Walking Leg Symptoms Heart Attack: आजकाल हृदयाशी संबंधित आजार झपाट्याने वाढताना दिसत आहेत. विशेषतः हृदय निकामी होण्याची समस्या (Heart Failure) ही अनेकांना गाठत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आजाराची सुरुवात अतिशय साध्या, दुर्लक्ष करण्याजोग्या लक्षणांपासून होते. अनेकदा लोक या लक्षणांकडे “वय वाढलं म्हणून होतंय” असं समजून दुर्लक्ष करतात; पण इथेच धोका दडलेला असतो.

तज्ज्ञांच्या मते, जर सुरुवातीची चिन्हं वेळेत ओळखली, तर हा गंभीर आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. पण प्रश्न असा आहे की, ही सुरुवातीची लक्षणं नेमकी कोणती? तर ती लक्षणं समजून घेऊ…

हळूहळू कमी होणारी ताकद – धोक्याची पहिली चाहूल

पूर्वी सहजपणे होणारी कामं अचानक अवघड वाटू लागतात… थोडंसं चाललं तरी दम लागतो… शरीरात ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटतं. अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात; पण हा हृदय कमकुवत होण्याचा संकेत असू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही लक्षणं अधिक काळ दडून राहतात.

Award Banner

श्वास घेण्यास त्रास आणि शरीरात बदल

काही वेळा शरीरात पाणी साचायला सुरुवात होते. त्यामुळे वजन वाढल्यासारखं वाटतं; पण ते वजन म्हणजे चरबी नसून द्रव साठण्यामुळे वाढलेलं असू शकतं. पोट फुगल्यासारखं वाटणं, थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणं हेदेखील गंभीर संकेत असू शकतात.

रात्री वाढणारी अस्वस्थता

रात्री झोपताना अचानक श्वास घ्यायला त्रास होणं, खोकला येणं किंवा जास्त उशा लावून झोपावं लागणं ही स्थिती साधी नाही. काहींना तर झोपेतून अचानक जाग येते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. ही लक्षणं हृदयाच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्याचं द्योतक असू शकतात.

दिसायला साधे; पण गंभीर संकेत

तज्ज्ञ सांगतात की, काही लक्षणं अगदी किरकोळ वाटतात; पण त्यामागे मोठा धोका दडलेला असू शकतो :

  • चप्पल किंवा बूट अचानक घट्ट वाटू लागणे
  • सकाळी उठल्यावर चेहरा फुगलेला दिसणे
  • वारंवार लघवीला जावं लागणं (विशेषतः रात्री)
  • सतत थकवा जाणवणे
  • पोट कायम भरल्यासारखे वाटणे

कोणाला अधिक धोका?

लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, पूर्वीचा हृदयविकाराचा झटका किंवा आधीपासून हृदयाचे आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या लोकांमध्ये हृदय निकामी होण्याचा धोका अधिक असतो.

डॉक्टरांचा इशारा – दुर्लक्ष करू नका!

तज्ज्ञ स्पष्ट सांगतात, ही लक्षणं केवळ ‘वयाचा परिणाम’ म्हणून सोडून देणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल करून, रुग्णाचं आयुष्य अधिक चांगलं बनवता येऊ शकतं.

शेवटी महत्त्वाचा खुलासा

सुरुवातीला सांगितलेलं ‘चालताना पायांत दिसणारं लक्षण’ म्हणजेच पाय आणि घोट्यांमध्ये हळूहळू वाढणारी सूज होय. ही सूज सुरुवातीला किरकोळ वाटते; पण ती हृदय नीट काम करत नसल्याचा इशारा असू शकते.

म्हणूनच शरीराकडून मिळणाऱ्या छोट्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. ते वेळीच ओळखा, वेळीच त्यावर योग्य ते उपचार घ्या आणि गंभीर धोका टाळा.