Hair Growth In Summer Vs Winter: उन्हाळ्यात केस अधिक वेगाने वाढतात असे अनेकदा म्हटले जाते, पण ही केवळ एक गैरसमजूत नाही; यात बरेच तथ्यही आहे. तज्ञांच्या मते, हवामानाचा आपल्या केसांच्या वाढीवर स्पष्टपणे परिणाम होतो. उन्हाळ्यात रक्ताभिसरण सुधारते आणि सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन डी केसांच्या मुळांना सक्रिय करते. यामुळेच या ऋतूत केसांची मुळे अधिक सक्रिय होतात आणि केसांची वाढ वेगाने होते.
मात्र हवामान बदलांबरोबर केसांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी पिणे आणि केसांची नियमित काळजी घेतल्यास केस प्रत्येक ऋतूत निरोगी आणि मजबूत राहू शकतात.
उन्हाळ्यात केस खरंच जास्त वेगाने वाढतात का ?
या प्रश्नाचे उत्तर आहे—हो, बऱ्याच अंशी. ‘ब्रिटिश जर्नल ऑफ डर्मेटोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, केसांची वाढ एका हंगामी चक्रानुसार होते.उन्हाळ्यात केसांची वाढ हिवाळ्यापेक्षा अंदाजे १० ते १५ टक्के अधिक वेगाने होऊ शकते.
ब्लड सर्कुलेशनचा परिणाम
उन्हाळ्यात शरीराची चयापचय क्रिया वेगवान होते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. याचा थेट फायदा टाळूला होतो. जेव्हा केसांच्या मुळांपर्यंत अधिक ऑक्सिजन आणि पोषण पोहोचते, तेव्हा केसांची वाढ देखील वेगाने होते.
व्हिटॅमिन डी
सूर्यप्रकाश हे उन्हाळ्याचे वैशिष्ट्य आहे आणि या सूर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थच्या मते, व्हिटॅमिन डी केसांच्या मुळांना सक्रिय करण्यास मदत करते. यामुळे नवीन केस वाढण्याची प्रक्रिया देखील सुधारते.
हिवाळ्यात वाढ थांबते का?
हिवाळ्यात थंड वाऱ्यांमुळे टाळू कोरडी पडते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे केसांच्या मुळांपर्यंत योग्य पोषण पोहोचण्यास अडथळा येतो, परिणामी केसांची वाढ मंदावते.
प्रत्येक ऋतूत केसांची वाढ योग्यप्रकारे होण्यास काय करावे?
१) टाळूची करा मालिश
रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी आठवड्यातून एकदा खोबरेल किंवा बदामाच्या तेलाने केसांना हलक्या हाताने मालिश करा.
२) पाणी आणि योग्य आहार
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणे महत्त्वाचे आहे. केसांना आतून मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात प्रथिने, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि बायोटिनचा समावेश करा.
३) वेळोवेळी कापा
दर ३-४ महिन्यांनी केस कापल्याने केसांचे दुभंगलेले टोक निघून जातात आणि केसांच्या वाढीवर परिणाम होत नाही.
४) योग्य काळजी
ऋतू कोणताही असो तुमच्या केसांचे खरे सौंदर्य तुमच्या काळजीवर अवलंबून असते. उन्हाळ्यात केसांची नैसर्गिक वाढ होते, तर हिवाळ्यात थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. योग्य रूटीन फॉलो करुन तुम्ही वर्षभर लांब, दाट आणि निरोगी केस मिळवू शकता.
