Water Benefits: पाणी पिणं ही साधी सवय आहे, पण ते कसं पितो याचा शरीरावर मोठा परिणाम होतो. हळूहळू पाणी प्यायल्याने अन्न चांगलं पचतं आणि पोटावर जास्त ताण येत नाही. पण घाईघाईने एकदम भरपूर पाणी प्यायल्यास शरीराला ते सांभाळण्यासाठी वेळ लागतो. खरं तर अन्न पचण्याची प्रक्रिया तोंडापासूनच सुरू होते.
आपण पाणी घोट-घोट पितो तेव्हा ते लाळेसोबत मिसळत हळूहळू पोटात जातं. त्यामुळे पोट आधीच तयार होतं आणि अन्न सहज पचायला मदत होते.
एकदम जास्त पाणी प्यायल्याने काय त्रास होतो?
जेव्हा एकाच वेळी खूप पाणी पिलं जातं, तेव्हा शरीराला ते अचानक सांभाळावं लागतं. त्यामुळे पचनाची गती थोडी बिघडू शकते. ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, शरीराला पाणी हळूहळू घेतल्यास त्याचा अधिक चांगला उपयोग करता येतो. डॉक्टर विनीत कुमार गुप्ता यांच्या मते, हळूहळू पाणी प्यायल्याने ते शरीरात नीट मिसळतं आणि पचनाला मदत करतं. पण खूप वेगाने पाणी प्यायल्यास काही वेळ पोट जड वाटू शकतं किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
हळूहळू पाणी पिण्याचे फायदे
हळूहळू पाणी प्यायल्याने शरीराचं संतुलन टिकून राहतं. पोटात एकदम जास्त पाणी जात नाही, त्यामुळे पचनासाठी आवश्यक रस नीट काम करतात. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो आणि शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. मात्र, काही परिस्थितींमध्ये पटकन पाणी पिणं गरजेचं असू शकतं. जसं की, खूप उकाडा असताना किंवा जास्त मेहनत केल्यानंतर. पण रोजच्या सवयीमध्ये हा प्रकार योग्य मानला जात नाही. विशेषतः जेवताना खूप पाणी प्यायल्यास पचनाची प्रक्रिया मंदावू शकते.
पाणी पिण्याची वेळही महत्त्वाची आहे
पाणी पिण्याची पद्धत जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्याची योग्य वेळही महत्त्वाची आहे. दिवसभर थोडं-थोडं पाणी पिणं, जेवताना गरजेनुसार घोट-घोट पाणी पिणं आणि एकदम खूप पाणी पिणं टाळणं अधिक चांगलं मानलं जातं. शरीराची गरज ओळखून पाणी पिणं हा सर्वात योग्य मार्ग आहे. त्यामुळे पचन सुधारतं आणि शरीरही निरोगी राहतं. पाणी पिण्याच्या सवयीतला हा छोटासा बदल असला तरी त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. हळूहळू पाणी पिण्याची सवय पचन सुधारण्यास मदत करते आणि दिवसभर शरीर हलकं व ताजंतवानं वाटतं.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
