Dandruff मुळे जगातील असंख्य लोक त्रस्त आहेत. जेव्हा स्कॅल्पची त्वचा काहीशी फुगीर होते आणि तेथे खाज यायला सुरुवात होते, त्या वेळी केसांमध्ये कोंडा होतो असे म्हटले जाते. कोंडा होण्यामागे विविध कारणे असू शकतात. ही समस्या दूर व्हावी यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. काही जण कोंडा रोखण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने शॅम्पूसारख्या उत्पादनांचा वापर करतात. तर काही आहारामध्ये बदल करतात. केसांमधील कोंडा कमी व्हावा यासाठी बरेचसे लोक लिंबाच्या रसाचा वापर करत असतात.
लिंबाच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. तसेच व्हिटॅमिन सीसह अन्य आवश्यक घटक असतात. यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत जाते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी लिंबाची मदत होते. पण लिंबाच्या रसामुळे केसामध्ये कोंडा होण्याची समस्या खरेच दूर होऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मनजोत मारवाह यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.




या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, आपल्या स्कॅल्पच्या त्वचेमधून सीबम हे नैसर्गिक तेल बाहेर येत असते. त्वचा हायड्रेट राहावी यासाठी या तेलाची मदत होत असते. या सीबमचे प्रमाण वाढल्याने केसामध्ये कोंडा होतो. सीबमच्या उत्पादनावर नियंत्रण राखल्यास ही समस्या कमी होण्याची शक्यता असते. आता राहिला प्रश्न लिंबामुळे Dandruff कमी होण्याचा, तर लिंबाच्या रसामुळे सीबमचे प्रमाण कमी होत नाही. याउलट जर लिंबाचा रस केसांमध्ये लावला, तर दुसऱ्या दिवशी स्कॅल्पमध्ये अधिक प्रमाणात सीबमची निर्मिती होते.
करिश्मा शाह, इन्टिग्रेटिव्ह न्युट्रिशनिस्ट आणि हेल्थ कोच यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये या विषयावर मत मांडले. डॉ. मनजोत मारवाह यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. “बहुसंख्य भारतीयांचे केस कोरडे असल्याने किंवा त्यांच्या स्कॅल्पमध्ये सीबमचे उत्पादन जास्त होत असल्याने त्यांच्या केसांमध्ये कोंडा होतो. लिंबाच्या तुरट गुणधर्मामुळे टाळू स्वच्छ होण्यास मदत होते. शिवाय त्यातील अँटीमाइक्रोबियल घटकांमुळे कोंडा कमी होऊ शकतो. लिंबाच्या रसामुळे स्कॅल्पचा pH संतुलित राहण्यासाठी मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक अॅसिड, फ्लेव्होनॉइड्स आणि आयर्न असे केसांच्या वाढीसाठीचे घटक असतात. लिंबाच्या रसामुळे स्कॅल्पमधील अतिरिक्त तेल काढण्यास मदत होते,” असे करिश्मा शाह म्हणाल्या.
आणखी वाचा – वर्क फ्रॉम होम करून पाठ खूप दुखतेय? रोज नियमितपणे करा ‘हे व्यायाम
पण त्यांनी लिंबाचा रस सरळसरळ स्कॅल्पवर न लावण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, “हा रस दही, मॅश केलेली केळी किंवा मध यांच्यासह मिक्स करून ते मिश्रण स्कॅल्पवर लावू शकता. कोंड्याचे प्रमाण जास्त असल्यास लिंबाचा रस यांसारखे घरगुती उपाय करू नयेत. यामुळे समस्या वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी कोंड्याचा त्रास दूर व्हावा यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावेत.”