Sex And Weight Loss: सेक्स हा फक्त शारीरिक जवळीक साधण्याचा भाग नसून त्यादरम्यान शरीराची हालचाल वाढते, हृदयाचे ठोके वेगाने होतात आणि काही प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात. त्यामुळे ‘जिममध्ये जाण्याऐवजी सेक्स केल्याने वजन कमी होईल का?’ असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. पण सेक्सला नियमित व्यायामाचा पर्याय मानणं योग्य आहे का? याचं उत्तर थोडं वेगळं आहे.
सेक्सदरम्यान किती कॅलरीज बर्न होतात?
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सुमारे ३० मिनिटांच्या सेक्सदरम्यान ८५ ते १५० कॅलरीजपर्यंत ऊर्जा खर्च होऊ शकते. अर्थात हा आकडा व्यक्तीचे वय, वजन, शारीरिक क्षमता, हालचालींची तीव्रता आणि कालावधी यानुसार बदलू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे १०० कॅलरीज खर्च झाल्या तर त्या कालांतराने एकत्रित होऊ शकतात. मात्र, केवळ सेक्सच्या माध्यमातून लक्षणीय वजन कमी करण्यासाठी त्याची वारंवारता आणि कालावधी दोन्ही बराच जास्त असावा लागेल.
पण इथेच आहे मोठा ट्विस्ट!
३० मिनिटांचा सेक्स ही गोष्ट प्रत्यक्षात प्रत्येकासाठी सामान्य नसते. उपलब्ध माहितीनुसार, सेक्सचा सरासरी कालावधी यापेक्षा खूपच कमी, साधारण काही मिनिटांचा असतो.
याशिवाय सेक्सदरम्यान हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर सर्वाधिक वाढण्याचा कालावधीही तुलनेने कमी असतो. ऑर्गॅझमच्या आसपास हृदयाची गती झपाट्याने वाढू शकते; त्यानंतर ती पुन्हा तुलनेने लवकर सामान्य होऊ लागते. म्हणूनच सेक्सदरम्यान काही कॅलरीज बर्न होत असल्या तरी त्याला पूर्ण व्यायाम सत्र समजणं योग्य ठरणार नाही.
सेक्स म्हणजे किती प्रमाणात व्यायाम?
सेक्सदरम्यान शरीरावर येणारा ताण साधारण हलका ते मध्यम स्वरूपाच्या शारीरिक हालचालींसारखा असल्याचं अभ्यासांमधून दिसून झालं आहे. काही संशोधनांमध्ये त्याची तुलना दोन मजले पायऱ्यांनी चढण्यासारख्या शारीरिक मेहनतीशी करण्यात आली आहे. मात्र हा अनुभव प्रत्येक व्यक्तीसाठी सारखा असेलच असं नाही. वय, फिटनेसची पातळी, शारीरिक क्षमता आणि सेक्सचा कालावधी यानुसार शरीरावरचा ताण बदलू शकतो.
मग सेक्समुळे वजन कमी होत नाही का?
फक्त सेक्सवर अवलंबून राहून वजन कमी करणं अवघड आहे. वजन कमी करण्यासाठी शरीरातून खर्च होणाऱ्या कॅलरीज आणि आहारातून मिळणाऱ्या कॅलरीज यांच्यात सातत्यपूर्ण संतुलन आवश्यक असतं. सेक्समुळे काही ऊर्जा खर्च होते, पण बहुतांश लोकांसाठी ती नियमित व्यायामाची जागा घेण्याइतकी नसते. म्हणून वजन कमी करण्याचं उद्दिष्ट असेल तर संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप, आवश्यकतेनुसार व्यायाम यांचा एकत्रित विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे.
आठवड्यात किती व्यायाम आवश्यक?
प्रौढ व्यक्तींनी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आठवड्याला साधारण १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचं लक्ष्य ठेवावं, असा सल्ला साधारणपणे तज्ज्ञांकडून दिला जातो. वेगाने चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा नृत्य यांसारख्या हालचाली यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळे सेक्स हा शारीरिक हालचालीचा एक भाग असू शकतो; मात्र तो एकटाच संपूर्ण वर्कआउट मानणं योग्य नाही.
हेल्थलाईन या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सेक्सदरम्यान कॅलरीज नक्कीच बर्न होतात आणि हृदयाचे ठोकेही वाढतात. पण ‘सेक्स केलं की जिमची गरज नाही’ हा समज चुकीचा आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेस वाढवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहाराची जोड आवश्यक आहे.
