मुंबई : अनियमित जीवनशैली आणि दीर्घकाळ कामाच्या सवयींमुळे डोळय़ांचा कोरडेपणा वाढत आहे. करोनाकाळात टाळेबंदीमुळे आणि सध्याही घरून काम करणे वाढल्याने (वर्क फ्रॉम होम) संगणक-मोबाइल स्क्रीनसमोर दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने डोळय़ांच्या कोरडेपणाचा त्रास वाढत आहे. नेत्रतज्ज्ञांच्या मतानुसार डोळे सातत्याने कोरडे राहिल्यास आपल्या दृष्टीवर दुष्परिणाम होऊ शकतो. सातत्याने डोळय़ांच्या तक्रारीही वाढतात.

नेत्रतज्ज्ञ सांगतात की, करोना साथीच्या काळात आपली अवघी जीवनशैली बदलली. संगणक-मोबाइलच्या पडद्यांसमोर (स्क्रीन) व्यतीत करण्याचा वेळ वाढला. पोषक आहारसेवनात अडथळे आले. अनियमित किंवा अपुऱ्या झोपेमुळे या कोरडेपणाच्या तक्रारी वाढल्यात. घरातच दीर्घकाळ राहिल्यानेही डोळय़ांचा कोरडेपणा वाढला, कारण घरातील वातावरण त्याला पोषक ठरते. वातानुकूलित यंत्रणेमुळे वायूंचा अनावश्यक झोत डोळय़ांवर येतो व त्याच वेळी मोबाइल किंवा संगणकांच्या पडद्यावर काम करत असल्याने डोळय़ांतील ओलावा राखणाऱ्या अश्रूंचे बाष्पीभवन वाढते. त्यामुळे ते कोरडे पडतात. आहाराच्या सवयींतही बदल झाल्याने अयोग्य आहारसेवन होते. त्यामुळे नेत्रांचे आरोग्य राखणारी स्निग्ध आम्ल (फॅटी अ‍ॅसिड), ‘अ’ व ‘ड’ जीवनसत्त्वे मिळत नाहीत. तसेच अनियमित निद्रेमुळेही डोळय़ांच्या कोरडेपणा वाढतो.

How to remove the smell of sweat from clothes
घामाचा वास घालवण्यासाठी वापरून पाहा या ४ भन्नाट ट्रिक, झटपट गायब होईल दुर्गंध
itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

सर्वसाधारणपणे डोळय़ांची उघडझाप प्रतिमिनिट सरासरी १५ वेळा तरी आपण करत असतो. परंतु संगणक-मोबाइल पाहताना आपण ही उघडझाप पाच ते सात वेळाच करतो. त्यामुळे आपल्या डोळय़ांच्या पृष्ठभागावरील ओलसरपणा कमी होतो. या उपकरणांतून येणारा नीलप्रकाश डोळय़ांना जरी इजा पोहोचवत नसला तरी त्यामुळे आपल्या झोपेच्या सवयींवर दुष्परिणाम होतो व कोरडेपणा वाढतो. सातत्याने मास्क चुकीच्या पद्धतीने नाकाखाली ठेवल्याने आपला उच्छवास नेत्रांच्या दिशेने जातो व डोळे कोरडे पडतात. त्यामुळे मास्क सातत्याने नाकावर ठेवावा. त्यामुळे ही हवा डोळय़ांच्या दिशेने जात नाही. डोळय़ांचा कोरडेपणा टाळण्यासाठी नेत्रतज्ज्ञ २०:२०:२० पद्धत अवलंबण्याचा सल्ला देतात. दर २० मिनिटांनी आपण मोबाइल-संगणकाच्या पडद्यावरून (स्क्रीन) नजर हटवावी व सुमारे २० फुटांवरील एखाद्या वस्तूकडे २० सेकंदांपर्यंत नजर स्थिर करावी. तसेच सजगपणे डोळय़ांची नियमित उघडझाप करावी. मास्क नाकावर योग्य पद्धतीने लावावा, जेणेकरून श्वासोच्छवास करताना हवा डोळय़ांवर जाणार नाही. झोपण्याआधी दोन-तीन तास स्मार्टफोन, लॅपटॉप बंद करून ठेवावेत. त्यामुळे डोळय़ांचा कोरडेपणाचा त्रास टळेल. डोळय़ांचा कोरडेपणा घालवून त्यात ओलावा राखण्यासाठी व ते वाढवणारे डोळय़ांसाठीचे थेंब वापरावेत अथवा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.