Causes Of Leg Tingling : पायांमध्ये मुंग्या येणे ही एक त्रासदायक समस्या आहे. दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसल्यानंतर किंवा अगदी झोपल्यानंतरही पायात अचानक मुंग्या येतात. अशा स्थितीत चालणं सोडा दोन पायांवर व्यवस्थित उभं राहणंही अवघड होते. अशावेळी पाय संवेदना गमावून बसतात. त्यामुळे स्पर्श केल्यानंतरही तो जाणवत नाही. पण पायात मुंग्या येण्यामागे नेमकी कारणे कोणती आणि यावर सोपे उपाय जाणून घेऊयात
पायांना मुंग्या का येतात?
नसांवर दाब
नस दबल्यामुळे पायांमध्ये मुंग्या येऊ शकतात. या मुंग्या येण्याच्या संवेदनेसह सौम्य वेदनाही असू शकतात.
विषारी पदार्थांचा संचय
विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा त्वचेने विषारी द्रव्ये शोषल्यास पायांना मुंग्या येऊ शकतात. आर्सेनिक, अँटीफ्रीझ किंवा पारा पोटात गेल्यामुळे असे होऊ शकते. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
जास्त मद्यपान
जर एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात मद्यपान करत असेल तर त्यामुळे अल्कोहोलिक न्यूरोपॅथी किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी होऊ शकते. अल्कोहोल हे एक विष आहे जे मज्जातंतूंच्या ऊतींना नुकसान पोहोचवते, यामुळे मुंग्या येऊ शकतात.
अतिचिंता किंवा मानसिक ताण
चिंताग्रस्त लोकांना त्यांच्या हातांना किंवा पायांना मुंग्या आल्याचा अनुभव येऊ शकतो. मुंग्या येण्यासह चिंतेमुळे डोकेदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास देखील होऊ शकतो.
जीवनसत्वाची कमतरता
व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे पायांना मुंग्या येऊ शकतात. व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे मज्जातंतूंचे नुकसान, चक्कर येणे, थकवा आणि अशक्तपणा देखील येऊ शकतो.
मधुमेह
मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मज्जातंतूंना इजा होऊ शकते. त्यामुळे, मधुमेही रुग्णाला पायांमध्ये मुंग्या येण्याचा अनुभव येऊ शकतो.
मूत्रपिंडाचा आजार
हातापायांना मुंग्या येणे हे किडनीच्या आजारामुळे देखील होऊ शकते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्हीमुळे किडनी निकामी होते, ज्यामुळे मुंग्या येऊ शकतात.
पेरिफेरल आर्टरी डिसीज
पेरिफेरल आर्टरी डिसीजमुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात, ज्यामुळे शिरा आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्ताभिसरण कमी होऊन मुंग्या येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
ऑटोइम्यून डिसीज
ऑटोइम्यून डिसीजमुळे हात आणि पायांना मुंग्या येऊ शकतात. ल्युपस, सेलिॲक रोग आणि ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस हे काही ऑटोइम्यून डिसीज आहेत ज्यामुळे मुंग्या येऊ शकतात.
औषधं
काही औषधांमुळे हात आणि पायांना मुंग्या येऊ शकतात, ज्यामध्ये कर्करोग, झटके किंवा उच्च रक्तदाबावरील औषधांचा समावेश आहे.
