Dr. Shriram Nene Health Tips: वयाची विशी म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा! करिअरची सुरुवात, नवीन मित्रमैत्रिणी, फिरणं, मौजमजा आणि अनेक स्वप्नांचा पाठलाग करण्यात या वयातील तरुण व्यस्त असतात. या धावपळीत मात्र अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. व्यायामासाठी वेळ नसणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, जंक फूड खाणं अशा अनेक सवयी नकळत अंगवळणी पडतात. विशेष म्हणजे, या सवयींचा परिणाम लगेच दिसत नसल्यामुळे त्यांचं गांभीर्यही लक्षात येत नाही.

मात्र, वयाच्या विशीत केलेल्या आरोग्याविषयी चुका भविष्यात गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतात असा इशारा प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांनी दिला आहे. ‘द रणवीर शो’ या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी तरुणांच्या आरोग्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं होतं.

डॉ. नेने यांनी सांगितले की, “प्रत्येकाला आपण कोणत्याही गोष्टीने प्रभावित होणार नाही, असं वाटत असतं. विशीत असताना आपल्याला वाटतं की, आपल्याला काहीच होऊ शकत नाही आणि आपण काहीही करू शकतो. मात्र, दररोज आपण आपल्या शरीरावर किती ताण देत आहोत, हे आपल्या लक्षात येत नाही. पुढे जाऊन हृदयविकार, कॅन्सर किंवा इतर गंभीर आजार झाल्यानंतर मात्र मागे जाऊन चुका सुधारता येत नाहीत.”

विशीत असताना तरुणांकडून होणाऱ्या ‘या’ चुका आरोग्यासाठी धोकादायक

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. जगदीश जे. हिरेमठ यांच्या मते, विशीचं वय हे निरोगी आयुष्याचा पाया मजबूत करण्यासाठी सर्वात योग्य असतं. मात्र, या काळात काही चुकीच्या सवयी आरोग्याचं नुकसान करू शकतात.

१. व्यायामाकडे दुर्लक्ष करणं

करिअर, शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे अनेक तरुण व्यायामासाठी वेळ काढत नाहीत. सतत बसून राहण्याची सवय आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढणं, हृदयविकार आणि चयापचयाशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आठवड्यातून किमान १५० मिनिटं मध्यम स्वरूपाचा व्यायाम किंवा ७५ मिनिटं तीव्र स्वरूपाचा व्यायाम करणं आवश्यक आहे.

२. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी

फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, गोड पेये आणि जास्त साखर असलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. अशा आहारामुळे लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे.

३. अपुरी झोप घेणं

रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहणं, काम किंवा मनोरंजनासाठी जागरण करणं यामुळे झोपेचं वेळापत्रक बिघडतं. दीर्घकाळ अपुरी झोप घेतल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, नैराश्य आणि वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे दररोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.

४. तणावाकडे दुर्लक्ष करणं

करिअरची चिंता, आर्थिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध आणि कामाचा ताण यामुळे तरुणांमध्ये मानसिक तणाव वाढू शकतो. हा तणाव सतत कायम राहिल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. योग, ध्यान, आवडते छंद किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं यामुळे तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

५. धूम्रपान आणि व्यसनांच्या आहारी जाणं

मित्रांच्या संगतीत किंवा तणाव कमी करण्यासाठी काही तरुण धूम्रपान, मद्यपान आणि इतर व्यसनांकडे वळतात. मात्र, या सवयींचा शरीरावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यसनांपासून दूर राहणं हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय आहे.

विशीत केलेल्या आरोग्यदायी सवयी भविष्यात देतात मोठा फायदा

तज्ज्ञांच्या मते, विशीत केलेल्या आरोग्यविषयक निवडींचा परिणाम पुढील अनेक दशकांपर्यंत दिसू शकतो. या वयात निरोगी वजन राखणं, नियमित व्यायाम करणं आणि धूम्रपानापासून दूर राहणं यामुळे उच्च रक्तदाब, टाइप २ डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

निरोगी आयुष्यासाठी आजपासूनच करा ‘या’ गोष्टी

  • नियमित व्यायाम: चालणं, धावणं, सायकलिंग यांसारख्या कार्डिओ व्यायामांसोबत स्नायू मजबूत करणारे व्यायाम करा.
  • संतुलित आहार: ताजी फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिनांचा आहारात समावेश करा. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि गोड पेये कमी करा.
  • पुरेशी झोप: दररोज ७ ते ८ तास झोप घ्या. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा.
  • तणाव व्यवस्थापन: योग, ध्यान आणि आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढा.
  • व्यसनांपासून दूर राहा: धूम्रपान, अतिमद्यपान आणि अमली पदार्थांचं सेवन टाळा.

आज आरोग्याची काळजी घेतली तर उद्याचा धोका कमी होऊ शकतो

विशीत असताना शरीर मजबूत आहे, आपल्याला काहीही होणार नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र, आजच्या चुकीच्या सवयींचे परिणाम काही वर्षांनी दिसू शकतात. त्यामुळे गंभीर आजार होण्याची वाट पाहण्यापेक्षा आधीपासूनच आरोग्याची काळजी घेणं अधिक फायदेशीर ठरतं.

तज्ज्ञांच्या मते, तरुण वयात निरोगी जीवनशैलीचा स्वीकार केल्यास तणावाचा सामना करण्याची क्षमता वाढू शकते, आजारातून बरे होण्यास मदत मिळू शकते आणि पुढील आयुष्यातही चांगली जीवनशैली टिकवता येऊ शकते. त्यामुळे वयाची विशी ही केवळ करिअर आणि स्वप्नं पूर्ण करण्याची वेळ नाही, तर निरोगी भविष्याची पायाभरणी करण्याचीही योग्य वेळ आहे.