Does Masturbation Reduce Sperm Count: आजच्या काळात पुरुषांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न गूगलवर मोठ्या प्रमाणात शोधले जातात. त्यापैकी सर्वांत जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते का? विशेषतः भारतातील तरुणांमध्ये याबाबत संभ्रम आणि भीती मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र, डॉक्टर काय सांगतात? हे जाणून घेतलं, तर तुमचे अनेक गैरसमज दूर होऊ शकतात.

फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. निमिषा शांतीलाल पांड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हस्तमैथुन केल्यानं प्रजनन क्षमतेवर कोणताही कायमस्वरूपी परिणाम होत नाही. मात्र, या विषयाचं पूर्ण चित्र समजून घेणं गरजेचं आहे.”

शरीरात नेमकं काय घडतं?

आपल्या शरीरात शुक्राणूंची निर्मिती सातत्याने सुरू असते. दररोज लाखो शुक्राणू तयार होत असतात आणि त्यामुळे शरीरात त्यांचा साठा कायम राहतो. मात्र, जर वारंवार वीर्यस्खलन (ejaculation) होत असेल, तर त्या वेळी वीर्याचं प्रमाण आणि शुक्राणूंची संख्या तात्पुरती कमी दिसू शकते.

Award Banner

“ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, आणि त्यामुळे शरीराचं काही नुकसान झालं आहे, असा त्याचा अर्थ होत नाही,” असं डॉ. पांड्या स्पष्ट करतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ (NIH) च्या माहितीनुसार, वीर्यस्खलनात जास्त अंतर ठेवल्यास त्या दोन्ही नमुन्यांतील वीर्याचे प्रमाण आणि शुक्राणूंची संख्या यांत जास्त फरक दिसू शकतो. पण, वारंवार वीर्यस्खलन केल्यास ही संख्या काही काळासाठी कमी दिसते. हा परिणाम तात्पुरता असतो आणि प्रजनन क्षमतेवर त्याचा कायमस्वरूपी परिणाम होत नाही.

रिपोर्टस का गोंधळात टाकतात?

अनेक वेळा पुरुषांना वीर्य तपासणी (semen analysis) मध्ये कमी संख्या दिसली, तर ते घाबरतात. पण खरं म्हणजे शुक्राणूंची गुणवत्ता वेळेनुसार बदलत असते.

यावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे घटक:

  • ताण (Stress)
  • झोपेची कमतरता
  • मद्यपान आणि धूम्रपान
  • शरीरातील पाण्याची कमतरता
  • ताप किंवा आजार
  • जास्त उष्णता (hot baths, laptop मांडीवर ठेवणे)

“एकाच रिपोर्टवरून निष्कर्ष काढू नये. तपासणी पुन्हा करणे आवश्यक असते,” असे डॉक्टर सांगतात.

खरा धोका कुठे?

हस्तमैथुन नव्हे, तर तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळेच खरा दुष्परिणाम घडून येतो.

शुक्राणूंच्या गुणवत्तेला अधिक हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे:

  • सततचा मानसिक ताण
  • धूम्रपान आणि मद्यपान
  • लठ्ठपणा
  • मधुमेह नियंत्रणात नसणे
  • अपुरी झोप

“वरील सवयीं सुधारणा केली, तर काही महिन्यांतच शुक्राणूंची गुणवत्ता सुधारू शकते,” असा आशादायक सल्ला तज्ज्ञ देतात.

वेळ महत्त्वाचा आहे का?

जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल किंवा तपासणी करणार असाल, तर वेळ महत्त्वाचा ठरतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), दोन ते सात दिवसांचा अवधी ठेवून नमुना दिल्यास अधिक अचूक रिपोर्ट मिळतो.

अंतिम निष्कर्ष

हस्तमैथुनामुळे शुक्राणूंची संख्या कायमस्वरूपी कमी होत नाही. तात्पुरता परिणाम होऊ शकतो; पण तो नैसर्गिक आहे. तुमच्या जीवनशैलीमुळे खऱ्या अर्थाने फरक पडतो.

“जर गर्भधारणा उशिरा होत असेल, तर त्यासाठी हस्तमैथुनाला दोष देऊ नका. योग्य तपासणी आणि जीवनशैलीतील बदल यावर लक्ष केंद्रित करा,” असा सल्ला डॉ. पांड्या देतात.