Dr Shriram Nene Weight Loss Tips: आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या डाएटचा आधार घेतात. काही जण दिवसभर उपाशी राहतात; तर काही जण कार्बोहायड्रेट पूर्णपणे बंद करतात. काही दिवसांत वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण आपल्या आरोग्याशी खेळ करतात. मात्र, हा मार्ग योग्य आहे का? याबाबत प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

डॉ. नेने यांच्या मते, वजन कमी करणे म्हणजे स्वतःला उपाशी ठेवणे किंवा आवडते अन्न कायमचे सोडणे नव्हे. खरे वजन नियंत्रण म्हणजे अशी जीवनशैली स्वीकारणे, जी दीर्घकाळ सहजपणे पाळता येईल आणि शरीराला कोणताही त्रास होणार नाही. अनेक जण काही आठवड्यांत मोठ्या प्रमाणात वजन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवतात. मात्र, अशा घाईमुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

त्यांच्या मते, ३० दिवसांत १० किलो किंवा काही महिन्यांत २० किलो वजन कमी करण्याचा हट्ट धोकादायक ठरू शकतो. शरीराला बदल स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे वजन हळूहळू आणि नियोजनबद्ध पद्धतीने कमी करणे अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असते.

डॉ. नेने सांगतात की, वजन कमी करण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘कॅलरी डेफिसिट’. म्हणजेच शरीराला जितक्या उष्मांकांची गरज आहे, त्यापेक्षा दररोज सुमारे २०० ते ४०० उष्मांक कमी घेणे. त्यामुळे शरीर साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरू लागते आणि वजन नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत होते.

मात्र, याचा अर्थ अन्न कमी करणे नव्हे, तर योग्य त्या अन्नपदार्थांची निवड करणे होय. अनेक जण वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट पूर्णपणे बंद करतात. पण डॉ. नेने यांच्या मते, हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. कार्बोहायड्रेट हा घटक शरीरासाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे. तो पूर्णपणे टाळल्यास अशक्तपणा, थकवा व कामात लक्ष न लागणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

त्याऐवजी संपूर्ण धान्यांपासून तयार होणारे पदार्थ, ओट्स, ज्वारी, बाजरी, गहू, तसेच प्रथिनांनी भरपूर असलेले अन्न आहारात समाविष्ट करावे. कडधान्ये, डाळी, सुका मेवा आणि इतर पौष्टिक पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात. हे पदार्थ पोट अधिक वेळ भरल्यासारखे ठेवतात आणि वारंवार भूक लागण्याचे प्रमाणही कमी करतात.

प्रवास करताना किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यास तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शेंगदाणे, सुका मेवा किंवा इतर आरोग्यदायी अल्पोपाहार जवळ ठेवावेत. त्यामुळे भूकही भागते आणि अनावश्यक उष्मांख शरीरात जाण्यापासून बचाव होतो.

डॉ. नेने हेही स्पष्ट करतात की, जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे शक्य तितके कमी सेवन करावे. मात्र, आयुष्यभर आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. कधीतरी आवडीचा पदार्थ खाल्ला तरी हरकत नाही; पण त्याचे प्रमाण आणि उष्मांक यांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

केवळ आहार बदलून वजन कमी होत नाही. त्यासाठी नियमित शारीरिक हालचालही तितकीच आवश्यक आहे. चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे किंवा व्यायामशाळेत व्यायाम करणे यांमुळे उष्मांक खर्च होतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र, शरीरावर गरजेपेक्षा जास्त ताण देणे टाळावे. व्यायामाइतकीच विश्रांती आणि शरीराला पुनर्बल मिळण्यासाठी पुरेशी झोपही आवश्यक आहे.

डॉ. नेने यांच्या मते, वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. योग्य आहार, नियंत्रित उष्मांक, नियमित व्यायाम व सातत्यपूर्ण जीवनशैली या चार गोष्टी अंगीकारल्यास वजन सुरक्षितपणे कमी करता येते. त्यामुळे झटपट परिणामांच्या मागे धावण्यापेक्षा आरोग्यदायी सवयी आजपासून सुरू केल्यास त्याचा फायदा केवळ वजनावरच नव्हे, तर संपूर्ण आरोग्यावरही दीर्घकाळ दिसून येतो.