मुंबई : स्तनाच्या कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात आणि सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी ईझीचेक चाचणी अपोलो कॅन्सर सेंटर आणि दातार जेनेटिक यांच्या सहयोगातून प्रथमच भारतात उपलब्ध करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने घेऊन करण्यात येणारी ही छाननी चाचणी असून कर्करोगाची कोणतीही लक्षणे नसलेल्या महिलांमध्ये केली जाईल.
स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी सध्या मॅमोग्राफी ही चाचणी केली जाते. परंतु ही चाचणी करण्यात अनेक अडथळे आहेत. परिणामी स्तनाच्या कर्करोगाचे निदान भारतामध्ये तिसऱ्या आणि त्याहून जास्त टप्प्यामध्ये होते. या कर्करोगाचे निदान वेळेत झाल्यास पुढील धोके टाळून चांगले आयुष्य जगता येते. त्यामुळे कर्करोगाचे निदान लवकर करण्यासाठी ही ईझीचेक चाचणी भारतामध्ये सुरू करत आहोत, असे अपोलो रुग्णालयाचे संस्थापक डॉ. प्रताप रेड्डी यांनी सांगितले. ही चाचणी बुधवारी देशभरात सुरू केली जात असून यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
ईझीचेक या चाचणीला अमेरिकेतील एफडीएची मान्यता मिळाली असून जगभरात १५ देशांमध्ये ही चाचणी करण्यात येत आहे. भारतामध्ये ही चाचणी सुरू करण्यात येत आहे. ही चाचणी महिलेच्या रक्ताचे नमुने घेऊन केली जाणारी साधी चाचणी असून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून नमुने घेऊन ही चाचणी करणे शक्य आहे. त्यामुळे देशभरातील महिलांसाठी ही चाचणी उपलब्ध असल्याचे दातार कॅन्सर जेनेटिक्सचे संस्थापक डॉ. राजन दातार यांनी सांगितले. स्तनाच्या कर्करोगाचे योग्य निदान करण्याची क्षमता (सेन्सिटिव्हिटी) ८८ टक्के, कर्करोग नसल्यास त्याचेही निदान योग्य रीतीने करण्याची क्षमता (स्पेसिफिसिटी) ९९ टक्के आणि अचूक निदान करण्याची क्षमता (अक्युरसी) ९९ टक्के आढळली आहे.
चाचणीचे फायदे..
सध्या उपलब्ध असलेल्या मॅमोग्राफी चाचण्यांची अचूकता कमी असल्यामुळे कधी कधी कर्करोगाचे निदान योग्य रीतीने केले जात नाही. तसेच काही वेळेस कर्करोग असल्याचेही चुकीचे निदानही केले जाते. मॅमोग्राफी चाचणीमध्ये वेदना होत असल्यामुळे महिला ही चाचणी करून घेण्यास फारशा पुढे येत नाहीत. तसेच ही चाचणी सर्वत्र उपलब्ध नसल्यामुळे याचा वापरही मर्यादित आहे. त्यामुळे सध्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान तिसऱ्या किंवा त्याहून पुढच्या टप्प्यामध्ये होते. ईझीचेक या चाचणीमुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये होण्यास मदत होते. वैद्यकीय चाचण्यांमध्ये ८० टक्के महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान शून्य टप्प्यात तर ९० टक्क्यांहून जास्त महिलांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये झाल्याचे आढळले आहे.