Constipation Relief Remedies: सकाळी उठल्यावर पाणी पिण्याची सवय लावावी असे अनेकदा सांगितले जाते. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते असे मानले जाते. हे पूर्णपणे चुकीचे नाही, कारण याचा संबंध पचनसंस्था आणि शरीरातील पाण्याच्या महत्त्वाशी आहे.

बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा मल कठीण होतो आणि बाहेर टाकायला त्रास होतो, तेव्हा बद्धकोष्ठता होते. अनेकांना आयुष्यात कधी ना कधी ही समस्या येते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात पाण्याची आणि तंतुमय (फायबर) अन्नाची कमतरता. अशा वेळी सकाळी पाणी पिण्याची सवय ठेवली, तर ही समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.

पाणी प्यायल्याने प्रेशर येतं का? (Drinking water in the Morning)

Apecwater च्या रिपोर्टनुसार, सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्यावर आतड्यांची हालचाल वाढते. याला वैद्यकीय भाषेत “गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स” म्हणतात. म्हणजे पोटात काहीही (पाणी किंवा अन्न) गेलं की मोठ्या आतड्याचं काम वेगाने सुरू होतं. त्यामुळे अनेकांना सकाळी पाणी पिल्यानंतर टॉयलेटला जाण्याची इच्छा (प्रेशर) होते.

Award Banner

पचन प्रक्रियेबद्दल बोलायचं तर, अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात येईपर्यंत त्यातील पोषक घटक शरीराने घेतलेले असतात. मोठ्या आतड्याचं काम म्हणजे उरलेल्या पदार्थातून पाणी शोषून घेऊन त्याला घट्ट मल बनवणं. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर आतडं जास्त पाणी शोषून घेतं. त्यामुळे मल कोरडा आणि कठीण होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते.

पाण्याची काय भूमिका असते?

इथे पाण्याचं महत्त्व खूप मोठं आहे. पुरेसं पाणी प्यायल्याने मलात ओलावा टिकून राहतो, त्यामुळे तो मऊ होतो आणि सहज बाहेर पडतो. म्हणूनच पाणी पिणं बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतं असं म्हणतात.

पण फक्त पाणी पिणं पुरेसं नसतं. जर तुम्ही पुरेसं फायबर (तंतुमय अन्न) घेत नसाल, तर पाण्याचा परिणाम कमी होऊ शकतो. चांगल्या परिणामासाठी पाण्यासोबत फळं, भाज्या आणि फायबरयुक्त अन्न खाणं खूप गरजेचं आहे.

तज्ञांच्या मते, जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर दिवसभरात किमान ८–१० ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. काही वेळा, विशेषतः शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) असेल तर त्यापेक्षा जास्त पाणी पिणंही फायदेशीर ठरू शकतं. तसंच, मद्य (अल्कोहोल) आणि जास्त कॅफिन असलेले पेय पदार्थ शरीरातील पाणी कमी करतात, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.