Home Remedies To Lower Cholesterol : जर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असेल, तर ते गांभीर्याने घ्या. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. औषधोपचार, जीवनशैलीतील बदल आणि व्यायामाने त्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपायदेखील करून पाहू शकता, जे खूप फायदेशीर ठरतील. चला, आयुर्वेदिक डॉक्टर चंचल शर्मा (आशा आयुर्वेद क्लिनिक) यांच्याकडून आयुर्वेदिक उपायांद्वारे कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे ते जाणून घेऊया…
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
आयुर्वेदानुसार, शरीरातील अतिरिक्त कफामुळे कोलेस्ट्रॉल जमा होते. शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल – हाय-डेन्सिटी लायपोप्रोटीन) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल – लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन) दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते.
एचडीएल – ‘चांगले’ कोलेस्ट्रॉल – खूप हलके असते आणि ते रक्तवाहिन्यांमधून चरबीचे साठे काढून टाकते.
एलडीएल म्हणजेच ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल – हे खूप चिकट आणि घट्ट असते.
एलडीएलची पातळी जास्त झाल्यावर काय होते?
एलडीएलची पातळी जास्त असल्यास, ते रक्तवाहिन्या आणि धमन्यांच्या भिंतींवर जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते. कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी आरोग्यासाठी हानिकारक असून, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा येऊ शकतो. कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यासाठी लिपीड प्रोफाईल नावाची रक्त तपासणी केली जाते.
आयुर्वेद काय सांगतो…?
कोलेस्ट्रॉलची पातळी आरोग्यदृष्ट्या सक्षम व्यक्तीमध्ये एकूण कोलेस्ट्रॉल २०० mg/dL पेक्षा कमी, HDL ६० mg/dL पेक्षा जास्त आणि LDL १०० mg/dL पेक्षा कमी, अशी राखली गेली पाहिजे.
कोलेस्ट्रॉलचे प्रकार आणि त्यांचे योग्य प्रमाण
- एकूण कोलेस्ट्रॉल – २०० मिग्रॅ/डीएल पेक्षा कमी
- एलडीएल (वाईट कोलेस्ट्रॉल) – १०० मिग्रॅ/डीएल पेक्षा कमी (हृदयरुग्णांसाठी ७० मिग्रॅ/डीएलपेक्षा कमी)
- एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) – पुरुषांमध्ये ४० मिग्रॅ/डीएलपेक्षा जास्त आणि महिलांमध्ये ५० मिग्रॅ/डीएलपेक्षा जास्त (आदर्शपणे ६० मिग्रॅ/डीएल किंवा अधिक)
- ट्रायग्लिसराइड्स – १५० मिग्रॅ/डीएलपेक्षा कमी
एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे कोणती?
अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी – अन्नातील जास्त प्रमाणात असलेले सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट या चरबीची पातळी वाढवू शकतात.
शारीरिक हालचालींचा अभाव – जे लोक खूप कमी शारीरिक हालचाल (जसे की व्यायाम, योग किंवा इतर शारीरिक श्रम) करतात, त्यांच्यामध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली असू शकते.
धूम्रपान- धूम्रपानामुळे शरीरातील या चरबीचे प्रमाण वाढू शकते.
मद्यपान – अति प्रमाणात मद्यपान करणे हेदेखील एक कारण आहे.
आनुवंशिक इतिहास – आनुवंशिकतादेखील यात भूमिका बजावते; ज्यांच्या कुटुंबात उच्च कोलेस्ट्रॉलचा इतिहास आहे, त्यांना याचा जास्त प्रमाणात धोका असतो.
मधुमेह- वाढत्या पातळीचे मधुमेह हेदेखील एक प्रमुख कारण आहे.
इतर वैद्यकीय परिस्थिती काही विशिष्ट दीर्घकालीन वैद्यकीय परिस्थिती – जसे की यकृत किंवा मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार, हायपोथायरॉईडीझम आणि एड्स – हेदेखील मूळ कारण असू शकतात.
डॉ. चंचल शर्मा यांनी स्पष्ट केले की, आयुर्वेदात एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजे ‘मेद धातू’ (चरबी) मधील वाढ आणि ‘कफ दोषाचे असंतुलन’ मानले जाते. सुश्रुत संहिता आणि चरक संहितेमध्ये अतिरिक्त मेद (चरबी) आणि कफाची लक्षणे व कारणे यांचे सविस्तर वर्णन करणारे श्लोक आहेत.
“स्निग्धांगतामुद्रा कृष्णवृद्धि कास श्वासादीन दूर्गंध्यच.”
अर्थ- शरीरातील चरबी (चरबीयुक्त ऊतक/कोलेस्ट्रॉल) वाढल्यामुळे शरीराच्या अवयवांमध्ये अत्याधिक तेलकटपणा, पोट आणि कंबर (बरगड्यांजवळील भाग) वाढणे, खोकला, धाप लागणे आणि शरीराला दुर्गंधी येणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात.
एलडीएल कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
मोहरीचे तेल – यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स लक्षणीय प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. जर तुम्हाला एलडीएल कोलेस्ट्रॉलची समस्या असेल, तर तुम्ही नेहमी मोहरीचे तेल वापरावे.
धणे आणि मेथीचे दाणे – धण्यांचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. मेथीमधील विद्राव्य फायबर आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे शोषण रोखते.
जवस – जवसाची पावडर सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही ती ताकात मिसळून किंवा तशीच सेवन करू शकता. त्यामुळे वाढत्या एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
सोयाबीन – सोयाबीन, मसूर आणि मोड आलेली धान्ये यकृताला रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतात. त्याचबरोबर हे पदार्थ चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासही मदत करतात.
कफ-संतुलित आहार – जास्त चरबीयुक्त पदार्थ, चीज, प्रक्रिया केलेले पदार्थ, कंडेन्स्ड मिल्क आणि थंड पेये टाळा.
हलके आणि सहज पचणारे अन्न – तुमच्या आहारात आले, दालचिनी, हळद, ओट्स आणि आवळा व लिंबू यांसारख्या ताज्या फळांचा समावेश करा.
शारीरिक हालचाल- शरीरातील मेद धातूचा (चरबीयुक्त ऊतक) समतोल राखण्यासाठी नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम करा.
मनुका आणि बदाम – १०-१२ मनुका आणि ६-७ बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी त्यांचे सेवन करा. त्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. एलडीएल कोलेस्ट्रॉलची असलेल्या रुग्णांनी याचे नियमित सेवन करावे; परंतु मधुमेह असल्यास मुनके खाल्ले जाणार नाहीत याची काळजी घ्या.
गुग्गुळ – यामुळे शरीरातील चरबीच्या चयापचयात सुधारणा होते. वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे.
अर्जुनाची साल – हा हृदयाच्या आरोग्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, अर्जुनाच्या सालीची पावडर एलडीएलची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकते आणि हृदयाचे स्नायू मजबूत करू शकते.
त्रिफळा – दररोज रात्री कोमट पाण्यासोबत एक चमचा त्रिफळा पावडरचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे लिपीड प्रोफाईल सुधारते.
