Drinking Ginger Tea: पावसाळा सुरू झाला की, वातावरणात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, मातीचा सुगंध आणि थंडगार वारा मन प्रसन्न करून टाकतो. अशा वातावरणात गरमागरम चहाचा एक कप मिळाला, तर त्या आनंदात आणखी भर पडते. त्यामुळे चहा आणि पाऊस हे एक अतूट नाते असल्यासारखे वाटते.

भारतात आल्याचा चहा एक लोकप्रिय पर्याय आहे. आल्याचा चहा केवळ चवच वाढवत नाही, तर तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी, कॉफी आणि इतर अनेक प्रकारची पेये पितात. आल्याचा चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे की नाही, असा प्रश्नही अनेकांना पडतो. आता या विषयावर नवीन संशोधन समोर आले आहे. चला तर मग, आल्याचा चहा खरोखरच वजन कमी करण्यास मदत करतो का आणि या दाव्याबद्दल संशोधन काय सांगते, ते जाणून घेऊया.

संशोधन काय सांगते?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका पुनरावलोकन आणि मेटा-विश्लेषणानुसार, आल्याच्या सेवनाचे वजनावर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या विश्लेषणामध्ये ४७३ जण सहभागी असलेल्या १४ अभ्यासांचा समावेश होता. अहवालानुसार, नियमित आल्याच्या सेवनाचा संबंध शरीराचे वजन कमी होणे, कंबर-नितंबाच्या गुणोत्तरात सुधारणा, उपाशीपोटीची ग्लुकोज पातळी व इन्सुलिन प्रतिरोध कमी होण्याशी जोडला गेला आहे. आल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत झाली. इन्सुलिन, बीएमआय, ट्रायग्लिसराइड्स आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम आढळला नसला तरी या संशोधनाचे निष्कर्ष हेदेखील सूचित करतात की, आल्याचे परिणाम महत्त्वपूर्ण नसले तरी वजनाशी संबंधित मापदंडांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो.

वजन कमी करण्यासाठी आले किती प्रभावी?

अहवालात वजनात लक्षणीय घट झाल्याचा उल्लेख आहे; परंतु हे संशोधन अजूनही मर्यादित आहे. तरीही तुमच्या रोजच्या चहामध्ये आले घातल्याने केवळ चवच वाढणार नाही, तर आरोग्यालाही थोडा फायदा होईल.

आल्याचे इतर फायदे

आल्याच्या चहामुळे वजन कमी होते हा दावा पूर्णपणे सिद्ध झाला नसला तरी आल्याचे इतरही अनेक फायदे आहेत. तज्ज्ञांच्या मते, आले पचनक्रिया सुधारण्यास, उलट्या आणि मळमळ कमी करण्यास, तसेच पोट फुगणे, सूज आणि विविध संसर्ग टाळण्यास मदत करते. मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठीही ते उपयुक्त आहे. आल्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस व मॅग्नेशियमसारखे अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्त्वे असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी केवळ आल्यावर अवलंबून राहता येत नसले तरी तो एक चांगला पूरक पर्याय मानला जातो.