Smelly Urine: लघवीतून येणारी उग्र, अ‍ॅसिडसारखा दुर्गंध ही अनेकदा शरीरातील अंतर्गत बिघाडाची सूचना असू शकते. दैनंदिन आयुष्यात साधारणपणे दिवसातून सहा ते सात वेळा लघवी होणे हे आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते. किडनी शरीरातील अपायकारक घटक गाळून लघवीच्या माध्यमातून बाहेर टाकतात. त्यामुळे लघवीला हलका वास असणे स्वाभाविक असले, तरी तीव्र आणि सतत येणारी दुर्गंध ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन

मुंबईतील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या झेन अ‍ॅनेक्स येथील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट डॉ. आदित्य नायक यांच्या मते, लघवीतून सातत्याने येणारी अ‍ॅसिडसारखा दुर्गंध ही मूत्रमार्ग संसर्गाचे (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन – UTI) लक्षण असू शकते. लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी आल्याची भावना निर्माण होणे, बेंबीखाली किंवा कंबरेत वेदना जाणवणे, तसेच काही रुग्णांमध्ये थरथरणे आणि ताप येणे, अशी लक्षणे UTI मध्ये दिसून येतात. मात्र केवळ संसर्गच नव्हे, तर इतरही काही आजार लघवीच्या वासामागे कारणीभूत ठरू शकतात.

लघवीचा उग्र दुर्गंध येण्याची वैद्यकीय कारणे

मूत्रमार्ग संसर्गाबरोबरच अनियंत्रित मधुमेह, किडनीचे आजार आणि काही मेटाबॉलिक विकारांमुळेही लघवीच्या वासात बदल होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये शरीरात साखर किंवा कीटोनचे प्रमाण वाढल्यास लघवीला गोडसर किंवा अ‍ॅसिडसारखा वास येऊ शकतो. किडनीचे कार्य नीट न झाल्यास अपायकारक द्रव्ये शरीरात साठतात आणि त्याचा परिणाम लघवीच्या रंग व वासावर होतो.

दैनंदिन सवयींशी संबंधित कारणे

मुंबईतील ग्लेनेगल्स रुग्णालयातील यूरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव सांगतात की, अनेक वेळा ही दुर्गंध गंभीर आजारामुळे नसून जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळेही असू शकते. शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) झाल्यास लघवी अधिक गडद होते आणि तिची गंध तीव्र होते. लसूण, शतावरीसारखे काही पदार्थ, तसेच जीवनसत्त्वांच्या गोळ्या किंवा हर्बल सप्लिमेंट्स यांमुळेही लघवीचा वास बदलू शकतो. कॉफी किंवा मद्यपानानंतर काही काळासाठी लघवीला वेगळी गंध येणे सामान्य मानले जाते. गर्भावस्था किंवा रजोनिवृत्तीच्या काळातील हार्मोनल बदलांमुळेही काही महिलांमध्ये लघवीच्या वासात फरक जाणवतो.

डॉक्टरांकडे कधी जावे?

लघवीतून येणारी दुर्गंध काही दिवसांपुरती मर्यादित न राहता सतत जाणवत असेल, किंवा त्याबरोबर जळजळ, वेदना, ताप, लघवीच्या रंगात बदल दिसून येत असतील, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉ. नायक यांच्या मते, अशा वेळी लघवीची तपासणी, मायक्रोस्कोपी, युरिन कल्चर, रक्तातील साखरेची तपासणी आणि किडनी फंक्शन टेस्ट करणे उपयुक्त ठरते. या तपासण्यांमुळे संसर्ग, मेटाबॉलिक विकार किंवा इतर गंभीर समस्या वेळेत ओळखता येतात.

जीवनशैलीत करावयाचे बदल

पुरेसे पाणी पिणे हे लघवीची गडदपणा आणि तीव्र वास कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आहारात लसुण, शतावरी, कॉफी यांसारख्या पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवणे, तसेच अनावश्यक सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेणे उपयुक्त ठरते. कोणतीही औषधे किंवा जीवनसत्वे घेत असताना त्यांचा लघवीवर होणारा परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.

निष्कर्ष

लघवीच्या वासात अधूनमधून होणारा बदल सामान्य असू शकतो. मात्र हा बदल सातत्याने दिसून येत असल्यास आणि त्यासोबत इतर त्रासदायक लक्षणे जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. वेळेवर तपासणी आणि उपचार केल्यास किरकोळ वाटणाऱ्या समस्या गंभीर रूप धारण करण्यापासून रोखता येतात. त्यामुळे शरीर देत असलेल्या या सूचनांकडे गांभीर्याने पाहणे, हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे.

टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.