Urination 21 Seconds Rule: लघवी करणे ही आपल्या दैनंदिन आयुष्यातील अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, लघवीची वारंवारता, लघवी सुरू होण्यास लागणारा वेळ, प्रवाह आणि मूत्राशय पूर्ण रिकामा झाल्यासारखे वाटते की नाही, याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण लघवीच्या सवयींमध्ये अचानक झालेले बदल काही वेळा मूत्रमार्ग किंवा मूत्राशयाशी संबंधित समस्यांचे संकेत देऊ शकतात.
२१ सेकंदांचा ‘युरिनेशन रूल’ नेमका काय आहे?
‘Law of Urination’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या Georgia Institute of Technology मधील संशोधनात संशोधकांनी वेगवेगळ्या आकाराच्या सस्तन प्राण्यांच्या लघवीच्या प्रक्रियेचा अभ्यास केला. ३ किलोपेक्षा जास्त वजनाच्या सस्तन प्राण्यांमध्ये मूत्राशय रिकामा होण्यासाठी सरासरी सुमारे २१ ± १३ सेकंद लागल्याचे आढळले.
याच संशोधनामुळे सोशल मीडियावर ‘२१ सेकंदांचा नियम’ चर्चेत आला. मात्र, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणसाने नेमके २१ सेकंदांत लघवी केलीच पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास एखादा गंभीग आजार त्याला आहे.
मग लघवीला जास्त वेळ लागला तर?
लघवीचा वेग आणि कालावधी अनेक गोष्टींवर अवलंबून असू शकतो. तुम्ही किती पाणी प्यायलात, मूत्राशय किती भरले आहे, शरीराची स्थिती, वय आणि काही आरोग्य समस्या यामुळे फरक पडू शकतो.
मात्र, लघवी करताना वारंवार अडथळा जाणवणे, प्रवाह खूप मंद होणे, लघवी सुरू करण्यासाठी बराच वेळ लागणे किंवा मूत्राशय पूर्ण रिकामा न झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे सातत्याने दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. पुरुषांमध्ये प्रोस्टेट वाढल्यामुळेही लघवी सुरू होण्यास त्रास किंवा मूत्राशय पूर्ण रिकामा न होण्याची समस्या होऊ शकते.
वारंवार लघवीला लागतेय? याकडेही लक्ष द्या
दिवसभर नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला लागणे, अचानक तीव्र लघवीची भावना होणे किंवा लघवी गळणे याकडे दुर्लक्ष करू नका. NIDDK नुसार दिवसातून ८ किंवा त्याहून अधिक वेळा लघवीला होणे, लघवी करताना वेदना, लघवीत रक्त दिसणे किंवा लघवीच न होणे अशा परिस्थितीत वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
मूत्राशय निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ सवयी पाळा
पाणी पुरेसे प्या: शरीराला आवश्यक तेवढे द्रवपदार्थ घ्या. साधारणपणे लघवी काही तासांच्या अंतराने होईल इतके द्रवपदार्थ घेणे योग्य मानले जाते. मात्र किडनी किंवा हृदयाशी संबंधित आजार असल्यास पाण्याचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा.
लघवी जास्त वेळ रोखू नका: वारंवार लघवी रोखण्याची सवय मूत्राशयाच्या स्नायूंवर परिणाम करू शकते आणि मूत्राशय पूर्ण रिकामा होण्यात अडचण निर्माण होऊ शकते.
घाई करू नका: टॉयलेटमध्ये गेल्यानंतर आरामात लघवी करा आणि मूत्राशय शक्य तितका पूर्ण रिकामा होऊ द्या.
कॅफीन आणि अल्कोहोल कमी करा: कॉफी, चहा आणि कॅफीनयुक्त पेये काही लोकांमध्ये मूत्राशयाची जळजळ किंवा वारंवार लघवीची समस्या वाढवू शकतात. अल्कोहोलमुळेही लघवीचे प्रमाण वाढू शकते.
बद्धकोष्ठता टाळा: पुरेशा प्रमाणात फायबर, पाणी आणि नियमित शारीरिक हालचाल यामुळे बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत होऊ शकते. बद्धकोष्ठतेचा मूत्राशयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
२१ सेकंद हा शरीराच्या आरोग्याचा ‘पास-फेल’ नियम नाही. लघवी किती सेकंदांत होते यापेक्षा तुमच्या लघवीच्या सवयींमध्ये अचानक बदल झाला आहे का, लघवी करताना त्रास होतोय का किंवा मूत्राशय पूर्ण रिकामा होत नाहीये का, हे अधिक महत्त्वाचे आहे. अशी लक्षणे वारंवार जाणवत असतील तर स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
