Vegetables In Summer: तापमान ४० अंशांच्या पुढे गेले की, शरीरावरील उष्णतेचा ताण वाढतो. अशा वेळी फक्त पाणी पिणे पुरेसे ठरत नाही, तर रोजच्या आहारातही बदल करणे आवश्यक ठरते. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी हलका, पचायला सोपा आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेला आहार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या बाबतीत काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण- या ऋतूत पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे चांगले आरोग्य राखण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आम्ही अशा भाज्यांची यादी देत आहोत, ज्या तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत तुमच्या आहारात टाळल्या पाहिजेत.
उन्हाळ्यात कोणती भाजी खाऊ नये?
- उन्हाळ्यात लसूण जास्त प्रमाणात खाऊ नये. कारण- तो उष्ण गुणधर्माचा आहे. त्यामुळे लसूण खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढू शकते आणि त्वचेच्या समस्याही उदभवू शकतात.
- तसेच उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणेही टाळावे. जर तुम्ही कच्चा कांदा खाणार असाल, तर तो लिंबाच्या रसात मिसळून खावा. ती पद्धत सर्वोत्तम आहे.
- त्याचबरोबर फुलकोबीचा स्वभाव उष्ण असतो. त्यामुळे तुम्ही तो खाणेदेखील टाळावे. आल्याच्या बाबतीतही असेच आहे, त्याचाही स्वभाव उष्ण आहे, ते शरीरात उष्णता निर्माण करू शकते, ज्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या वाढू शकते.
- उन्हाळ्यात मशरूम खाणे टाळा. त्यामुळे ॲलर्जी होऊ शकते आणि शरीरावर प्रतिक्रिया होऊ शकते.
उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात?
- उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या भाज्या आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरते. दुधी भोपळा , दोडका, पेठा, काकडी व कच्चे केळे या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. या भाज्या पचायला हलक्या असून, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. लोह आणि फोलेटसाठी मोहरीच्या भाजीऐवजी हलके वाफवलेले पालक किंवा अळूची पाने अधिक योग्य पर्याय ठरतात.
- उन्हाळ्यात टोमॅटो ही भाजी एक चांगला पर्याय ठरू शकते. कारण- त्यात व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन हे घटक असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवण्यास मदत करतात.
- त्याव्यतिरिक्त तुम्ही वांगी, दुधी व बटाटे या भाज्या खाऊ शकता. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी उन्हाळ्यात हलके जेवण घेण्याचा प्रयत्न करा.
उन्हाळ्यात ‘हे’ नियम पाळा
- उन्हाळ्यात एकाच वेळी जास्त खाण्यापेक्षा कमी प्रमाणात, पण वारंवार खाणे योग्य ठरते. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही आणि शरीरातील उष्णता नियंत्रित राहते. भाज्या उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नये. कारण- त्यात पोषक घटक असतात. त्यावर लिंबू पिळल्यास व्हिटॅमिन सी मिळते आणि लोहाचे शोषण सुधारते.
- भाज्या वाफवून, उकडून किंवा हलक्या तेलात थोड्याशा परतून खाणे अधिक योग्य ठरते. त्यामुळे भाज्यांतील पाण्याचे प्रमाण टिकून राहते, पचन सुलभ होते आणि शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही.
