Early heart disease detection: आयआयटी चेन्नईमधील तरुण शास्त्रज्ञांच्या एका छोट्या टीमने अवघ्या पाच मिनिटांत धमन्यांचे वय निश्चित करण्यास मदत करणारे एक उपकरण विकसित केले आहे. लोक अनेकदा असे गृहीत धरतात की त्यांच्या धमन्यांचे वय हे त्यांच्या प्रत्यक्ष वयाइतकेच असते; मात्र हे नेहमी खरे असेलच असे नाही. आयआयटी चेन्नईच्या ‘Vespa’ मोहिमेवर काम करणाऱ्या संशोधकांनी धमन्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्याची एक नवी पद्धत विकसित केली आहे. लोकसंख्येच्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचा मोठ्या प्रमाणावर नकाशा तयार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला भारतातील महत्त्वाकांक्षी प्रयत्नांपैकी एक मानले जात आहे.

‘Vespa’ या मोहिमेचे पूर्ण नाव ‘Vascular Health-based Early Screening for Public Health Adoption’ असे आहे. या मोहिमेचे नेतृत्व आयआयटी चेन्नईच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. जयराज जोसेफ करत असून, त्यांना ‘Healthcare Technology Innovation Centre’मधील मुख्य शास्त्रज्ञ (हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विज्ञान आणि तंत्रज्ञान) डॉ. राज किरण यांचे सहकार्य लाभले आहे. भविष्यातील हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित जोखमींचे लवकर मूल्यांकन करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेऊया.

अवघ्या ५ मिनिटांत होणार धमन्यांच्या आरोग्याची तपासणी

संशोधकांनी ARTSENS नावाचे एक उपकरण विकसित केले आहे. आयआयटी चेन्नई संशोधकांच्या टीमने विकसित केलेले हे उपकरण धमन्यांच्या ताठरतेचे मूल्यांकन करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ARTSENS या नावाचा विस्तार ‘Arterial Stiffness Evaluation for Non-invasive Screening’ असा आहे. हे उपकरण अवघ्या पाच मिनिटांत तपासणी पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले असून, मैदानी किंवा मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या आरोग्य तपासणीसाठी त्याचा वापर करता यावा हा त्यामागील उद्देश आहे. ही पद्धत नॉन-इनव्हेसिव्ह, म्हणजेच शरीरात कोणत्याही प्रकारचा छेद न घेता केली जाणारी आहे, त्यामुळे तपासणीसाठी शस्त्रक्रिया, इंजेक्शन किंवा रक्त काढण्याची आवश्यकता नसते.

या तपासणीदरम्यान मानेजवळ एक छोटे उपकरण लावले जाते, ज्याच्या मदतीने मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या कॅरोटिड आर्टरीचे निरीक्षण केले जाते. त्याच वेळी दोन्ही हातांवर आणि मांड्यांवर हलका दाब देणारे कप लावले जातात. या प्रक्रियेतून रक्तवाहिन्यांच्या स्थितीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवली जाते.

ARTSENS कोणती माहिती देते?

हे उपकरण प्रामुख्याने दोन महत्त्वपूर्ण मोजमापांवर लक्ष केंद्रित करते. पहिले म्हणजे मानेतील कॅरोटिड धमनीचा आकार आणि तिची ताठरता. दुसरे म्हणजे Aortic Pulse Wave Velocity (aPWV), म्हणजेच एओर्टामधून रक्ताची नाडीची लहर किती वेगाने प्रवास करते याचे मोजमाप. धमन्या किती लवचिक किंवा ताठ झाल्या आहेत, याचे मूल्यांकन करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. ARTSENS केवळ साध्या अंदाजांवर अवलंबून न राहता धमन्यांच्या स्थितीशी संबंधित संख्यात्मक मोजमापे उपलब्ध करून देते, त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचे अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यांकन करण्यास मदत होऊ शकते.

धमन्यांचे आरोग्य आणि हृदयाची स्थिती यांचा काय संबंध?

धमन्या शरीरातील रक्तवाहिन्यांच्या जाळ्याचा महत्त्वाचा भाग आहेत. त्या हृदयातून शरीराच्या विविध अवयवांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक घटकांनी समृद्ध रक्त पोहोचवतात.

निरोगी धमन्या पूर्णपणे कडक नळ्यांसारख्या नसतात. त्या काही प्रमाणात लवचिक असतात. हृदय प्रत्येक वेळी रक्त पंप करते, तेव्हा धमन्यांच्या भिंती त्यानुसार प्रसरण आणि आकुंचन पावतात. या लवचिकतेमुळे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत होते.

मात्र, कालांतराने धमन्यांची लवचिकता कमी होऊन त्या अधिक ताठ किंवा कडक होऊ शकतात. यालाच arterial stiffness असे म्हटले जाते. धमन्यांच्या भिंतींची लवचिकता कमी होणे हे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित जोखमीचे महत्त्वाचे संकेत मानले जाते.

धमन्यांच्या भिंतींमध्ये त्यांना लवचिकता देणारे विविध तंतू असतात. वय वाढणे, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या आणि इतर जोखमीच्या घटकांमुळे या लवचिकतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे धमन्या ताठ होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

‘धमन्यांचे वय’ जाणून घेण्याचा काय फायदा?

धमन्यांच्या आरोग्याचे लवकर मूल्यांकन झाल्यास हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित जोखमीचे घटक वेळेत ओळखण्यास मदत होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांमध्ये ताठरतेची चिन्हे आढळल्यास डॉक्टर त्या व्यक्तीच्या एकूण आरोग्याचा आणि जोखमीच्या घटकांचा अधिक सखोल विचार करू शकतात.

यामुळे आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे व्यवस्थापन, धूम्रपान टाळणे आणि इतर आरोग्यदायी जीवनशैलीतील बदल याकडे वेळेत लक्ष देता येऊ शकते.

याचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित संभाव्य जोखीम गंभीर समस्या निर्माण होण्यापूर्वी ओळखण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकता येणे. मात्र, ARTSENS सारख्या उपकरणातून मिळालेला अहवाल हा डॉक्टरांच्या वैद्यकीय तपासणीचा पर्याय नाही. रक्तदाब, रक्तातील कोलेस्ट्रॉल, मधुमेह, कौटुंबिक इतिहास, जीवनशैली आणि इतर आवश्यक तपासण्यांचा विचार करूनच हृदयविकाराचा धोका निश्चित केला जातो, त्यामुळे ‘धमनींचे वय’ किंवा धमन्यांची ताठरता याबाबतची माहिती ही हृदयाच्या आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्यासाठी आणि आवश्यक असल्यास वेळेत जीवनशैलीत बदल करण्यासाठी उपयुक्त संकेत ठरू शकते.

हार्ट अटॅकची सामान्य लक्षणे

  • छातीत दुखणे : छातीत दाब, जळजळ किंवा अस्वस्थ वाटणे, जे डाव्या हातापर्यंत किंवा जबड्यापर्यंत पसरू शकते.
  • श्वास घेण्यास त्रास : छातीत दुखण्यासोबतच किंवा एकट्यानेही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
  • थकवा : अचानक खूप थकल्यासारखे वाटणे किंवा अशक्तपणा जाणवणे.
  • चक्कर येणे : अचानक चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे.
  • अस्वस्थता : मळमळ, उलटी किंवा घाम येणे.