Oils For Healthy Heart: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हृदयविकाराच्या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. कमी वयात हृदयविकाराचा झटका येणे, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्या अनेकांना त्रास देताना दिसतात, त्यामुळे नेमकं काय खावं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता असते. विशेष म्हणजे, आपण रोजच्या स्वयंपाकात वापरत असलेलं तेलही आपल्या हृदयाच्या आरोग्यावर मोठा परिणाम करतं असं तज्ज्ञ सांगतात.

दरम्यान, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती आणि प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांनी नुकत्याच एका व्हिडीओमध्ये हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या काही तेलांबाबत माहिती दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाच तेलांचा उल्लेख केला असून, योग्य प्रमाणात वापरल्यास ही तेलं हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असं त्यांनी सांगितलं आहे.

डॉ. नेने यांनी व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं की, ‘कोणतंही तेल मर्यादित प्रमाणात वापरणं महत्त्वाचं आहे.’ कारण अति प्रमाणात कोणतीही गोष्ट शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. मात्र, योग्य तेलाची निवड केल्यास हृदय निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.

तांदळाच्या कोंड्याचं तेल

डॉ. नेने यांनी सर्वप्रथम तांदळाच्या कोंड्याच्या तेलाचा उल्लेख केला आहे. हे तेल असंतृप्त मेदांनी समृद्ध असल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होऊ शकते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे तेल उपयुक्त मानलं जातं.

शेंगदाणा तेल

भारतीय घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं शेंगदाणा तेलही हृदयासाठी चांगलं मानलं जातं. या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड मेद असतात. हे घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात. तसेच यात असलेलं व्हिटॅमिन ई शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतं, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

मोहरीचं तेल

मोहरीचं तेल अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने वापरलं जातं. या तेलामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. याशिवाय मोहरीच्या तेलातील अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात, त्यामुळे रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

ऑलिव्ह ऑइल

सध्या फिटनेस आणि आरोग्याबाबत जागरूक असलेले अनेक लोक ऑलिव्ह ऑइलचा वापर करताना दिसतात. डॉ. नेने यांच्या मते, ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेलं ओलेइक अॅसिड वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतं. याशिवाय यात पॉलीफेनॉल्स आणि व्हिटॅमिन ईसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. भूमध्य समुद्रकिनारी देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या आहारपद्धतीतही ऑलिव्ह ऑइलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

तीळाचं तेल

तीळाचं तेलही आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या तेलामध्ये चांगले मेद मोठ्या प्रमाणावर असतात, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. याशिवाय यात सेसमॉल आणि सेसमिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाचं संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तसेच या तेलामध्ये मॅग्नेशियमही आढळतं, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

आजकाल वाढत्या हृदयविकाराच्या घटनांमुळे लोक आपल्या आहाराबाबत अधिक जागरूक होताना दिसत आहेत. अशावेळी योग्य तेलाची निवड करणंही तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं. मात्र कोणतंही तेल वापरताना प्रमाणाचं भान ठेवणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ वारंवार सांगतात. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली यांच्या मदतीने हृदय दीर्घकाळ निरोगी ठेवता येऊ शकतं.