Beetroot Juice: भारतीय आहारात बीट या कंदमुळाला विशेष महत्त्व आहे. गडद लाल रंगाचे बीट केवळ जेवणाची चव आणि रंग वाढवत नाही, तर शरीराला अनेक पोषक घटक पुरवण्याचे काम करते. बीटमध्ये फोलेट (व्हिटॅमिन बी९), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅंगनीज, लोह व फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात. त्याशिवाय बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स आणि बेटालेन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे संतुलित आहारात बीटचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. आजकाल अनेक जण बीटचा वापर कोशिंबीर, सॅलड, भाजी, पराठा, सूप व ज्यूस अशा विविध प्रकारे करतात. बीटमधील नैसर्गिक नायट्रेट्स शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार होण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास हातभार लागू शकतो. तसेच त्यातील फायबर पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. फोलेट पेशींच्या वाढीसाठी आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे बीटमध्ये कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे वजन संतुलित ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या आहारातही बीटचा समावेश करता येतो.
बीट ज्यूस पिण्याचा ट्रेंड
हल्ली सोशल मीडियावर आरोग्य आणि आहारासंबंधी अनेक दावे केले जातात. त्यामध्ये बीट ज्यूस पिण्याचे फायदेही मोठ्या प्रमाणात सांगितले जात आहेत. बीटमध्ये असणारे पोषक घटक, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक नायट्रेट्समुळे रक्तप्रवाह सुधारण्यास, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अनेक जण दिवसाची सुरुवात करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी बीटचा ज्यूस पिणे पसंत करतात. काही जण तर दररोज बीट ज्यूस प्यायल्याने हिमोग्लोबिन वाढते, शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि त्वचेपासून केसांपर्यंत अनेक फायदे मिळतात, असे दावेही करतात.
मात्र, बीट ज्यूसचे हे सर्व फायदे लक्षात घेऊन प्रत्येकानेच सकाळी उपाशीपोटी त्याचे सेवन करावे, असे नाही. कारण- बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स आणि ऑक्सलेट असतात. काही व्यक्तींना बीट ज्यूस प्यायल्यानंतर पोटात गॅस, अस्वस्थता किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.
बीट ज्यूस कोणासाठी घातक किंवा त्रासदायक ठरू शकतो?
१. किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी
बीटमध्ये ऑक्झलेट नावाचा नैसर्गिक घटक असतो. शरीरात ऑक्झलेटचे प्रमाण जास्त झाल्यास ते कॅल्शियमसोबत एकत्र येऊन कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे तयार होण्यास हातभार लावू शकते. त्यामुळे ज्यांना वारंवार किडनी स्टोनचा त्रास होतो, विशेषतः कॅल्शियम ऑक्झलेट स्टोनचा इतिहास आहे, त्यांनी बीट ज्यूसचे नियमित आणि मोठ्या प्रमाणातील सेवन टाळावे. अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बीटचे प्रमाण ठरवावे.
२. कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी सावध राहावे
बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. शरीरात या नायट्रेट्सचे रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होते. त्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. याच कारणामुळे बीट ज्यूसमुळे काही व्यक्तींमध्ये रक्तदाब कमी होऊ शकतो. आधीच कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात बीट ज्यूस प्यायल्यास चक्कर येणे, अशक्तपणा किंवा डोके हलके वाटणे अशा समस्या जाणवू शकतात.
३. रक्तदाबाची औषधे घेणाऱ्यांनी काळजी घ्यावी
ज्या व्यक्ती उच्च रक्तदाबासाठी औषधे घेतात, त्यांनी दररोज मोठ्या प्रमाणात बीट ज्यूस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बीट ज्यूसमधील नायट्रेट्समुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते. औषधांसोबत त्याचा परिणाम एकत्रित झाल्यास काही व्यक्तींमध्ये रक्तदाब अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे बीट ज्यूसला औषधांचा पर्याय समजू नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नयेत.
४. किडनीचे आजार असणाऱ्यांनी अति सेवन टाळावे
बीटमध्ये पोटॅशियमचे प्रमाण असते. निरोगी व्यक्तींमध्ये किडनी अतिरिक्त पोटॅशियम शरीरातून बाहेर टाकण्याचे काम करते. मात्र, किडनीचे कार्य कमी झालेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील पोटॅशियम वाढू शकते. पोटॅशियमचे प्रमाण खूप वाढल्यास हृदयाच्या ठोक्यांच्या लयीत बदल होण्याचा धोका असतो. त्यामुळे क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) किंवा रक्तातील पोटॅशियम वाढण्याचा त्रास असणाऱ्यांनी बीट ज्यूसचे सेवन डॉक्टर किंवा रेनल डाएटिशियनच्या सल्ल्यानेच करावे.
५. मधुमेह असणाऱ्यांनी प्रमाणाकडे लक्ष द्यावे
बीटमध्ये नैसर्गिक साखर असते. बीटचा ज्यूस बनवताना त्यातील बरेचसा फायबर काढून टाकले जाते. त्यामुळे संपूर्ण बीट खाण्याच्या तुलनेत ज्यूसमधून कमी फायबर मिळते आणि कमी वेळात अधिक प्रमाणात बीटचे सेवन होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मोठा ग्लास भरून ज्यूस पिण्याऐवजी मर्यादित प्रमाणात सेवन करावे. ज्यूसमध्ये साखर, मध किंवा इतर गोड पदार्थ घालणे टाळावे.
६. पचनसंस्था संवेदनशील असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो
काही व्यक्तींना बीट ज्यूस प्यायल्यानंतर पोट फुगणे, गॅस, पोटात अस्वस्थता किंवा जुलाबाचा त्रास जाणवू शकतो. विशेषतः एकाच वेळी मोठ्या प्रमाणात ज्यूस प्यायल्यास हा त्रास होण्याची शक्यता असते. ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे किंवा ज्यांना विशिष्ट पदार्थांमुळे पोटाचे विकार होतात, त्यांनी कमी प्रमाणापासून सुरुवात करावी. त्रास जाणवल्यास सेवन थांबवावे.
७. लघवीचा रंग लालसर होऊ शकतो
बीटमध्ये बेटालेन्स नावाचे नैसर्गिक रंगद्रव्य असते. त्यामुळे बीट ज्यूस प्यायल्यानंतर काही व्यक्तींची लघवी गुलाबी किंवा लालसर दिसू शकते. या स्थितीला बीटुरिया, असे म्हणतात. सामान्यतः ही निरुपद्रवी स्थिती असते आणि बीटचे सेवन थांबवल्यानंतर रंग पूर्ववत होतो.
