Dr Shriram Nene Healthy Knee Tips: वय वाढत गेलं की अनेकांना एक समस्या हळूहळू जाणवू लागते… जिने चढताना त्रास होणं, उठताना गुडघ्यांत वेदना होणं, चालताना कटकट आवाज येणं किंवा थोडं चाललं तरी पाय थकून जाणं. सुरुवातीला अनेकजण या त्रासाकडे दुर्लक्ष करतात, पण काळ जसजसा पुढे जातो, तसतसं हेच दुखणं दैनंदिन आयुष्य कठीण करू शकतं.
विशेष म्हणजे शरीराचं संपूर्ण वजन सांभाळण्याचं मोठं काम गुडघे करत असतात, त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती आणि प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. श्रीराम नेने यांनी नुकत्याच एका सोशल मीडिया पोस्टमधून गुडघे निरोगी ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत.
डॉ. नेने यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मजबूत गुडघे म्हणजे मजबूत आयुष्य. आज घेतलेली काळजी भविष्यातील वेदनामुक्त आयुष्य ठरवू शकते.” त्यांनी सांगितलेल्या काही साध्या पण प्रभावी सवयींकडे दुर्लक्ष केल्यास पुढे मोठा त्रास होऊ शकतो, त्यामुळेच त्यांच्या या टिप्स सोशल मीडियावर वेगाने चर्चेत आल्या आहेत.
गुडघ्यांसाठी योग्य हालचाल का महत्त्वाची?
अनेकांना वाटतं की गुडघे दुखत असतील तर जास्त हालचाल करू नये. मात्र तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रकारचा व्यायाम गुडघ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
डॉ. श्रीराम नेने यांनी सायकल चालवणं, पोहणं आणि चालणं यांसारखे कमी ताण देणारे व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, हे व्यायाम सांध्यांवर अतिरिक्त दबाव न आणता स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात.
ते म्हणाले, ‘उड्या मारणारे किंवा अतितीव्र व्यायाम गुडघ्यांवर अतिरिक्त ताण आणू शकतात, त्यामुळे योग्य प्रकारची हालचाल निवडणं गरजेचं आहे.’
ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. विनय कुमारस्वामी यांनीही सायकल चालवण्याचे फायदे सांगताना म्हटलं की, ‘सायकल चालवल्याने सांध्यांमधील द्रवाचं उत्पादन वाढतं, त्यामुळे गुडघ्यांना आवश्यक असलेली हालचाल सुरळीत राहण्यास मदत मिळू शकते.’
वाढलेलं वजन गुडघ्यांना किती त्रास देतं?
अनेकांना ही गोष्ट माहिती नसते की शरीरातील वाढलेलं वजन थेट गुडघ्यांवर परिणाम करतं.
डॉ. नेने यांनी सांगितलं की, ‘शरीरात वाढलेला केवळ १ किलो अतिरिक्त भार गुडघ्यांवर जवळपास ४ किलो दाब निर्माण करू शकतो.’
म्हणूनच संतुलित आहार, नियमित चालणं आणि वजन नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचं मानलं जातं.
दिल्लीतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रमनीक महाजन यांनी सांगितलं की, “दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणं गुडघ्यांसाठी घातक ठरू शकतं. प्रत्येक तासाला थोडं चालणं शरीरासाठी चांगलं ठरतं.”
त्यांनी सूज किंवा वेदना असल्यास थंड किंवा गरम शेक घेण्याचाही सल्ला दिला.
गुडघ्यांना आधार देणारे स्नायू मजबूत ठेवा
गुडघे एकटे काम करत नाहीत. त्यांच्या आसपासचे स्नायू मजबूत असणं तितकंच महत्त्वाचं असतं.
तज्ज्ञांच्या मते, मांडी आणि पोटरीचे स्नायू मजबूत असतील तर गुडघ्यांवरील ताण कमी होऊ शकतो, त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा साधे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
डॉ. महाजन म्हणाले, “चुकीच्या पद्धतीने बसणं किंवा उभं राहणं यामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव येतो, त्यामुळे शरीराची ठेवण योग्य ठेवणं आवश्यक आहे.”
चुकीच्या चपलादेखील ठरू शकतात कारण
अनेकजण स्टाईलसाठी कोणत्याही प्रकारच्या चपला किंवा बूट वापरतात, पण तज्ज्ञांच्या मते चुकीच्या पादत्राणांचा परिणाम थेट गुडघ्यांवर होऊ शकतो.
डॉ. नेने यांनी पायांना योग्य आधार देणारे आणि मऊ तळाचे बूट वापरण्याचा सल्ला दिला आहे. झिजलेल्या चपला किंवा अयोग्य पादत्राणांमुळे चालण्याची पद्धत बदलू शकते आणि त्याचा ताण गुडघ्यांवर येऊ शकतो.
दुखापत झाल्यास ‘RICE’ पद्धत उपयोगी
गुडघ्याला किरकोळ दुखापत झाल्यास त्वरित काळजी घेणं महत्त्वाचं असतं. यासाठी ‘RICE’ पद्धतीचा उपयोग केला जातो.
- R म्हणजे विश्रांती
- I म्हणजे बर्फाने शेक
- C म्हणजे दाब देणारी पट्टी
- E म्हणजे पाय उंचावर ठेवणं
तज्ज्ञांच्या मते, या पद्धतीमुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण शरीराकडे दुर्लक्ष करतात. मात्र, गुडघे निरोगी ठेवायचे असतील तर योग्य आहार, नियमित हालचाल आणि योग्य सवयी लावणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर सांगतात.
