आपल्यापैकी अनेक जण असे गृहीत धरतात की, दिवसातून आठ ग्लास पाणी प्यायल्याने आपण पूर्णपणे हायड्रेटेड राहू शकतो. अशाने आपण तहान लागलेली नसली तरी पाणी पितो, यासाठी कधी अलार्म, तर कधी अॅपमध्ये रिमांइडर सेट करतो. पण, ही पद्धत खरंच आरोग्यदायी आहे का? त्यावर आहारतज्ज्ञ निकिता बर्दिया यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

आहारतज्ज्ञ निकिता बर्दिया यांच्या मते, फक्त साधं पाणी पिऊन नेहमी हायड्रेट राहता येत नाही. जेव्हा पाण्यात आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स नसतात तेव्हा शरीर ते पाणी टिकवून ठेवू शकत नाही, ज्यामुळे थकवा, मेंदूत बधीरपणा व सूज यांसारख्या समस्या उदभवतात. म्हणून शरीर योग्य हायड्रेशन आहे, असे मोजता येत नाही, तर शरीराच्या सिग्नलवरून ते समजून घ्यावे लागते.

शरीरात नेमकं काय घडतं?

पाणी थेट पेशींमध्ये जात नाही, ते सोडियम संतुलनानुसार शरीराच्या आत आणि बाहेर जाते. जेव्हा खूप जास्त पाणी पिता तेव्हा सोडियम रक्तात डायल्यूट होते.

शरीर हे ठीक करण्यासाठी अतिरिक्त खनिजे उत्सर्जित करते. यावेळी मूत्रमार्गे इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात.

पेशी पाणी साठवू शकत नाहीत. या स्थितीला सौम्य हायपोनेट्रेमिया म्हणतात, जे आजकाल खूप सामान्य आहे.

सौम्य सोडियम असंतुलनाची लक्षणे

रात्री पूर्ण झोपेनंतरही थकवा: ७-८ तास झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर जडपणा आणि आळस जाणवणे हे पेशींना पुरेसे पाणी आणि खनिजे मिळत नसल्याचे लक्षण असू शकते.सोडियमची कमतरता पेशींना योग्यरीत्या ऊर्जा साठवून ठेवण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे दिवसा लवकर थकवा येतो.

दुपारी अचानक ऊर्जा कमी होणे: दुपारी २ ते ४ दरम्यान अशक्तपणा, सुस्ती किंवा झोप येणे हे केवळ कामाच्या ताणामुळे होत नाही. जेव्हा शरीराचे इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते तेव्हा रक्तदाब आणि ऊर्जेची पातळी अचानक कमी होऊ शकते, ज्याला लोक अनेकदा पोस्ट लंच स्लंप समजतात.

स्नायूंमध्ये वेदना : रात्रीच्या वेळी पाय किंवा पायांमध्ये अचानक पेटके येणे हे सोडियम आणि पोटॅशियमच्या कमतरतेचे एक सामान्य लक्षण आहे. स्नायूंच्या योग्य आकुंचन आणि विश्रांतीसाठी ही खनिजे आवश्यक आहेत. जेव्हा त्यांचे संतुलन बिघडते तेव्हा स्नायू अचानक कडक होऊ शकतात.

औषधांना प्रतिसाद न देणारी डोकेदुखी: जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल आणि वेदनाशामक औषधे घेतल्यानंतरही ती कमी होत नसेल, तर हे डिहायड्रेशनचे नव्हे, तर ओवर डायल्युशनचे लक्षण असू शकते. कमी सोडियममुळे मेंदूच्या पेशी फुगतात, ज्यामुळे सतत डोकेदुखी होऊ शकते.

सकाळी चेहरा किंवा हातांना सूज येणे: डोळ्यांखाली सूज येणे, बोटांमध्ये कडकपणा येणे किंवा सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज येणे हे शरीर पाण्याचे योग्य व्यवस्थापन करत नसल्याचे दर्शवू शकते. सोडियम असंतुलनामुळे पेशींच्या बाहेर पाणी साचते, ज्यामुळे सूज येते.

लक्ष केंद्रित करण्यात अडचण : लक्ष केंद्रित करण्यात अडचण, गोष्टी विसरणे किंवा मंदपणा हेदेखील सौम्य सोडियम असंतुलनाशी संबंधित असू शकते. मेंदू योग्यरीत्या कार्य करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट संतुलनावर अवलंबून असतो. जेव्हा हे बिघडते तेव्हा विचार करण्याची क्षमता प्रभावित होते.

गोड किंवा खारट पदार्थांची तीव्र इच्छा: गोड किंवा खारट पदार्थ खाण्याची अचानक इच्छा होणे हे शरीराकडून एक सिग्नल आहे की, त्याला खनिजांची आवश्यकता आहे. हे कमकुवत इच्छाशक्तीचे लक्षण नाही, तर शरीराच्या नैसर्गिक अलार्म सिस्टीमचे लक्षण आहे, जे संतुलन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते.

काय बदल करणे आवश्यक?

रोज आठ ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवण्यापेक्षा तहान लागेल तेव्हा पाणी प्या.

सकाळी एक ग्लास पाण्यात थोडेसे सैंधव मीठ आणि लिंबू घाला.

अन्नातून मिळणाऱ्या पोटॅशियमवर लक्ष केंद्रित केले (नारळाचे पाणी, केळी, दही).

अशाने फक्त दोन आठवड्यांत शरीराची ऊर्जा पातळी सुधारली, जळजळ कमी झाली व ब्रेन फॉग नाहीसा झाला.