Hair Fall Causes Treatment : आजकाल केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या बनली आहे. अंघोळ करताना किंवा केस विंचरताना हातात आलेले केस पाहून, ‘आपल्याला काही आजार तर झाला नाही ना?’ अशी भीती व्यक्त करतो. दररोज किती केस गळणे सामान्य मानले जाते आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? मूठभर केस गळणे हे शरीरात कोणत्या घटकाची कमतरता असल्याचे लक्षण आहे का? तेल न लावल्याने खरोखरच जास्त केस गळतात का? तसेच मानसिक ताण, क्रॅश डाएट आणि वेगाने वजन कमी केल्यामुळे अचानक केस का गळू लागतात? या सर्व प्रश्नांचे उत्तर एका हिंदी वृत्तसंस्थेने डर्मेटोलॉजिस्ट डॉ. पंखुडी दुदानी यांच्याकडून मिळवले आहे.
रोज किती केस गळणे सामान्य?
दररोज किती केस गळणे सामान्य आहे आणि कधी काळजी करावी, याविषयी माहिती देताना डॉ. पंखुडी सांगतात की, दिवसाला साधारण १०० केस गळणे हे पूर्णपणे सामान्य आहे. प्राण्यांप्रमाणेच मानवी केसांचेही एक विशिष्ट चक्र (हेअर सायकल) असते. एका ठरावीक कालावधीपर्यंत केस वाढतात आणि त्यानंतर ते आपोआप गळून पडतात. त्यामुळे दररोज सुमारे १०० केस गळत असतील, तर घाबरण्याचे कारण नाही.
उशीवर किंवा खुर्चीवर जास्त केस दिसल्यास घ्या काळजी
डॉ. पंखुडी यांच्या मते, जर सकाळी उठल्यावर उशीवर खूप केस दिसत असतील किंवा खुर्चीवर बसल्यानंतर तिथेही केस साचलेले आढळत असतील, तर हे प्रमाण सामान्यतेपेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत केसगळतीकडे दुर्लक्ष न करता, योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे.
मूठभर केस गळणे कशाचे लक्षण?
हातात केस येण्याबाबत डॉ. पंखुडी सांगतात की, जेव्हा जेव्हा तुम्ही केसांमधून हात फिरवता आणि प्रत्येक वेळी हातात केस येतात, तर केसगळतीची समस्या गंभीर आहे. हे शरीरातील पोषणाची कमतरता किंवा मानसिक ताणामुळे असू शकते. त्यामुळे केस विंचरताना किंवा स्पर्श करताना जास्त केस निघत असतील, तर त्यामागच्या मुख्य कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे.
तेल न लावल्याने जास्त केस गळतात का?
डॉ. पंखुडी स्पष्ट करतात की, असा कोणताही थेट संबंध नाही. रोजच्या रोज डोक्याला तेल लावण्याची अजिबात गरज नसते. तेल न लावल्यामुळे केस गळत आहेत, हा एक समज आहे. मात्र, जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा हलक्या हाताने मसाज करतो, ज्यामुळे टाळूतील रक्तभिसरण सुधारून केसगळती काही प्रमाणात कमी होऊ शकते.
तणाव आणि क्रॅश डाएटमुळे केस का गळतात?
मानसिक ताण, क्रॅश डाएट आणि वेगाने वजन कमी करण्याच्या परिणामांविषयी डॉ. पंखुडी सांगतात की, जास्त मानसिक ताण घेणे, अचानक खूप वजन कमी करणे किंवा अचानक जेवण बंद करणे/कमी करणे यांमुळे केस गळू लागतात.
केस हे आपल्या शरीरासाठी ‘पर्यायी’ (Optional) मानले जातात, कारण- ते शरीराचे कोणतेही अत्यावश्यक कार्य करत नाहीत. त्यामुळे जेव्हा शरीराला ताण किंवा पोषणाची कमतरता जाणवते, तेव्हा शरीर सर्वांत आधी केसांकडे होणारा पोषक घटकांचा पुरवठा कमी करते. परिणामी, वाढणारे केस थांबतात आणि त्यांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ते गळू लागतात.
शॅम्पूमुळे नाही, तर हेअर डायमुळे वाढू शकते समस्या
शॅम्पूच्या वापराबाबत डॉ. पंखुडी सांगतात की, शॅम्पूमुळे केसांची स्वच्छता होऊन केस गळणे थांबण्यास मदत होऊ शकते; पण शॅम्पूमुळे केस गळत नाहीत. प्रत्येक शॅम्पूमध्ये रसायने असतात; परंतु केवळ शॅम्पूमुळे केस गळत नाहीत.
मात्र, तुम्ही केसांसाठी हेअर डाय वापरत असाल आणि त्यानंतर टाळूला थोडी जरी खाज येत असेल, तर शरीर त्या रसायनाला विरोध करत आहे हे समजून घ्या. काही लोकांना हेअर डाय लावल्यानंतर केसगळतीचा त्रास होऊ शकतो; पण शॅम्पूमुळे असा त्रास होत नाही.
