Natural fertilizer for Tulsi: घराच्या अंगणात किंवा गच्चीवर ठेवलेली तुळस ही केवळ एक वनस्पती नसते; तर अनेक घरांत ती श्रद्धा, परंपरा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे तुळस टवटवीत, हिरवीगार पाने आणि भरगच्च भरलेली दिसली की, घरालाही एक वेगळीच शोभा येते. पण उन्हाळा सुरू झाला की, अनेकांच्या तुळशीची अवस्था बदलू लागते.
कालपर्यंत तजेलदार दिसणारी तुळस अचानक सुकल्यासारखी वाटू लागते. पानांचा रंग फिका पडतो, काही पाने गळून जातात आणि काही दिवसांनी तर कुंडीत फक्त काड्याच उरल्या आहेत की काय, असे वाटू लागते. अशा वेळी अनेक जण पाण्याचे प्रमाण वाढवतात. काही जण तुळस उन्हात ठेवतात, तर काही जण तिला सावलीत हलवतात. पण तरीही तुळशीत हवा तसा बदल दिसून येत नाही.
मग नेमकं चुकतंय कुठे?
तज्ज्ञांच्या मते अनेकदा समस्या पाण्याची नसतेच. तुळशीच्या मातीची गुणवत्ता कमी होणे, मुळांपर्यंत हवा न पोहोचणे किंवा बुरशीजन्य व जीवाणूजन्य संसर्ग होणे हीसुद्धा महत्त्वाची कारणे असू शकतात. अशा वेळी फक्त पाणी घालून उपयोग होत नाही. रोपाला आतून बळ देणारा आणि त्याचे संरक्षण करणारा उपाय आवश्यक असतो.
विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी कोणतेही महागडे खत, रासायनिक औषध किंवा बाजारातून काही विकत आणण्याची गरज नाही. तुमच्या आसपास सहज उपलब्ध असणारी एक साधी गोष्ट तुळशीसाठी संजीवनी ठरू शकते.
अनेकांना तुळशीवर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा नसतो. धार्मिक महत्त्व असल्यामुळे शक्यतो नैसर्गिक उपायच शोधले जातात. अशा वेळी काही अनुभवी बागकामप्रेमी एका खास हिरव्या पाण्याचा वापर करण्याचा सल्ला देतात. हे पाणी तुळशीच्या पानांवर फवारल्यास आणि थोडेसे मातीत घातल्यास रोप अधिक तजेलदार दिसू शकते, अशी माहिती दिली जाते.
यासोबतच काही गोष्टींकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तुळशीला खूप जास्त किंवा खूप कमी पाणी देऊ नये. मातीचा वरचा थर कोरडा झाल्यावरच पाणी द्यावे. तसेच दररोज किमान चार ते पाच तास सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते.
कुंडीतील माती खूप घट्ट झाली असेल, तर मुळांपर्यंत पुरेसा प्राणवायू पोहोचत नाही. त्यामुळे महिन्यातून एकदा मातीचा वरचा थर हलक्या हाताने सैल करून घ्यावा. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि रोप अधिक निरोगी राहते.
पण आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न… नेमकं ते हिरवं पाणी कोणतं?
याचं उत्तर आहे कडुलिंबाच्या पानांचं पाणी.
त्यासाठी कडुलिंबाची १५ ते २० पाने स्वच्छ धुऊन घ्या. ती एक लिटर पाण्यात १२ ते १४ तास भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी उकळून थंड करा. हेच हिरवं पाणी तुळशीच्या पानांवर फवारावे आणि थोडेसे मातीत घालावे.
कडुलिंबातील नैसर्गिक गुणधर्मांमुळे रोपावरील काही बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. परिणामी सुकलेली, निस्तेज दिसणारी तुळस पुन्हा एकदा टवटवीत, हिरवीगार आणि बहरलेली दिसण्याची शक्यता वाढते.
आठवड्यातून एक-दोन वेळा हा उपाय करून पाहिल्यास फरक जाणवू शकतो आणि तुमच्या अंगणातील तुळस पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकते.
