वेलनेस प्रशिक्षक राधेशा यांनी नुकतेच मक्याच्या केसांचे म्हणजेच ‘कॉर्न सिल्क’चे आरोग्यासाठी होणारे फायदे सांगितले आहेत. त्यांच्या मते, मूत्रपिंड आणि मूत्रसंस्थेसाठी याचा भरपूर फायदा होतो. मूत्रपिंड, यकृत व मूत्राशयासाठी हे जणू एक औषध आणि लघवीचा प्रवाह वाढविणारे एक प्रकारचे ‘डायुरेटिक’ (मूत्रवर्धक) आहे. त्यामुळे मका खाल्ल्यानंतर त्याचे केस (कॉर्न सिल्क) कधीही तसेच फेकून देऊ नका,” अशा कॅप्शनसाहित त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मक्याच्या केसांचा उपयोग मूत्रपिंडातील खडे (kidney stones), वारंवार होणारा लघवीच्या मार्गाचा संसर्ग (UTI) आणि रक्तातील साखरेच्या समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. २५० मिली पाण्यात थोडे मक्याचे वाळलेले केस घालून पाच मिनिटे उकळवायचे आणि तेच पाणी गाळून प्यायचे.
आता प्रश्न उभा राहतो तो मक्याच्या केसांचे पाणी खरोखरच मूत्रपिंडाच्या आरोग्यास मदत करते का? मूत्रपिंडातील खडे किंवा लघवीच्या समस्यांवर गुणकारी ठरते का? तर याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली.
मक्याचे केस खरोखरच मूत्रवर्धक अन् मूत्रपिंडासाठी उपयुक्त असतात?
तज्ज्ञांच्या मते, मक्याच्या केसांमध्ये ‘डायुरेटिक’ (diuretic) गुणधर्म असतात, म्हणजेच ते लघवीचे प्रमाण वाढवू शकतात. शरीरातील द्रवाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरतात. त्यामुळेच मूत्रमार्गाच्या आरोग्यासाठी त्याचा पारंपरिकरीत्या वापर केला जातो. याच प्रक्रियेमुळे UTI चा धोका कमी होण्यासही मदत होते.
पण, याचबरोबर मक्याच्या केसांमध्ये असलेले काही नैसर्गिक घटक या ACE एंझाइमच्या कामात अडथळा आणू शकतात. रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या अनेक औषधांचे लक्ष्य हाच मार्ग असतो आणि मक्याच्या केसांमुळे रक्तदाबही काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच, यात महत्त्वपूर्ण अँटीऑक्सिडंट आणि दाह-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात, जे मूत्रपिंडाच्या उतींसाठी (tissues) फायदेशीर ठरू शकतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की, मक्याचे केस मूत्रपिंडाच्या आजारावर एक उपचार आहे.
त्यामुळे ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की, सौम्य डायुरेटिक प्रभावाद्वारे ‘मूत्रपिंडाच्या कार्याला मदत करणे’ आणि ‘मूत्रपिंडाचा आजार बरा करणे’ किंवा उलटवणे हे दावे एकसारखे नाहीत. हे सिद्ध करणारी मानवी चाचणी (human outcome trials) अद्याप तरी उपलब्ध नाही.
मक्याच्या केसांचे पाणी मूत्रपिंडातील खड्यांच्या समस्येत मदत करू शकते का?
मक्याच्या केसांमुळे नवीन खडे तयार होण्याची शक्यता कमी होऊ शकते. कारण- लघवीचा प्रवाह वाढल्याने मूत्रमार्गातील खनिजे आणि गाळाची (sediment) घनता कमी होऊ शकते. पण, नवीन खडे तयार होण्यापासून रोखण्यास मदत होत असली तरीही मात्र आधीच तयार झालेले खडे यामुळे विरघळत नाहीत. ज्या लोकांना किडनी स्टोन होण्याची शक्यता असते, त्यांच्यासाठी पुरेसे पाणी पिणे अधिक महत्त्वाचे आहे. फक्त फायदा हाच की, लघवीचे प्रमाण वाढल्याने त्यात खडे तयार होणाऱ्या खनिजांची एकत्र येण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
किडनी स्टोन टाळण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसे पाणी आणि इतर द्रवपदार्थ पिणे. जास्त द्रवपदार्थ घेतल्याने लघवी पातळ होते आणि लघवीतील खडे तयार करणाऱ्या खनिजांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे खडे होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. मक्याच्या केसांचे पाणी किंवा ‘कॉर्न सिल्क टी’ प्यायल्याने शरीराला द्रवपदार्थ मिळतात. त्यामुळे ते दिवसभराचे पाणी पिण्याचे प्रमाण पूर्ण करण्याचा एक पर्याय असू शकतो; पण ते साध्या पाण्याची जागा घेऊ शकत नाही.
म्हणून जर एखाद्याला आधीच किडनी स्टोन असेल, तर मक्याच्या केसांचे पाणी पिण्याकडे तो खडा नाहीसा करण्यासाठीचा उपचार म्हणून पाहू नये. जर तुम्हाला सक्रियपणे खडा बाहेर पडत असेल, तर हा तुमच्यासाठी उपाय नाही. योग्य पद्धत ही खड्याचा आकार आणि स्थान यांसारख्या घटकांवर अवलंबून असते, ज्यावरून तो नैसर्गिकरीत्या बाहेर पडू शकतो हे जाणकार वैद्यकीय चिकित्सकाच्या सल्ल्याने समजून घ्यायला हवे.
वारंवार होणाऱ्या यूटीआय (UTI) बद्दल काय?
मक्याचे केस लघवीचे प्रमाण वाढवून यूटीआयचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात; पण वारंवार होणाऱ्या संसर्गासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी येणे, ताप, लघवीतून रक्त येणे किंवा वेदना होणे यांसारख्या लक्षणांवर केवळ हर्बल पेयांद्वारे उपचार करू नयेत. तेव्हा जीवाणूंमुळे झालेल्या मूत्रमार्गाच्या संसर्गावर (UTI) दिल्या गेलेल्या अँटीबायोटिक्स किंवा इतर उपचारांसमोर मक्याच्या केसांच्या पाणी हा पर्याय समजू नका.
मक्याच्या केसांचे पाणी नियमितपणे पिणे सुरक्षित आहे का?
मक्याच्या केसांचे पाणी रक्तातील पोटॅशियमची पातळी कमी करू शकते आणि जेव्हा एखादी व्यक्ती आधीच डॉक्टरांनी लिहून दिलेले लघवीचे प्रमाण वाढविणारे औषध (डायुरेटिक) घेत असेल तेव्हा ही बाब विशेष महत्त्वाची ठरते. जर तुम्ही डॉक्टरांनी लिहून दिलेले डायुरेटिक घेत असाल, तर मक्याच्या केसांचे पाणी परिणामांची तीव्रता अधिक वाढवते. ज्या लोकांची मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी झाली आहे, त्यांनीदेखील वैद्यकीय सल्ल्याशिवाय मक्याच्या केसांच्या पाण्याचा वापर करणे टाळावे. कारण- त्यांची पोटॅशियम नियंत्रित करण्याची क्षमता आधीच कमी झालेली असू शकते. गर्भवती महिलांनी मक्याच्या केसांपासून तयार केलेले पाणी मर्यादित प्रमाणातच सेवन करावे, असा सल्ला दिला जातो. कारण- त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास गर्भाशयाचे आकुंचन उत्तेजित होण्याची शक्यता असते. तसेच, ज्यांना मक्याची ॲलर्जी आहे, त्यांनी या पाण्याचे सेवन टाळावे.
