Side Effects of Drinking Water at Night : चांगल्या आरोग्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक मानले जाते. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते, शरीराचे तापमान राखण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पण झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागू शकते, अशाने झोपेत व्यत्यय येतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर आहे की हानिकारक, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. याच प्रश्नावर आपण आरोग्य तज्ज्ञांचे मत जाणून घेऊ….
याचे एकच ठराविक असे उत्तर नाही. हे तुम्ही किती पाणी पिता, तुमचे वय आणि तुम्हाला काही आरोग्य समस्या आहेत का यावर अवलंबून असते. योग्य प्रमाणात पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते, परंतु जास्त पाणी प्यायल्याने झोपेवरही परिणाम होऊ शकतो.
झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे फायदे
झोपण्यापूर्वी ३० ते ६० मिनिटे आधी एक छोटा ग्लास पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका कमी होऊ शकतो. ही सवय उन्हाळ्याच्या उष्णतेत किंवा दिवसभर खूप घाम आल्यानंतर शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
पुरेसे पाणी प्यायल्याने तोंड कोरडे पडण्याचा त्रास कमी होतो आणि शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत चालू राहतात. पाणी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत करते. शिवाय, काही लोकांना रात्री योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने सकाळी होणारी डोकेदुखी किंवा डिहायड्रेशनचा त्रास टाळता येतो
मात्र, याचा अर्थ असा नाही की, झोपण्यापूर्वी लगेच खूप जास्त पाणी प्यावे. संतुलित प्रमाणात पाणी पिणे सर्वोत्तम असते.
‘ही’ सवय केव्हा हानीकारक ठरू शकते?
झोपण्यापूर्वी लगेच एक-दोन बाटल्या पाणी प्यायल्याने रात्री लघवीसाठी वारंवार जाग येऊ शकते. यामुळे दुसऱ्या दिवशी झोप नीट लागत नाही, थकवा येतो, चिडचिड होते आणि लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते.
वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, प्रोस्टेटचा त्रास किंवा मूत्राशयाचा अतिसक्रियपणा असलेल्या पुरुषांनी रात्री पाणी पिण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे. मूत्रपिंड किंवा हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी पाणी पिण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तज्ञांच्या मते, दिवसभर भरपूर पाणी पिणे ही सर्वोत्तम सवय आहे. रात्री तहान लागल्यास तुम्ही एक छोटा ग्लास पाणी पिऊ शकता, पण जास्त पाणी पिणे टाळावे. झोपेत वारंवार व्यत्यय येऊ नये आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी, झोपण्याच्या किमान एक तास आधी पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
