Ginger Side Effects In Summer: आल्याचा वापर चहापासून भाज्यांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. आयुर्वेदिक औषधांमध्येही आल्याच्या वापर महत्त्वाचा मानला जातो. चहा, भाज्या, कढी आणि वरणामध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचा समावेश केला जातो. आले फक्त पदार्थांची चवच वाढवत नाही, तर ते आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. आले झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे. आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आले हे सर्वांत उपयुक्त मानले जाते.
आले खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असे अनेक गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि विशेषतः घशाच्या समस्या कमी करतात. परंतु, उन्हाळ्यात आल्याचे सेवन करावे की नाही, याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. काही लोक आल्याच्या चहाशिवाय सकाळची कल्पनाच करू शकत नाहीत. मात्र, उन्हाळ्यात आले सेवन करणे हानिकारक ठरू शकते. म्हणून उन्हाळ्यात जास्त प्रमाणात आल्याचे सेवन का करू नये आणि ते सेवन प्रमाणातच असावे, हे आपण जाणून घेऊया.
उन्हाळ्यात जास्त आले खाण्याचे तोटे
आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. उष्ण हवामानात त्याचे सेवन केल्यास जास्त घाम येणे, अस्वस्थता आणि निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो.
निर्जलीकरण
आल्याच्या थर्मोजेनिक प्रभावामुळे जास्त घाम येऊ शकतो, ज्यामुळे निर्जलीकरण होते. त्याचे अनेक दुष्परिणामदेखील होऊ शकतात, विशेषतः जर तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलात नाही तर.
छातीत जळजळ आणि आम्लपित्त
आल्यामुळे पचन आणि पित्ताशयाच्या समस्या उदभवू शकतात. जास्त प्रमाणात आल्याचे सेवन केल्यास छातीत जळजळ होऊ शकते आणि आम्लपित्त वाढू शकते, ज्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात.
कमी रक्तदाब
आल्यामुळे रक्त पातळ होऊ शकते आणि रक्तदाब कमी होऊ शकतो. उन्हाळ्यात जेव्हा लोकांना उष्णतेमुळे आधीच कमी रक्तदाबाचा त्रास होत असतो, तेव्हा आल्याचे सेवन केल्यास चक्कर येऊ शकते आणि व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते.
त्वचेच्या समस्या
काही लोकांना आल्याची अॅलर्जी असू शकते, विशेषतः उष्ण हवामानात. त्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज आणि सूज येऊ शकते.
लक्षणांवर लक्ष ठेवा
उन्हाळ्यात आल्याचे सेवन प्रमाणातच करा आणि जर पोटात जळजळ होत असेल, तर सावधगिरी बाळगा आणि ताबडतोब सेवन थांबवा. जर तुम्ही आल्याचे सेवन करत असाल, तर शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
‘हे’ आजार असलेल्यांनी आल्याचे सेवन टाळा
पचनक्रियेशी निगडित आजार
जर कोणाला पचनाची समस्या असेल किंवा पचनक्रियेशी निगडित काही आजार असतील, तर अशा परिस्थितीत आले खाणे टाळावे. कारण- अशा व्यक्तींचे आजार बळावू शकतात. दिवसभरात पाच ग्रॅमपेक्षा जास्त आले खाल्ल्याने हार्टबर्न, डायरिया, सतत ढेकर येणे अशा समस्या येऊ शकतात.
रक्तस्रावाची समस्या
जर एखाद्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया होणार असेल, तर त्या व्यक्तीला त्याआधी किमान दोन आठवडे आधी आले न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण- आले खाल्ल्याने रक्तस्रावाची समस्या उदभवते.
कमी रक्तदाबाचा त्रास
ज्या व्यक्तींना रक्तदाब कमी होण्याचा त्रास आहे, त्यांनी आले खाणे टाळावे. कारण जास्त प्रमाणात आले खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्याची, अस्वस्थ वाटण्याची शक्यता असते.
त्वचेचीं किंवा डोळ्यांची अॅलर्जी
त्वचेची किंवा डोळ्याची अॅलर्जी असणाऱ्यांनी आले खाणे टाळावे. कारण- आले खाल्ल्याने ही अॅलर्जी वाढू शकते. जेवणात किंवा वातावरणात बदल झाल्यास काही जणांना लगेच त्वचेची किंवा डोळ्यांची अॅलर्जी होते, अशा व्यक्तींनी आले खाणे टाळावे.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
