Dr Shriram Nene Diabetes Diet Tips: भारतीय जेवण म्हटलं की ताटात भात, पोळी, डाळ आणि भाजी आलीच! पण देशात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक जण भात आणि पोळी खाणं बंद करण्याचा निर्णय घेतात. काही जण तर डाळ आणि इतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांनाही दोष देतात. पण खरंच डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी आपले पारंपरिक भारतीय पदार्थ सोडण्याची गरज आहे का? यावर प्रसिद्ध हृदयरोग आणि छातीरोग शल्यचिकित्सक डॉ. श्रीराम नेने यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.
India Today च्या HealthWealth Summit मध्ये ’21 Days to Good Health’ या सत्रादरम्यान डॉ. नेने यांनी भारतीयांच्या आहाराच्या सवयी, डायबिटीजचे वाढते प्रमाण आणि आरोग्यदायी जीवनशैली यावर भाष्य केलं. त्यांच्या मते, डायबिटीज टाळण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी भात-पोळी पूर्णपणे बंद करण्यापेक्षा आपण काय खातो, किती खातो आणि दिवसभर किती शारीरिक हालचाल करतो, याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे.
भारतात डायबिटीजचं संकट किती गंभीर आहे?
भारतात डायबिटीज आणि डायबिटीजपूर्व स्थिती असलेल्या लोकांची संख्या चिंताजनक आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशात सुमारे १०.१ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, तर जवळपास १३.६ कोटी लोकांना मधुमेहपूर्व स्थिती (Prediabetes) आहे. या स्थितीत भविष्यात टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन (MDRF) आणि ICMR-INDIAB अभ्यासातून भारतीयांच्या आहारातील कार्बोहायड्रेट्सच्या प्रमाणाकडेही लक्ष वेधण्यात आलं आहे. भारतीयांच्या एकूण ऊर्जेच्या गरजेपैकी ६२.३ टक्के ऊर्जा कमी दर्जाच्या कार्बोहायड्रेट्समधून मिळते. यामध्ये रिफाइंड धान्य आणि साखरेचा समावेश होतो. मात्र, याचा अर्थ प्रत्येकाने भात आणि पोळी खाणं बंद करावं असा होत नाही.
भात आणि पोळी नव्हे, तर खाण्याची पद्धत ठरते महत्त्वाची
डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, भारतीयांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी बहुतांश लोक शेती किंवा शारीरिक कष्टाची कामं करत असत. त्यामुळे दिवसभरात मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होत असे. मात्र, आता अनेक जण आयटी कंपन्या, बीपीओ आणि ऑफिसमध्ये बसून काम करतात. त्यातच ऑनलाइन फूड डिलिव्हरीमुळे जास्त कॅलरी असलेले पदार्थ सहज उपलब्ध होतात. शारीरिक हालचाली कमी आणि खाण्याचं प्रमाण जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
डॉ. नेने यांनी सांगितले की, दक्षिण आशियाई लोकांमध्ये हृदयरोग आणि डायबिटीजचा धोका तुलनेने जास्त असतो. त्यामुळे केवळ कार्बोहायड्रेट्स खाण्यावर लक्ष केंद्रित न करता त्यांची गुणवत्ता, प्रमाण आणि शारीरिक हालचाली यांचा एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम करणाऱ्या खेळाडूला जास्त कार्बोहायड्रेट्सची गरज असू शकते. पण दिवसभर खुर्चीवर बसून काम करणाऱ्या व्यक्तीच्या आहाराचं गणित वेगळं असतं.
डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी ताटात काय असावं?
डॉ. नेने यांनी संतुलित आहारासाठी सोपं ‘प्लेट मॉडेल’ सुचवलं आहे. त्यांच्या पुस्तकातही या आहारपद्धतीचा उल्लेख आहे. या पद्धतीनुसार ताटात कोणत्या पदार्थांना किती जागा द्यावी, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
- अर्धं ताट भाज्यांचं: ताटातील ५० टक्के भाग फायबरयुक्त भाज्यांनी भरलेला असावा. यामुळे शरीराला फायबर आणि आवश्यक पोषक घटक मिळतात.
- एक चतुर्थांश भाग प्रथिनांचा: उर्वरित ताटातील २५ टक्के भाग डाळी, कडधान्यं, पनीर किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांसाठी ठेवावा.
- एक चतुर्थांश भाग कार्बोहायड्रेट्सचा: उरलेल्या २५ टक्के भागात भात, पोळी किंवा कमी प्रक्रिया केलेल्या धान्यांचा समावेश करता येतो.
म्हणजेच, भात किंवा पोळी खायची असल्यास त्यासोबत भरपूर भाजी आणि प्रथिनांचा स्रोत असणं आवश्यक आहे. केवळ भात-पोळी किंवा इतर कार्बोहायड्रेट्सवर आधारित जेवण घेणं टाळावं.
वडापाव खाणंही सोडावं लागणार नाही?
डायबिटीज किंवा वजन वाढण्याची भीती असल्यामुळे अनेक जण आपल्या आवडत्या पदार्थांपासून दूर राहतात. मात्र, डॉ. नेने यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्या मते, आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यातील घटकांमध्ये आरोग्यदायी बदल करता येतात. यासाठी त्यांनी मुंबईच्या लोकप्रिय वडापावचं उदाहरण दिलं. वडापावमध्ये बटाट्याचा वडा आणि पाव असे दोन्ही कार्बोहायड्रेट्सचे स्रोत असतात. पूर्वी शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांसाठी हा पदार्थ स्वस्त, पोटभरीचा आणि ऊर्जा देणारा पर्याय होता.
मात्र, आजची जीवनशैली लक्षात घेता त्यात काही बदल करता येऊ शकतात. डॉ. नेने यांनी त्यांच्या ‘This Versus That’ या मालिकेतील प्रयोगाचा उल्लेख केला. यामध्ये बटाट्याऐवजी रताळ्याचा वापर करून वडा तयार करण्यात आला. तसेच पावासाठी मिलेट्सचा पर्याय वापरण्याचाही प्रयोग करण्यात आला. तळण्याऐवजी एअर फ्राय किंवा बेक करण्याच्या पद्धतींचीही तुलना करण्यात आली. त्यांच्या मते, रताळ्यामध्ये फायबरचं प्रमाण असतं आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स बटाट्यापेक्षा कमी असू शकतो. या प्रयोगातील रताळ्याचा वडापाव चांगलाच लोकप्रिय ठरला. मात्र, पदार्थातील एक घटक बदलला म्हणजे तो पूर्णपणे आरोग्यदायी झाला, असं समजू नये. त्याचं प्रमाण, एकूण पोषणमूल्य आणि किती वेळा खातो, यालाही महत्त्व आहे.
चहा-कॉफीतील साखर कमी करण्यासाठी डॉ. नेने यांचा २१ दिवसांचा फॉर्म्युला
भारतीयांच्या रोजच्या आहारात चहा आणि कॉफीला विशेष स्थान आहे. मात्र, यामध्ये घातली जाणारी अतिरिक्त साखर आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. डॉ. नेने यांनी साखरेची सवय कमी करण्यासाठी छोट्या बदलांपासून सुरुवात करण्याचा सल्ला दिला आहे.
- पहिल्या सात दिवसांसाठी चहा किंवा कॉफीमधील साखर बंद करण्याचा प्रयत्न करा.
- त्यानंतर हा प्रयोग १४ दिवसांपर्यंत सुरू ठेवा.
- पुढे २१ दिवसांपर्यंत साखरेशिवाय चहा-कॉफी पिण्याची सवय लावा.
अचानक मोठे बदल करण्यापेक्षा हळूहळू साखरेची गोडी कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.
तसेच, साखरेऐवजी शुगर फ्री स्वीटनर वापरलं म्हणजे संपूर्ण आहार आरोग्यदायी झाला, असं समजू नये. उदाहरणार्थ, शुगर फ्री पेय पिऊन त्यासोबत अतिप्रमाणात कॅलरी असलेलं जेवण घेतल्यास त्याचा विशेष फायदा होणार नाही. संपूर्ण आहाराकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे. फळांमधील नैसर्गिक साखरेसोबत फायबर आणि इतर पोषक घटकही मिळतात. त्यामुळे संपूर्ण फळं संतुलित आहाराचा भाग असू शकतात. मात्र, फळांचे रस आणि साखरयुक्त पेय यांच्यात फरक ओळखणं गरजेचं आहे.
मुलांना लहानपणापासूनच लावा आरोग्यदायी खाण्याची सवय
डॉ. नेने यांच्या मते, आरोग्यदायी आहाराची सुरुवात मधुमेहाचं निदान झाल्यानंतर किंवा वजन वाढल्यानंतर करण्याऐवजी लहानपणापासूनच व्हायला हवी. मुलांना बक्षीस म्हणून वारंवार बिस्किटं, चॉकलेट किंवा गोड पदार्थ देण्याऐवजी फळं आणि पौष्टिक पर्यायांची सवय लावावी. त्याचबरोबर मुलांना स्वयंपाकात सहभागी करून घेतल्यास त्यांना अन्नपदार्थांचं महत्त्व समजू शकतं.
प्रत्येक दिवशी अगदी काटेकोर आहार पाळणं शक्य नसतं. काही वेळा आवडीचे पदार्थ खाल्ले जातील, व्यायाम चुकू शकतो. पण त्यामुळे संपूर्ण प्रयत्न सोडून देण्याची गरज नाही. सातत्याने छोटे बदल करणं अधिक महत्त्वाचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
