Myth About Kidney Stones : बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बाहेर पडायला मदत होते असा दावा तुम्ही कधी ऐकला आहे का? जर तुम्ही आरोग्यविषयक रील्स पाहत असाल किंवा मुतखडा/किडनी स्टोनबद्दलचे रेडिट थ्रेड्स वाचत असाल, तर तुम्ही या दाव्याबद्दल कदाचित ऐकले असावे. हा दावा जणू रामबाण उपाय असल्यासारखा पसरवला जात आहे. सोशल मीडियावर कोणी सांगतं की, त्यांच्या चुलत भावाला/बहिणीला स्टोन झाला होता आणि त्याने/तिने बिअर प्यायल्यावर त्याचा फायदा झाला. मित्राचा मित्र तर यावर पूर्ण विश्वास ठेवतो. अशा खोट्या दाव्यांमुळे अनेकांची खात्री पटते की,” थंडगार बिअरची बाटली उघडणे हा मुतखड्याच्या असह्य वेदनांवरचा उपाय असू शकतो.

पण सत्य हेच आहे की, हा दावा खोटा आणि चुकीचा आहे. फक्त चुकीचा नाही तर घातक देखील आहे.

मुतखड्यावर बीअर उपाय नाही!

“बिअर प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होण्यास मदत होत नाही. त्यामुळे हा एक निव्वळ गैरसमज आहे,” असे पुण्यातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अतुल डी. साजगुरे यांनी टीओआयला माहिती देताना सांगतात. डॉक्टर सांगतात की, माझ्याकडे नेहमीच असे रुग्ण येतात ज्यांनी हा गैरसमज करून घेतला आहे. “खरं तर, मद्यपानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते आणि दीर्घकाळात किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो.”

इथेच खरी गंमत आहे, कारण बीअर तांत्रिकदृष्ट्या एक द्रव पदार्थ आहे. मग एक द्रव पदार्थ, जो आपण सामान्यतः शरीरातील पाण्याची पातळी वाढवतो असे मानतो, तो प्रत्यक्षात किडनी स्टोनची समस्या अधिक गंभीर कशी करू शकतो? याचे उत्तर तुमच्या शरीरात मद्य कसे कार्य करते यात दडलेले आहे.

मुंबईतील पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमधील सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट (मूत्रपिंड तज्ज्ञ) डॉ. जतीन कोठारी सांगतात की, “बऱ्याच लोकांना वाटते की,”किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी बिअर हा एक चांगला उपाय आहे, पण सत्य हे आहे की तिचे अतिसेवन केल्याने मुतखड्याचा आजार वाढू शकतो. अति बिअर पिण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे निर्जलीकरण. बिअर हा एक द्रव पदार्थ असला तरी, त्यातील अल्कोहोलचा मूत्रवर्धक परिणाम होतो, ज्यामुळे शरीरातील अधिक द्रव कमी होतो.”

शरीरात मद्य कसे कार्य करते?

जेव्हा तुम्ही मद्यपान करता, तेव्हा तुमचे शरीर पाण्याप्रमाणे ते साठवून ठेवत नाही. उलट, मद्यपानामुळे लघवीचे प्रमाण वाढून शरीरातील अधिक द्रव पातळी कमी होते म्हणून, जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की, बिअरने मदत होईल, तर तुम्ही प्रत्यक्षात स्वतःलाच फसवून घेत आहात की तुम्ही पुरेसे द्रव पीत आहात आणि त्याचवेळी तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी आणखी कमी करत आहात.”

“म्हणून, जर कोणी खूप जास्त बिअर पीत असेल आणि पुरेसे पाणी पीत नसेल, तर त्यामुळे गंभीर निर्जलीकरण होऊ शकते. यामुळे लघवीतील खनिजे तर वाढतातच, पण मुतखडा होण्याची शक्यताही वाढते,” असे डॉ. कोठारी स्पष्ट करतात.

बिअर आणि किडनी स्टोनच्या समस्या केवळ निर्जलीकरणापुरत्या मर्यादित नाहीत. याला आणखी एक पैलू आहे, ज्याची बहुतेक लोकांना कल्पना नसते. बिअर तुमच्या शरीरातील रासायनिक प्रक्रिया अशा प्रकारे सक्रियपणे बदलते, ज्यामुळे खडे तयार होण्यास चालना मिळते.

“बीअरमुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढते हे सर्वश्रुत आहे,” असे डॉ. कोठारी सांगतात. “मूत्रामधील उच्च युरिक ॲसिड हे युरिक ॲसिडचे खडे तयार होण्यामागील एक प्रमुख कारण आहे.” त्यामुळे, जे खनिज आधीच समस्या निर्माण करणार होते, तुम्ही केवळ त्यांचे प्रमाण वाढवत नाही, तर तुम्ही अक्षरशः तुमच्या शरीरात खडे तयार होण्यास अनुकूल अशी नवीन परिस्थिती निर्माण करत आहात.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वजन वाढणे. नियमितपणे किंवा मोठ्या प्रमाणात बिअर प्यायल्याने वजन वाढू शकते, ज्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो. या दोन्ही स्थितींचा संबंध कालांतराने किडनी स्टोनचा धोका वाढण्याशी आहे,” असे डॉ. कोठारी पुढे सांगतात. त्यामुळे आता निर्जलीकरण, वाढलेले युरिक ॲसिड आणि चयापचयाच्या समस्या या सर्व गोष्टी एकावर एक साचत जातात.

“अनेक लोकांची आणखी एक समस्या म्हणजे, बिअरमुळे मूत्रपिंडे ‘स्वच्छ’ होण्यास मदत होईल या विचाराने ते पाण्याऐवजी बिअर पितात. वास्तविक पाहता, पाण्याऐवजी बिअर प्यायल्याने मिळणारा कोणताही फायदा मिळत नाहीच पण धोकाही आणखी वाढतो,” असा इशारा कोठारी देतात.

किडीन स्टोनवर काय प्रभावी ठरतं?(So what actually works?)

दोन्ही डॉक्टर एकाच उपायाकडे निर्देश करतात, आणि तो काही आकर्षक, मनोरंजक किंवा सोशल मीडियावर ट्रेंड होण्यासारखा नाही.

“जर तुम्हाला किडनी स्टोन टाळण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करायची असेल, तर लघवी पातळ करण्यासाठी पुरेसे पाणी (दिवसातून ८-१२ कप) पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे,” असे डॉ. साजगुरे सांगतात. “या पातळपणामुळे तुमच्या लघवीतील अशा खनिजांचे प्रमाणही कमी होईल, ज्यामुळे किडनी स्टोन तयार होऊ शकतात.”

पाणी. अगदी साधं, सामान्य पाणी. दिवसातून आठ ते बारा कप. हेच त्यामागचं विज्ञान आहे. हाच उपाय खरोखर प्रभावी ठरतो.

डॉ. कोठारी प्रतिबंधात्मक उपायांबद्दल अधिक माहिती देतात. “मूतखडे टाळण्यासाठी प्राथमिक शिफारस म्हणजे भरपूर पाणी पिणे, जेणेकरून दिवसाला २-२.५ लिटरपेक्षा जास्त लघवी होईल.” केवळ पाणी पिण्यापलीकडे, ते आहारातील इतर घटकांवरही भर देतात. “शिवाय, मिठाचे सेवन कमी करणे महत्त्वाचे आहे, कारण सोडियमची वाढलेली पातळी लघवीतील कॅल्शियम वाढवते. सामान्य प्रमाणात कॅल्शियम, मध्यम प्रमाणात ऑक्झॅलेटयुक्त पदार्थ आणि मर्यादित प्रमाणात अतिरिक्त प्राणिजन्य प्रथिने असलेला संतुलित आहार घेणे उचित आहे.”

पाण्यात लिंबाचा रस मिसळल्यास फायदा होतो (Adding Lime Juice to water works)

आणि इथे एक मनोरंजक गोष्ट आहे, जिचा खरोखरच काही फायदा होऊ शकतो: लिंबाचे पाणी. “शिवाय, सायट्रेटचे सेवन वाढवणे देखील खूप उपयुक्त ठरू शकते; उदाहरणार्थ, लिंबाचे पाणी प्यायल्याने लघवीतील सायट्रेट वाढू शकते, जे मूत्रपिंडातील खडे तयार होण्यास नैसर्गिकरित्या प्रतिबंध करते,” असे कोठारी म्हणतात. त्यामुळे, जर तुम्हाला साध्या पाण्यापलीकडे एखाद्या पेयाची शिफारस हवी असेल, तर लिंबाच्या पाण्याला विज्ञानाचा आधार आहे. लिंबाचा रस तुमच्या लघवीतील सायट्रेट वाढवतो आणि सायट्रेट नैसर्गिकरित्या खडे तयार होण्यापासून रोखते. ही एक खरी प्रक्रिया आहे, केवळ एक गैरसमज नाही.

डॉ. साजगुरे यांना लोकांना हेच समजावून सांगायचे आहे की, किडनी स्टोनची समस्या सोपी नसते. “रुग्णांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, किडनी स्टोन हे आहार, पाणी पिण्याच्या सवयी, अतिरिक्त मीठ सेवन, चयापचय विकार आणि अनुवांशिक प्रवृत्ती यांसारख्या अनेक वेगवेगळ्या घटकांचा परिणाम असतात. मूत्रमार्गातील खड्यां आकार आणि प्रकारानुसार त्याच्यावरील उपचारपद्धती बदलते.”

जास्त वेळ पाणी प्यायल्याने आणि औषधोपचाराने लहान खडा आपोआप बाहेर पडू शकतात. मोठ्या खड्यांसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. पण तुमचा खडा कोणत्याही आकाराचा किंवा प्रकारचा असो, त्यावर बिअर हे उत्तर नाही.

“रुग्णांनी गैरसमज (उदा. बिअर प्यायल्याने मदत होईल) पसरवणे टाळावे आणि त्याऐवजी किडनी स्टोन टाळण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि आवश्यकतेनुसार योग्य वैद्यकीय सल्ला घेणे यावर लक्ष केंद्रित करावे,” असे डॉ. साजगुरे म्हणतात.

थोडक्यात सांगायचे तर, इंटरनेटवर याबद्दल पूर्णपणे चुकीची माहिती पसरली आहे. बिअरमुळे किडनी स्टोनची समस्या कमी होण्याऐवजी ती आणखी बिघडते. पाणी, आहारातील बदल आणि प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार हेच प्रभावी ठरतात. गैरसमजांपासून दूर राहा. पाणी प्या