How to Peel Garlic Quickly: स्वयंपाक करताना भाजी, आमटी किंवा चटणी बनवणं सहज होतं; पण लसूण सोलण्याचं काम अनेकांना मात्र कंटाळवाणं वाटतं. एखाद्या-दोन पाकळ्या असतील तर ठीक, पण एकदम मूठभर लसूण सोलायचा असेल तर वेळही जातो आणि हाताला साली चिकटण्याचा त्रासही होतो. काही वेळा साल काढताना लसणाची पाकळीही तुटते. पण आता लसूण सोलण्यासाठी नखांचा वापर करत बसण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींच्या मदतीने लसूण पटकन सोलण्यासाठी हे सोपे किचन हॅक्स तुम्ही वापरून पाहू शकता.

१. डबा किंवा दोन वाट्यांचा वापर करा

संपूर्ण लसणाची गाठ वेगवेगळ्या पाकळ्यांमध्ये वेगळी करा. आता त्या पाकळ्या झाकण असलेल्या डब्यात टाका आणि डबा काही वेळ पूर्ण जोर लावून चांगला हलवा. डबा नसेल तर दोन वाट्या एकमेकांवर झाकून त्यात लसूण घेऊन हलवू शकता. घर्षणामुळे लसणाच्या सुकलेल्या साली सैल होण्यास मदत होते. त्यानंतर पाकळ्यांवरील साल काढणं तुलनेने सोपं होतं. कोरड्या लसणासाठी ही पद्धत विशेष उपयोगी ठरू शकते.

२. कोमट पाण्याची ट्रिक वापरा

लसणाची साल पाकळीला घट्ट चिकटलेली असेल तर कोमट पाणी उपयोगी पडू शकतं. लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून काही मिनिटांसाठी कोमट पाण्यात ठेवा. यानंतर पाकळी हलकीशी दाबल्यास साल सैल होण्यास मदत होऊ शकते. मात्र पाणी खूप गरम किंवा उकळतं नसावं. तसेच लसूण जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नका, कारण त्याच्या चवीवर किंवा पोतावर परिणाम होऊ शकतो. शिवाय सोललेली लसूण लगेच वापरणार असाल तरच या पाण्याच्या ट्रिकचा वापर करा.

३. रुंद चाकूची भन्नाट ट्रिक

लसूण बारीक चिरायचा असेल तर ही पद्धत विशेष उपयोगी ठरू शकते. लसणाची पाकळी चॉपिंग बोर्डवर ठेवा. त्यावर रुंद चाकू सपाट ठेवून हाताने हलका दाब द्या. पाकळी थोडीशी चपटी झाल्यावर तिची साल तुटून सैल होऊ शकते आणि ती सहज काढता येते. मात्र खूप जोरात दाबू नका, अन्यथा लसूण जास्त चिरडला जाऊ शकतो.

४. मायक्रोवेव्हचा झटपट पर्याय

एकदम भरपूर लसूण सोलायचा असेल तर मायक्रोवेव्हची हलकी हीट काही जण वापरतात. वेगळ्या केलेल्या लसणाच्या पाकळ्यांना अगदी थोड्या वेळासाठी हलकी उष्णता दिल्यास साल सैल होण्यास मदत होऊ शकते. मात्र लसूण जास्त वेळ किंवा जास्त तापमानावर ठेवू नका. अन्यथा पाकळ्या गरम होऊन शिजण्यास सुरुवात होऊ शकते.

५. आदल्या रात्री पाण्यात भिजवून ठेवा

लसूण सोलण्याची घाई नसेल तर ही सर्वात सोपी पद्धत ठरू शकते. लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून सामान्य पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाकळ्या काढून त्यांची साल हाताने काढल्यास ती तुलनेने सहज निघू शकते. मोठ्या प्रमाणात लसूण वापरायचा असेल तर ही पद्धत वेळ वाचवू शकते.

कोणती ट्रिक कधी वापरायची?

कमी प्रमाणात लसूण असेल तर चाकूची ट्रिक किंवा कोमट पाणी उपयोगी ठरू शकते. मोठ्या प्रमाणात कोरडा लसूण असेल तर डबा किंवा दोन वाट्यांची पद्धत करून पाहता येईल. तर आधीपासून तयारी करता येत असेल तर रात्रभर पाण्यात भिजवण्याचा पर्याय सोपा आहे. लसूण सोलण्याची पद्धत निवडताना पाकळ्यांचा प्रकार आणि त्यांची साल किती सुकलेली आहे, यानुसार परिणाम बदलू शकतो. त्यामुळे तुमच्या लसणाला कोणती पद्धत चांगली काम करते हे पाहून ती वापरा.