Dr Shriram Nene’s 5 Habits for a Long, Healthy Life: बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे हृदय व छातीच्या शस्त्रक्रियांचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्य, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीशी संबंधित माहिती नियमितपणे शेअर करीत असतात. नुकतेच त्यांनी दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे दीर्घायुष्य मिळणे हे एखादे विशेष गुपित नसून, रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या सवयी त्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतात, असे डॉ. नेने यांचे म्हणणे आहे.

डॉ. नेने यांच्या मते, दीर्घायुष्य म्हणजे केवळ आयुष्यात काही वर्षांची भर घालणे नव्हे, तर वाढत्या वयातही शरीर आणि मन सक्षम ठेवून चांगल्या पद्धतीने जीवन जगणे होय. त्यासाठी त्यांनी हालचाल, विश्रांती, योग्य आहार, मनःशांती व सामाजिक संबंध या पाच गोष्टींवर भर दिला आहे.

१. शरीराची सतत हालचाल ठेवा

डॉ. नेने यांच्या मते, हालचाल हीच औषधासारखी आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने वाढत्या वयात शरीराची लवचिकता आणि ताकद टिकून राहण्यास मदत होते. त्यासाठी रोजच व्यायामशाळेत जाण्याची गरज नाही. लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करणे, उद्यानात चालणे किंवा सायकल चालवणे अशा छोट्या गोष्टीही फायदेशीर ठरू शकतात.

नियमित शारीरिक हालचालींमुळे हृदयविकार आणि टाईप-२ मधुमेहासारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे दिवसभर एकाच जागी बसून राहण्याऐवजी शरीराला सक्रिय ठेवणे महत्त्वाचे आहे.

२. शरीराला पुरेशी विश्रांती द्या

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण विश्रांतीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, शरीरासाठी आराम हा वेळेचा अपव्यय नसून, शरीराच्या पुनर्बांधणीचा महत्त्वाचा भाग आहे.

डॉ. नेने यांनी शांत वातावरणात वेळ घालवणे, पुरेशी झोप घेणे, काही वेळ उन्हात राहणे किंवा पुस्तक वाचणे यांसारख्या सवयींचा उल्लेख केला आहे. पुरेशी झोप आणि विश्रांती शरीराला ताजेतवाने होण्यास, तसेच तणाव कमी करण्यास मदत करते.

३. आहाराकडे दुर्लक्ष करू नका

तंदुरुस्त शरीराचा लाभ होण्यासाठी तशा योग्य आहाराचे सेवन करणे अत्यावश्यक आहे. डॉ. नेने यांनी आहारात फळे, कडधान्ये, सुका मेवा, दही आणि घरच्या घरी तयार केलेल्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

संपूर्ण धान्ये, फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहार घेतल्यास हृदयविकार आणि काही गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे चविष्ट पदार्थांसोबतच शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत आहेत का, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

४. मन शांत ठेवायला शिका

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. सततचा ताण आणि धावपळ शरीरावरही परिणाम करू शकते. त्यामुळे स्वतःच्या मनाला काही काळ शांत ठेवणे आवश्यक आहे.

मन:शांती मिळण्यासाठी संगीत ऐकणे, प्रार्थना करणे, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे किंवा जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने संवाद साधणे उपयोगी ठरू शकते. डॉ. नेने यांच्या मते, काही वेळ थांबणे, दीर्घ श्वास घेणे आणि स्वतःला पुन्हा शांत करण्याची सवय लावून घेणे महत्त्वाचे आहे.

५. आपल्या माणसांशी जोडलेले राहा

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे कुटुंबीय, मित्र आणि जवळच्या व्यक्तींशी असलेले संबंध मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरतात. कुटुंबासोबत जेवण करणे, मित्रांशी संवाद साधणे किंवा एकत्र फिरायला जाणे यांसारख्या साध्या गोष्टी मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतात.

मजबूत सामाजिक संबंधांमुळे मानसिक आरोग्याला आधार मिळतो आणि एकटेपणाची भावना कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्यदायी आयुष्यासाठी केवळ आहार आणि व्यायामावर लक्ष न देता, आपल्या माणसांसाठीही वेळ काढणे तितकेच गरजेचे आहे.

दीर्घायुष्याचे गुपित मोठ्या गोष्टींत नाही!

डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलेल्या या पाच सवयी पाहिल्या, तर दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी कोणताही अवघड नियम नाही, हे लक्षात येते. रोज थोडीशी हालचाल, पुरेशी झोप, पौष्टिक आहार, मनःशांती आणि आप्तस्वकीयांशी चांगले संबंध या साध्या सवयी अंगीकारल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकते. अर्थात, व्यक्तीच्या आरोग्यस्थितीनुसार तिच्या आहार किंवा जीवनशैलीत कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.