Drooling While Sleeping : झोपेत तोंडातून लाळ गळणे ही समस्या बऱ्याच लोकांना जाणवते. ही एक सामान्य समस्या समजून अनेक लोक याकडे सहज दुर्लक्ष करतात, पण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करणे योग्य नाही. कधीकधी जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता, तेव्हा नकळतच तोंडातून लाळ गळू लागते. जेव्हा तुम्ही झोपेतून जागे होता, तेव्हा उशीवर थोडा ओलावा असल्याचे लक्षात येते. अनेकदा हे का होते तुम्हालाही समजत नाही, अशावेळी काहींना प्रश्न पडतो की, झोपेत लाळ गळणे हे एखाद्या आजाराचे लक्षण तर नाही ना? बहुतेक प्रकरणांमध्ये हे सामान्य मानले जात असले तरी, त्याकडे दुर्लक्ष करू नये कारण ही समस्या कधी मोठ्या आजाराचे लक्षण ठरेल सांगता येत नाही.

यावर एका वेबसाइटशी बोलताना फरिदाबादमधील फोर्टिस हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागाचे डॉ. विनीत बंगा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

झोपेत लाळ गळणे सामान्य आहे का?

लाळ गळणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्याकडे बरेच लोक गांभीर्याने पाहत नाहीत. अधूनमधून लाळ गळणे सामान्य असू शकते; परंतु जर असे दररोज आणि मोठ्या प्रमाणात होत असेल, तर ते एखाद्या आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.

झोपेच्या वेळी शरीरातील स्नायू शिथिल होतात, त्यामुळे एका कुशीवर किंवा तोंड उघडे ठेवून झोपल्यास लाळ गळू शकते. ही समस्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते, परंतु अनेक प्रौढांनाही याचा त्रास होतो. पण सतत लाळ गळणे हे…हे काही विशिष्ट आजारांचे लक्षण असू शकते.

सायनस किंवा नाकातील अडथळ्यामुळे लोकांना तोंडाने श्वास घ्यावा लागतो, ज्यामुळे लाळ गळण्याचे प्रमाण वाढू शकते. ॲलर्जी, घशाचा संसर्ग, ॲसिड रिफ्लक्स (Acid Reflux), टॉन्सिलच्या समस्या किंवा झोपेचे विकार (Sleep Disorders) यांमुळेही असे होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, याचा संबंध पार्किन्सन्स रोग किंवा स्ट्रोकसारख्या मज्जासंस्थेच्या विकारांशी देखील असू शकतो.

झोपेत लाळ गळणे सामान्य आहे की नाही

डॉक्टरांचा सल्ला आहे की, जर तुम्हाला घोरण्यासोबतच लाळ गळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडाला दुर्गंधी येणे, गिळण्यास त्रास होणे किंवा दिवसभर थकवा जाणवत असेल, तर तुम्ही ताबडतोब तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.

ही समस्या टाळण्यासाठी, झोपण्याची स्थिती बदलणे, पुरेसे पाणी पिणे, नाक स्वच्छ ठेवणे आणि झोपेच्या चांगल्या सवयी लावणे फायदेशीर ठरू शकते. जर ही समस्या दीर्घकाळ टिकून राहिली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.