Acidity vs GERD Dr Shriram Nene Explains: जेवण झाल्यानंतर छातीत जळजळ होणे, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे किंवा तोंडात आंबट चव येणे, असा त्रास अनेकांना जाणवतो. अनेकदा याकडे साधी ॲसिडिटी समजून दुर्लक्ष केले जाते. काही जण लगेच औषध घेतात, तर काही घरगुती उपाय करून हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही लक्षणे वारंवार जाणवत असतील तर त्यामागे केवळ ॲसिडिटी नसून GERD नावाची समस्या असू शकते. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी या समस्येबाबत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
छातीत जळजळ होणे म्हणजे नेमकं काय?
जेवणानंतर छातीत जळजळ होणे किंवा पोटातील आम्ल घशाच्या दिशेने वर येत असल्याची जाणीव होणे, याला वैद्यकीय भाषेत ॲसिड रिफ्लक्स म्हणतात. पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत आल्यामुळे छातीत जळजळ, घशात खवखव आणि तोंडात आंबट चव अशी लक्षणे जाणवू शकतात.
कधीतरी असा त्रास होणे वेगळे; पण तो वारंवार होत असेल किंवा बराच काळ टिकत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी GERD म्हणजेच गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज ही समस्या असण्याची शक्यता असते.
पोटातील आम्ल वर का येते?
आपल्या अन्ननलिकेच्या खालच्या टोकाला एक स्नायूंची झडप असते. तिला लोअर इसोफेजियल स्फिंक्टर (LES) असे म्हणतात. आपण अन्न गिळल्यानंतर ही झडप उघडते आणि अन्न पोटात गेल्यावर पुन्हा बंद होते, त्यामुळे पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाण्यापासून रोखले जाते.
मात्र, ही झडप वारंवार सैल पडली किंवा योग्य प्रकारे बंद झाली नाही तर पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येऊ शकते, त्यामुळे छातीत जळजळ आणि घशात त्रास जाणवतो. डॉ. श्रीराम नेने यांनी स्पष्ट केलेल्या माहितीनुसार, वारंवार होणाऱ्या रिफ्लक्समागे ही प्रक्रिया महत्त्वाची असते.
खाण्यापिण्याच्या ‘या’ सवयी वाढवतात त्रास
आपल्या रोजच्या काही सवयींमुळे ॲसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो. एकाच वेळी भरपूर जेवणे, रात्री उशिरा जेवण करणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे यामुळे हा त्रास अधिक जाणवू शकतो.
याशिवाय तिखट पदार्थ, तेलकट आणि तळलेले पदार्थ, चहा-कॉफी, शीतपेये आणि मद्य यांमुळे काही व्यक्तींमध्ये ॲसिड रिफ्लक्सची लक्षणे वाढू शकतात. प्रत्येक व्यक्तीला एकाच पदार्थामुळे त्रास होतो असे नाही, त्यामुळे कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर जळजळ वाढते याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
दुर्लक्ष केल्यास अन्ननलिकेला होऊ शकतो त्रास
पोटातील आम्ल वारंवार अन्ननलिकेत येत राहिल्यास तेथील आतील आवरणाला सूज आणि जळजळ होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये जखमा किंवा अल्सरही निर्माण होऊ शकतात. सतत घसा खवखवणे, रात्री खोकला येणे किंवा झोपेत त्रास होणे अशी लक्षणेही काही रुग्णांमध्ये दिसू शकतात,
म्हणूनच वारंवार होणारी छातीत जळजळ ही केवळ किरकोळ समस्या समजून दुर्लक्षित करणे योग्य नाही.
डॉ. नेने यांनी सांगितलेल्या सवयी ठरतील उपयुक्त
ॲसिड रिफ्लक्सचा त्रास कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या वेळा आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी थोडे-थोडे आणि आवश्यक तेवढे खावे. रात्रीचे जेवण हलके ठेवावे. जेवल्यानंतर लगेच आडवे होऊ नये. पुरेसे पाणी प्यावे आणि मद्यपान तसेच धूम्रपान टाळावे.
अतिशय घट्ट कपडे किंवा कमरेभोवती घट्ट पट्टा वापरणेही काही व्यक्तींमध्ये त्रास वाढवू शकते, त्यामुळे आरामदायी कपड्यांची निवड करावी.
आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?
केळी, काकडी, दही, ओट्स, नारळपाणी आणि मऊ खिचडी यांसारखे पदार्थ काही व्यक्तींना पचायला हलके वाटू शकतात. मात्र, प्रत्येकाचा शरीरस्वभाव वेगळा असल्याने हे पदार्थ सर्वांनाच सारखे मानवतील असे नाही. तिखट, तेलकट आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास वाढत असेल तर त्यांचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरू शकते.
सतत ॲसिडिटी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या!
वारंवार छातीत जळजळ होणे, घशात आंबटपणा जाणवणे किंवा रात्री झोपताना त्रास होणे अशी लक्षणे दिसत असतील तर स्वतःच्या मनाने औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरजेनुसार डॉक्टर तपासण्या करून योग्य उपचार सुचवू शकतात. छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास, घाम येणे किंवा हात अथवा जबड्याकडे वेदना जाणे अशी लक्षणे असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
(लक्षात ठेवा: ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. ती वैद्यकीय निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. सततचा त्रास असल्यास पात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
