Belly Fat And Cancer Risk : पोटावरील चरबी वाढण्याची समस्या झपाट्याने वाढतेय. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या समस्येने त्रस्त आहेत. लोक अनेकदा पोटावरील चरबीला वाईट दिसण्याशी जोडतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की पोटाच्या या वाढत्या चरबीने कॅन्सरचा धोका वाढतो; यामुळे तुमच्या पूर्ण आरोग्यावर घातक परिणाम होतो.
पोटाच्या वाढत्या चरबीमुळे केवळ कपड्यांचा आकार वाढत नाही तर यामुळे शरीरातही जैविक प्रक्रिया सुरू होत असतात, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा, अगदी कर्करोगाचाही धोका वाढू शकतो.
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पोटातील अवयवांभोवती साठलेली अंतर्गत चरबी (व्हिसरल फॅट) सतत दाहक रसायने आणि हार्मोन्स स्रवते, यामुळे शरीरात इन्सुलिन प्रतिरोध आणि हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितींमुळे दीर्घकाळात कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
पोटावरील चरबीमुळे कॅन्सरचा धोका वाढतो का?
अनेक अभ्यासांनुसार, अतिरिक्त वजन, विशेषतः पोटावरील अतिरिक्त चरबी, याचा संबंध कॅन्सरच्या वाढत्या धोक्याशी जोडला गेला आहे. याचा अर्थ असा नाही की बाहेर आलेले पोट असलेल्या प्रत्येकाला कॅन्सर होईलच. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. आहारात आणि जीवनशैलीत वेळेवर बदल केल्यास पोटावरील चरबीचा धोका आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या कमी करता येतात.
तुम्हाला माहीत आहे का की पोटावरील चरबीमुळे केवळ एक-दोनच नव्हे, तर अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात? अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वाढलेले पोट हे मोठ्या आतड्याच्या आणि गुदद्वाराच्या कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक आहे.
पोटाभोवती साठलेली अतिरिक्त चरबी शरीरात सतत दाह निर्माण करते आणि इन्सुलिन व आयजीएफ-१ (इन्सुलिन-लाइक ग्रोथ फॅक्टर-१) च्या पातळीवर परिणाम करू शकते. या बदलांमुळे पेशींची अनियंत्रित वाढ होऊ शकते. लठ्ठपणामुळे आतड्यातील सूक्ष्मजीवांच्या समूहातही बदल होऊ शकतो, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
यकृत आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका
पोटावरील अतिरिक्त चरबी हे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचे एक कारण मानले जाते. जेव्हा यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होते, तेव्हा कालांतराने त्यामुळे दाह आणि फायब्रोसिस होऊ शकतो. या स्थितीमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कॅन्सरचा धोका आणखी वाढू शकतो.
त्याचप्रमाणे पोटावर चरबी असलेल्या लोकांना स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो. जास्त वजन असलेल्या लोकांना टाईप २ मधुमेहाचा धोकाही वाढलेला असतो, ज्याचा संबंध स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या धोक्याशी असू शकतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी केवळ वजनावर लक्ष ठेवणे पुरेसे नाही; तुमच्या कमरेचा घेरदेखील मोजत राहा. साधारणपणे पुरुषांसाठी ९० सेमी (सुमारे ३५ इंच) पेक्षा जास्त आणि महिलांसाठी ८० सेमी (सुमारे ३१.५ इंच) पेक्षा जास्त कंबरेचा घेर हे वाढलेल्या आरोग्य धोक्यांचे लक्षण मानले जाते.
जर तुमचे पोटही मोठे असेल, तर ते कमी करण्यासाठी उपाययोजना करा. दररोज व्यायाम करणे, साखरेचे सेवन कमी करणे आणि आहारात फायबर व प्रथिनांचे प्रमाण वाढवणे फायदेशीर ठरू शकते.
